राज ठाकरेंचं पहिलं भाषण सुरु होतं आणि बाळासाहेब ते फोन वरून ऐकत होते..

राज ठाकरे यांची राजकीय मते कोणाला पटतील अथवा नाही मात्र त्यांचं वक्तृत्व अफाट आहे याबद्दल विरोधकांचही एकमत होईल. त्यांच्या सभा गाजतात, लोकांना भावतात. राज ठाकरे रोखठोक बोलतात, जनतेच्या मनातलं बोलतात. कधी भूमिका घ्यायला ते घाबरत नाहीत. त्यांच्या भाषणांमध्ये बाळासाहेबांची झाक दिसते असं म्हणतात.

पण आज आपल्याला ऐकून धक्का बसेल, खुद्द राज ठाकरे यांना देखील भाषण करण्याची भीती वाटायची. 

राज ठाकरे आपल्या आठवणींमध्ये सांगतात कि एक काळ असा होता त्यांना भाषण करणे सोडा व्यासपीठावर उभं राहिलं तरी पाय लटपटायचे. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांची तरुणांमध्ये क्रेझ होती. त्यांच्यातील तडफ चालण्या बोलण्यातून दिसायचीच तरी ते कधी भाषण करायचे नाहीत.

राज ठाकरेंनी सभा गाजवण्यास सुरवात केली त्याला एक घटना कारणीभूत ठरली. 

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. पाकिस्तानची क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यांचा मुंबई येथे देखील एक सामना होणार होता. पण बाळासाहेबांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत भूमिका घेतली,

“ज्या पाकिस्तानबरोबर आपले जवान सीमेवर लढत आहेत त्यांच्या खेळाडूंसोबत क्रिकेट मॅच आम्ही होऊ देणार नाही. “

बाळासाहेबांचा शब्द म्हणजे दगडावरची रेघ होती. सरकार हा सामना व्हावा म्हणून हट्टाला पेटले होते पण शिवसैनिकांनी थेट वानखेडेची खेळपट्टीचं उखडून टाकली. बीसीसीआयला हा सामना रद्द करावा लागला. शिवसेनेचा विजय झाला होता.

राज ठाकरे नुकतंच राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली कि हा विजय आपण सभा घेऊन सेलिब्रेट केला पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी त्याला परवानगी दिली. शिवाजी पार्क येथे भव्य विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं.

दसऱ्यात जसे रावण दहन केले जाते त्याप्रमाणे पाकिस्तानचा एक मोठा पुतळा बनवून त्याचे दहन करण्यात आले.

तुफान गर्दी जमली होती. सगळ्यांचे कान बाळासाहेब काय बोलणार याकडे लागले होते. व्यासपीठावर राज ठाकरे बाळासाहेबांच्या खुर्ची शेजारीच बसले होते. ते राज यांच्या कानात म्हणाले,

“तू बोलतोयस ना आज?”

राज ठाकरे यांनी या पूर्वी कधीच सभेला संबोधित केलं नव्हतं. त्यांना धक्काच बसला. समोर अख्ख मैदान भरलं होतं. आपण बोलू शकेन याचा काहीच आत्मविश्वास नव्हता. तरी ते बाळासाहेबांना म्हणाले,

“काका माझी भंकस करू नको हं , नाही तर मी इथून निघून जाईन. “

बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं तू सभा बोलावली आहेस, भाषण देखील तुलाच करावं लागेल. तू बोलतोस की मी जाहीर करू?

बाळासाहेबांना नाही म्हणायची हिंमत राज यांच्यात नव्हती. कसबसं धाडस एकवटून ते भाषणाला उभे राहिले. त्या दिवशी काय भाषण केलं ते त्यांनाही आठवत नाही. फक्त तीन चार मिनिटे ते बोलले असतील नसतील. ते भाषण खूप भारी वगैरे झालं असं नाही पण त्या तीन चार मिनिटात त्यांची व्यासपीठावर बोलण्याची भीती कायमची संपून गेली.

त्यानंतर काहीच दिवसातली गोष्ट. विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु होतं. त्यात महाविद्यालयातील फी वाढीच्या विरोधात मागण्या मांडण्यासाठी राज ठाकरे यांनी भव्य विद्यार्थी मोर्चा काढला होता. काळाघोडा येथे या मोर्चाची सांगता होणार होती. तेव्हा राज ठाकरे स्वतः स्वतः भाषणाला उभे राहिले. तिथे जमलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी त्वेषपूर्ण भाषण केलं.

राज ठाकरे नावाच्या झंझावाताची हि सुरवात होती.

राज ठाकरे भाषण संपवून व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांना कोणी तरी सांगितलं माँ आल्या आहेत. माँ म्हणजे बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे. मीनाताई या राज ठाकरे यांच्या काकू देखील होत्या आणि सख्ख्या मावशी देखील. त्या कौतुकाने राज ठाकरे कस बोलतात हे ऐकायला आल्या होत्या.

मोर्चा मधली गर्दी पांगली. मागे मोटारीत बसलेल्या मीनाताई राज यांना दिसल्या. त्या म्हणाल्या,

“गाडीत बस. काका वाट बघतोय.” 

ते दोघे मातोश्रीवर आले. दुपारची वेळ होती. बाळासाहेब त्यांची वाटच बघत बसले होते. राज ठाकरेंना माहीतच नव्हतं कि बाळासाहेबांनी त्यांचं हे भाषण ऐकलं होतं. त्याकाळी मोबाईल फोन वगैरे नव्हते. त्या मोर्चाच्यावेळी एका दुकानदाराने  शिवसेनाप्रमुखांना फोन लावून दिला होता. राज ठाकरे आपलं पहिलं भाषण करत होते आणि बाळासाहेब फोनवरूनच ते लक्ष पूर्वक ऐकत होते. त्यामुळे त्यांना तिथे काय काय झालं हे सगळं ठाऊक होतं.

राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवर पोहचले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना जवळ बसवून घेतलं आणि म्हणाले,

“मी आता तुला दोन गोष्टी सांगणार आहे ज्या माझ्या बापाने मला सांगितल्या होत्या.”

ते म्हणाले, एक म्हणजे ज्या मैदानात जाशील त्या मैदानाची भाषा बोल. कुंपणावरती बसलेल्या एखाद्या साध्या माणसाला देखील समजेल इतकं साधं सोप्या भाषेत बोल. दुसरं म्हणजे लोकं शहाणी व्हावीत याच्यासाठी बोल आपण किती शहाणं आहे हे दाखवण्यासाठी बोलू नको.

राज ठाकरे यांच्या मनावर बाळासाहेबांचे हे शब्द कायमचे कोरले गेले. आजही ते सभा जिंकतात आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीतून लोकांना काबीज करतात ते याच दोन गोष्टींवरून.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.