चर्चिलच्या चरित्रात भारतातून फक्त एका व्यंगचित्रकाराची चित्रे छापली गेली. ते होते बाळासाहेब..

इंग्लंडचा माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलला आपण एक खडूस म्हातारा म्हणून ओळखतो. दुसऱ्या महायुद्धात त्याच्या खडूसपणामुळेच इंग्लंड हिटलरच्या जर्मनी पुढे तग धरू शकली आणि ते महायुद्ध जिंकू शकली. असा हा चर्चिल जगभरात लोकशाहीच महत्व सांगणारी भाषणे ठोकायचा पण भारताला स्वातंत्र्य देण्यास मात्र त्याचा सक्त विरोध होता.

बाकी काही का असेना तो जागतिक पातळीवरचा एक महान मुत्सद्दी होता हे त्याचे विरोधक देखील मान्य करतील. या सोबतच तो एक राजकारणी होता,  इतिहासकार होता, चित्रकार होता, उत्कृष्ट वक्ता मात्र या सर्वा पेक्षाही तो एक महान लेखक देखील होता.

इतर राजकारणी शांततेचा नोबल मिळवत असतात तेव्हा या पठ्ठ्याने साहित्यातला नोबल पुरस्कार जिंकलाय.

अशा या खडूस म्हाताऱ्याच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे निमित्त करून जगभरात मोठमोठे कार्यक्रम घेतले जात होते. तेव्हा त्याचं एक चरित्र देखील प्रकाशित केलं जाणार होतं. जवळपास पन्नास वर्षे राजकारणात राहिलेल्या चर्चिलवर गेल्या अनेक वर्षात कित्येक व्यंगचित्रे देखील काढण्यात आली होती. या व्यंगचित्रांमधून त्याच्यावर टीका केली गेली होती, कित्येकदा चर्चिलची खिल्ली देखील उडवण्यात आली होती.

लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता म्हणवल्या जाणाऱ्या चर्चिलने आपल्या चरित्रात या व्यंगचित्रांना खास स्थान द्यायचे ठरवले.

जगभरातून दिग्गज व्यंगचित्रकारांनी काढलेली, गाजलेली व्यंग चित्रे या पुस्तकात समाविष्ट केली जाणार होती. एकेकाळी निम्म्या जगावर राज्य केलेल्या, इथल्या स्वातंत्र्याचा मोठा विरोध केलेल्या चर्चिलवर भारतात देखील अनेकदा युग चित्रातून फटकारे ओढण्यात आले होते.

मात्र संपूर्ण भारतातून चर्चिलवर बनवलेली फक्त तीन व्यंगचित्रे त्या पुस्तकासाठी निवडण्यात आली. हि तिन्ही व्यंगचित्रे रेखाटली होती बाळासाहेब ठाकरे यांनी.

बाळासाहेब ठाकरेंची आजच्या महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख, ठाकरी शैलीत सभा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट अशी ओळख आहे, पण त्यांच पहिलं प्रेम व्यंगचित्रकला होतं. याच मार्मिक चित्रांमुळे महाराष्ट्रात एका वेगळ्या बंडखोरीचा पाया त्यांनी रचला. फटकाऱ्यांची हि भाषा पुढे त्यांच्या राजकारणाचा पाया देखील झाली आणि ओळख देखील.

अगदी लहान वयात त्यांनी हातात कुंचला पकडला. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांनी व्यंगचित्राचे पहिले धडे गिरवले. मात्र त्यांच्या चित्रांवर प्रभाव दीनानाथ दलाल व डेव्हिड लो या महान व्यंगचित्रकारांचा होता.

4842923932789315405 Mid

प्रबोधनकारांनी कोल्हापूरच्या बाबुराव पेंटर यांनी सल्ला दिल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना निवड होऊनही जेजे स्कुल ऑफ आर्ट येथे शिकण्यास पाठवले नाही. 

