तेव्हा पासून भारतात बलबीर पाशा नावाची पोरं दिसायची बंद झाली !!

नुकताच दोन हजार साल उलटून गेलेलं. 2k च्यासंकटातून जग सावरल होतं. आपण पण गेल्या दशकभरात जागतिकीकरणाला सरावत चाललो होतो. आज तकच्या बातम्यांनी आणि झी-स्टार वरच्या सिरीयलनी आपलं आयुष्य व्यापून टाकायला सुरवात केली होती. अशातच एक बॉम्ब आपल्या डोक्यावर येऊन पडला.

अख्ख्या मुंबईत एका रात्रीत पोस्टर लागले, “बलबीर पाशा को एड्स होगा क्या?”

आता हा बलबीर पाशा कोण कोणाच्या बापाला ठाऊक आहे. त्याला एड्स होणार का हा एवढा मोठा प्रश्न का आहे हे पण आपल्याला ठाऊक नव्हतं. कोण म्हटल बलबीर पाशा खूप मोठा पुढारी आहे आणि म्हणून हे पोस्टर लागले आहेत. जुनाजाणता मुंबैय्या माणूस लोकल ला लटकत म्हणाला,

“ये लफडा आपुन को मालूम है. ये पक्का किसी आनेवाले पिक्चर का पोस्टर रहिंगा.”

कुछ तो लफडा है हे तर सगळ्यांच म्हणण होतं. सगळ्यांना उत्सुकता होती बलबीर पाशाचं काय झालं याची.

काही दिवसातच टीव्हीवर पण एक जाहिरात दिसू लागली. ज्यात दाढी करणाऱ्या न्हाव्यापासून ट्रक ड्रायव्हर पर्यंत सगळे डोक खाजवत असतात की बलबीर पाशाला एड्स होणार की नाही. जाहिरातीच्या शेवटीतर एक पोरग अख्ख्या गल्लीला ओरडून विचारत, बलबीर पाशा को एड्स होगा क्या?

आता फक्त मुंबईच नाही तर देशभरात सगळ्यांच्या तोंडात हे शब्द बसले. गंमतीगंमतीत दोस्ताना “ए बलबीर पाशा” अशा हाका मारल्या जाऊ लागल्या. खूप दिवस ताणवल्यावर एक जाहिरात आली. त्यात काही मित्र दारू पीत एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. या गप्पामध्ये नेहमीचा लाडका प्रश्न येतो की बलबीर पाशाच काय होणार? त्यावेळी दुसरा म्हणतो,

“तेरे जैसा होगा तो उसको एड्स रहेगा.”

मग पहिला मित्र रागात म्हणतो की ,

“ऐसे कैसे बोल सकता है तू?”

त्यावेळी दुसरा मित्र सांगतो,”वो अगर तेरे जैसा दारू पीके लडकी के पास जायेगा, कंडम पेहनना भूल जायेगा तो उसको एड्स होगा ना?”

तेव्हा कळाल की बलबीर पाशा कोण नाही ही एक एड्सबद्दल जनजागृती करणारी जाहिरात आहे. या पाठोपाठ तीनचार जाहिराती आल्या. एकात सांगितलं होतं की फक्त वरून हेल्दी दिसणाऱ्या बाई बरोबर सेक्स केला, किंवा कायम एकाच बाईकडे रेग्युलर राहिलं तर एड्स होणार नाही अस नाही.

याच बलबीर पाशाच्या जाहिरातीपैकी एका मंजुळाच्या जाहिरातीमध्ये आता आपला लाडका बनलेला नवाजुद्दिन सिद्दीक्की सुद्धा एका छोट्या रोल मध्ये दिसला. 

अंगावर येणाऱ्या जाहिराती अनेकांचे डोळे उघडत होत्या. हा रोग कोणालाही होऊ शकतो हे ठसवल जात होतं. भारतात आत्ता पर्यंत आलेल्या सामजिक संदेश देणाऱ्या जाहिरातीपैकी ही सर्वात प्रसिद्ध झालेली ही अॅड असेल.

