जेव्हा कंडोमला “कामराज” नाव देण्यात आलं : कंडोमचं असही राजकारण.

कंडोमचा वापर मर्यादा निर्माण करण्यासाठी होतो. मर्यादा कोणत्या तर सुरक्षित लैंगिक संबधांसाठीच्या मर्यादा. ज्याठिकाणी संबध निर्माण होतात त्याठिकाणी मर्यादा देखील निर्माण कराव्याच लागतात. हे परस्पर पुरक अस असतं. मात्र भारताच्या राजकारणाला मर्यादा नाहीत. कोणत्या गोष्टीवरुन राजकारण होईल ते तेव्हा सांगता येत नव्हतं, न की आत्ता सांगता येत नाही. 

हा किस्सा देखील असाच. जेव्हा कंडोम भारतात उपलब्ध करुन देण्यात आलं आणि त्यातून एक विचित्र राजकारण घडलं. 

राजकारणाची सुरवात होते ती १९६३ सालापासून. तेव्हा शासनाने सर्वसामान्यांना कंडोम स्वस्त: किंमतीत उपलब्ध करुन देण्यासाठी पाऊस टाकलं. या निर्णयाच्या पुर्वीपासून म्हणजे १९५० च्या दशकापासून भारतीय बाजारपेठेत कंडोम उपलब्ध होते मात्र ते श्रीमंत वर्गासाठीच होते. कंडोमची तगडी किंमत आणि ते वापरण्यासाठी जागरुकता या दोन्ही कारणांमुळे कंडोम आणि सर्वसामान्य जनता यांचा दूरदूरपर्यन्तचा संबध नव्हता. अशा वेळी कंडोम भारतीय बाजारपेठेत उतरवण्याचा निर्णय शासकिय पातळ्यांवर घेण्यात आला. याच मुख्य कारण होतं “भारताची वाढती लोकसंख्या”. 

या काळाल भारत सरकारने साडेपाच कोटी रुपयांच अनुदान कंडोमसाठी देण्याचा निर्णय घेतला. बाजारात उपलब्ध असणाऱ्या कंडोमची किंमत २५ पैशांवरुन ५ पैशांवर येण्यासाठी मदत होणार होती. याच काळात कंडोमला भारतीय शब्द म्हणून “कामराज” वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. कामराज हे नाव कामदेवतेच्या आणि कामसुत्राच्या आधारावर देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. 

हे ही वाचा –

कामराज नावाने बाजारपेठेत ५ पैशांमध्ये कंडोम उपलब्ध होताच मोठ्ठा दंगा सुरू झाला. त्याचं कारण होतं राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष के. कामराज. 

के. कामराज हे तेव्हा राजकारणातील मोठ्ठ प्रस्थ होतं. कामराज हे लोकप्रिय देखील होते. अशा काळातच कामराज नावाने भारतीयांना कंडोमची ओळख झाल्याने राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं. मात्र कितीही झालं तरी कामराज हे सत्ताधारीच होते. तात्काळ कामराज हे नाव पाठीमागे घेण्यात आलं. 

मात्र कंडोमचं भारतीयकरणं करण्याची देखील तितकीच मोठ्ठी आवश्यकता कंडोमच्या प्रचारकांना जाणवत होती. अशा काळात धावून आला तो IIM एक विद्यार्थी. अस सांगितलं जात की कंडोमला निरोध हे नाव त्यानेच सुचवलं. 

भारतीय कंडोमची सुरवात.

नंतरच्या काळात १९६६ च्या दरम्यान जपानच्या ओकामोतो इंडस्ट्रीजच्या सहकार्याने हिंदूस्तान लेटेक्स कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीने आपला पहिला प्लॉंन्ट केरलच्या पेरुरकडा येथे लावला. त्याठिकाणावरुन कंडोमचं खऱ्या अर्थाने भारतीय उत्पादन सुरू करण्यात आलं. याच प्रकल्पातून फसलेल्या “कामराज” ब्रॅण्डचं नाव निरोध करण्यात आलं. कंडोमचा देशी शब्द निरोध तर पहिला ब्रॅण्ड ठरला तो निरोध. 

लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांच नाव ठेवलं निरोधकुमार.

सुरवातीच्या काळात शासकिय पातळ्यांवर कंडोम अर्थात निरोधचा वापर हा लोकसंख्या कमी करण्यासाठीच प्रभावी माध्यम म्हणूनच करण्यात येत होता. याच काळात म्हणजे १९७० च्या दशकात केरलचे कलेक्टर होते एस. कृष्ण कुमार. त्यांनी निरोधच्या वापराची योजना आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबवली. त्यांनी हि योजना इतकी मनावर घेतली की लोकांनी त्यांच नाव निरोधकुमार ठेवलं होतं. कदाचित ते भारतातले पहिले आणि एकमेव अधिकारी असावेत ज्यांच नाव कंडोमवरुन ठेवण्यात आलं होतं. 

नंतरच्या काळात असुरक्षित लैंगिक संबधामुळे होणारे रोगांची ओळख निर्माण होतं गेली. एड्स सारख्या रोगाचा पहिला रुग्णाची नोंद चैन्नईमध्ये करण्यात आली त्यानंतर कंडोमकडे पाहण्याची लोकांची मानसिकता देखील बदलत गेली. पण राजकारणाकडे पाहण्याची मानसिकता ? 

त्याबद्दल आम्ही काय बोलणार ते तुम्हीच ठरवा ! 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.