बाळासाहेबांनी व्यंगचित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतले नाही. पण त्यांच्यावर इंग्लंडचे जगप्रसिद्ध कार्टूनिस्ट डेव्हिड लो ची चित्रे पाहून पाहून व्यंगचित्रकलेत प्राविण्य मिळवले. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या इव्हनिंग स्टँडर्ड या वर्तमानपत्रात डेव्हिड लो ने काढलेले कार्टून जगप्रसिद्ध आहेत. विशेषतः हिटलर आणि मुसोलिनी वर काढलेले कार्टून आजही अभ्यासले जातात.

असं म्हंटल जात की ब्रिटन जिंकल्यावर ज्या लोकांना हिटलर मारणार होता त्या सुप्रसिद्ध ब्लॅक लिस्ट यादीत डेव्हिड लो चं नाव वरच्या क्रमांकावर होते. १९६२ साली राणीच्या वाढदिवसाला त्यांना नाईटहूड देऊन “सर” हि उपाधी देण्यात आली.  

याच डेव्हिड लोने काढलेल्या व्यंगचित्रांच्या सोबत त्यांना गुरु मानणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांना चर्चिलच्या चरित्रात स्थान मिळाले. हा एक दुर्मिळ योगायोग आणि बाळासाहेबांसाठी मोठा सन्मानच होता.

त्या काळात भारतात तीन व्यंगचित्रकार फेमस होते. एक म्हणेज आर.के.लक्ष्मण, शंकर्स विकली चे के. शंकर पिल्लई आणि तिसरे बाळासाहेब ठाकरे. सहनकर सगळ्यात सिनियर मग लक्ष्मण आणि सगळ्यात वयाने तरुण होते बाळासाहेब. मात्र या तिघांना एकमेकांच्या प्रति एवढा आदर होता कि जेव्हा शंकर यांना नेहरूंच्या सोबत रशिया दौऱ्याला जावे लागले तेव्हा त्यांनी जाताना आपल्या साप्ताहिकाची जबाबदारी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिली होती.

शंकर व लक्ष्मण यांच्या सारखे अनुभवी व्यंगचित्रकार असताना देखील चर्चिलच्या चरित्रात बाळासाहेबांना स्थान मिळाले हे विशेष.

पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी बाळासाहेबांच्या कुंचल्याच्या धार आली. त्यांनी नेहरूंपासून ते इंदिरा गांधींपर्यंत सर्व मोठमोठ्या नेत्यांचे व्यंगचित्र काढून त्यांना फटकारले. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे हातात बंदूक घेऊन मानवी कवट्यांच्या राशीवर उभे असलेले व्यंगचित्र विशेष गाजले.

या व्यंगचित्रात ‘नरराक्षस मोरारजी’ असा मथळा होता. हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आणि एकच खळबळ उडाली. बाळासाहेबांच्या अटकेचे वॉरंटही निघाले होते. 

एकंदरीत बाळासाहेबांच्या राजकारणाची पायाभरणी या व्यंगचित्रांमधून झाली.

bal thackeray cartoons 8 010513110536

त्यांनी १३ ऑगस्ट १९६० मध्ये मराठी माणसाचा आवाज म्हणून ” मार्मिक” हे व्यंगचित्र साप्ताहीक सुरु केले.

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्याचे पहिले प्रकाशन करण्यात आले होते. त्यात त्यांनी व्यंगचित्रातून मारलेले राजकीय फटके आजही लोकांना लक्षात आहेत. महाराष्ट्रातही यशवंतराव चव्हाण, जॉर्ज फर्नांडीस, आचार्य अत्रे, शरद पवार कोणीही या फटक्यातून सुटले नव्हते. याच मार्मिकमधून सुरु केलेल्या प्रवासाची परिणीती अखेर १९६६ ला शिवसेना स्थापन्यामध्ये झाली.

पुढे राजकारणामुळे बाळासाहेबांचे व्यंगचित्र काढणे कमी होत गेले. त्यांच्या रूपाने राज्याला मराठी माणसांच्या साठी झटणारा एक महान नेता मिळाला पण राजकारणामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला एक महान व्यंगचित्रकार महाराष्ट्राने गमावला.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.