नाही तर यापूर्वी एड्स जणजागृतीसाठी शबाना आझमीची ये छुनेसे नही फैलता वाली सरकारी जाहिरात एवढा व्यापक परिणाम करू शकली नव्हती. बलबीर पाशाची लोकप्रियता एवढी वाढली की खुद्द अमूल बटरने सुद्धा आपल्या जाहिरातीत त्याला वापरलं.

या टीव्हीच्या जाहिरातीबरोबरच रेडियो वर्तमानपत्रे सगळीकडे बलबीर पाॅशा धुमाकूळ घालत होता.

या जाहिराती बनवल्या होत्या आर बाल्की यांनी. याच आर बाल्की यांनी पुढे जाऊन अमिताभबरोबर पा सारखे सिनेमे बनवले.पोप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल (PSI )या एनजीओसाठी लोव लिंटास नावाच्या जाहिरात कंपनीने हे अॅडव्हर्टाइजिंग कॅम्पेन चालवल होतं. PSI ने एड्सजणजागृतीसाठी एक कॉलसेंटर सुद्धा सुरु केलं.

या जाहिरातीसाठी प्रचंड पैसा लागणार होता, तो पैसा जगभरातल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी दिला होता. शिवाय लोकसंख्या निर्मुलनाच काम करतोय म्हटल्यावर वृत्तपत्रे टीव्ही चनल यांनी आपला नेहमीचा रेट सुद्धा कमी केला होता.

पण जेवढ या कॅम्पेनच कौतुक झालं तेवढीच टीका देखील झाली.

त्यांनी गुंतवलेला पैसा हा चर्चेचा विषय होता. यात एड्स टाळण्यासाठी कंडोम वापरण्याचा सल्ला दिला होता. याचाच अर्थ ही कंडोमची जाहिरात करण्यासाठी सामाजिक बुरखा घातलेलं कॅम्पेन आहे का अस दबक्या आवाजात बोलल जात होतं.

शिवाय ही जाहिरात फक्त निम्न-मध्यमवर्गीय समाजातील पुरुषांना जागृत करत होती. त्यातही वेश्येकडे गेल्यामुळे एड्स होतो, बाईकडूनच एड्स पसरतो असा एक समज या जाहिरातीमुळे दृढ होईल अशी भीती काही स्त्रीवादी संघटनानां वाटत होती. त्यांनी जोरदार मोर्चे काढले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने PSI ला नोटीस बजावली.

काही संघटना बालमनावर विपरीत परिणाम होईल असा आक्षेप घेत होत्या.

कारण काही का असेना पण काही दिवसांनी बलबीर पाशा टीव्हीवर दिसायचा बंद झाला.

पण किती जरी नाही म्हटल तरी या जाहिरातीने त्याकाळात जेवढ एड्स बद्दल जागृती केली तेवढी जगातल्या कुठल्या जाहिरातीने केलं नाही. आजही अनेक ठिकाणी या कॅम्पेनचा केसस्टडी केला जातो. मिडियाची ताकद सुद्धा याच जाहिरातीमुळे कळाली.

ज्या भारतात एकेकाळी कंडोम हा शब्द उच्चारण्यास देखील लोक लाजायचे तिथे आज एखादी मुलगी देखील मेडिकलमध्ये जाऊन बिनधास्त आपल्या आवडत्या फ्लेवरच कंडोम खरेदी करते हे या जाहिरातीचेच यश आहे.

आणि बाकी काही का असेना या जाहिरातीपासून कोणीही आपल्या मुलाचं नाव बलबीर पाशा ठेवलं नाही. ज्यांच आधीपासून नाव बलबीर पाशा होत त्यांनी सुद्धा लाजून हे नाव बदलून घेतल.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.