या अवलिया इंग्रज अधिकाऱ्याला ‘बार्शी लाईट’ ही देवाची गाडी सुरू करण्याची कल्पना सुचली.

सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातुन लाखो वारकरी पंढरपूरात येत असतात. देवाच्या वारीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळतेच अस नाही.

मराठवाड्यातुन असे हजारो वारकरी देवाच्या गाडीने पंढरपूरला दाखल व्हायचे.

देवाची गाडी उर्फ बार्शी लाईट.

नाव बार्शी पण मिरज ते लातूर असा हा नॅरोरेल्वेमार्ग होता. अगदी चालत जाणाऱ्या वाटसरूनेही पकडावी एवढा तिचा वेग असायचा. कोळश्यावर चालणारे इंजिन त्याला
एकूण ७ लाकडी डब्बे.

त्यात गळ्यात माळ घातलेले, माऊलीचा जप करणारे माळकरी. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास अशी कोणतीही वर्गवारी नाही. अगदी दहा पंधरा रुपयात आपल्या स्टेशनला नेणारी रेल्वे खरंच देवाची गाडी होती.

पण याची सुरवात एका इंग्लिश माणसाने केली होती,एव्हरार्ड कॅलथोर्प.

कॅलथोर्प हा इंग्लंडमधल्या शेतकऱ्याचा मुलगा. लहानपणापासून आगगाडीचं भलतंच आकर्षण यातून लंडनमध्ये रेल्वेत नोकरीला लागला, तिथे मोठ्या हुद्द्यावर पोहचला. पुढं आपलंनशीब काढायला म्हणून भारतात आला.

ग्रेट इंडियन पेनिन्सुला (GIPR) म्हणजे आत्ताची मध्य रेल्वे यात कॅलथोर्प लोकोमोटिव्ह इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाला.

वर्ष होत १८८२.

हा काळ भारतीय रेल्वेच्या विकासाचा काळ होता. इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी देशभर रेल्वे रुळाच जाळ पसरवण्यास सुरवात केली होती. सुरवातीला भूत म्हणून घाबरणारे भारतीय आता सरार्स आगगाडीने प्रवास करत होते.

अनेक मोठी शहरे रेल्वेने जोडली जात होती. या निमित्ताने कॅलथोर्पचा भारतातल्या कानाकोपऱ्यात प्रवास होत होता.

या प्रवासादरम्यान भारतीयांना समजावून घेण्याची संधी त्याला मिळाली. इथले लोक प्रवास मुख्यतः देवदर्शनासाठी करतात हे त्याच्या लक्षात आले होते. यातूनच त्याच्या डोक्यात एक कल्पना घोळू लागली.

१८८६ साली कॅलथोर्पने GIPR रेल्वेकडे रजेचा अर्ज केला.

या रजेच्या काळात त्याने दोन स्वतंत्र मार्ग शोधून काढले जिथे रेल्वेची गरज होती. यातील एक म्हणजे नाशिक. एक मोठं तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकला कुंभमेळा व इतर वेळीही लाखो भाविक येत असतात.

तिथे ट्राम सुरू करायची आयडिया कॅलथोर्पच्या डोक्यात आली.

दुसरा मार्ग म्हणजे मिरज ते लातूरला जोडणारा नॅरोगेजमार्ग.

एकतर या मार्गावर मोठी शहरे नव्हती म्हणून इकडे रेल्वे येण्याची शक्यता नव्हती. पण नॅरोगेजमुळे खर्च कमी येऊन एका छोट्या रेल्वे मुळे सांगली मिरज बार्शी लातूर या व्यापारी पेठांना जोडल्या जाणार होत्या.

शिवाय याच मार्गावर असलेल्या पंढरपूरमुळे लाखो लोकांची सोय होणार होती.

कॅलथोर्पची योजना GIPR ला पटली. त्यांनी दोन्ही मार्गाचे सर्वेक्षण करायला सांगितलं. कॅलथोर्पने हिरीरीने ते पार पाडले.

१८८७ साली त्याने बार्शीला रेल्वे सुरू करायची म्हणून बार्शी लाईट या नावाने कंपनीही रजिस्टर केली.

कॅलथोर्पने हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून स्वतंत्रपण सरकारकडून परवानगी काढण्याचे प्रयत्न सुरू केले. GIPRने त्याला शेवटची वोर्निंग दिली की हे लष्कराच्या भाकऱ्या भाजयचे बंद करून सुट्टीवरून परत या किंवा सरळ राजीनामा द्या.

कॅलथोर्पसाठी बार्शीचे रेल्वे हे स्वप्न होतं. त्याने नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. हे स्वप्न साकार व्हावे म्हणून तो दिवसरात्र प्रयत्न करू लागला.

अगदी रेल्वेचे डब्बे कसे असावेत, त्याची चाके कशी असावीत, रुळामधील अंतर किती या सगळ्याचा त्याने अभ्यास केला.

पुर्वी पुर्ण जगामध्ये जिथे कुठे नॅरो गेज रेल्वे होती तिथे दोन रुळातले अंतर हे 2 फुट होते.जास्तीत जास्त मालवाहतुक करता  यावी म्हणुन कॅलथोर्पने सर्व अभियांत्रिकी कौशल्य वापरत ते 2 फुट 6 इंच केले व ते यशस्वी झाले

कॅलथोर्पच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे त्याला हवी तशी आगगाडी लीड्स फोर्ज कंपनीने बांधून दिली. इंग्लंडमधील लीड्स येथे याची टेस्ट देखील झाली. कॅलथोर्पने बार्शी लाईटसाठी जे अभिनव प्रयोग केले याचा जगभरात कौतुक झालं.

१८९७ साली बार्शी लाईट सुरू झाली. सुरवातीला बार्शी ते कुर्डुवाडी धावणारी ही रेल्वे काही वर्षातच म्हणजे १९२७ पर्यंत लातूर ते मिरज या ३२५ किमीच्या मार्गावर पूर्ण शक्तीने धावू लागली.

१९१५ साली पंढरपूर येथे रेल्वे स्थानक उभारण्यात आले.

त्या वर्षी खऱ्या अर्थाने बार्शी लाईटची ओळख देवाची गाडी अशी बनली.

या दुष्काळी भागात रेल्वे सुरू करायचं स्वप्न ज्याने पाहिलं तो कॅलथोर्प नॅरोगेज रेल्वेचा उद्गाता म्हणून जगभरात रेल्वे जिनियन म्हणून मानला गेला. १९२७ साली त्याच निधन झालं.

स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी भारतीय रेल्वेने बार्शी लाईटचा ताबा स्वतःकडे घेतला.

पुढे नवीन तंत्रज्ञान येत गेले. भारतभरातल्या रेल्वे गाड्या आधुनिक होत गेल्या मात्र जवळपास नव्वद वर्षे या देवाच्या गाडीने विठूमाउलीच्या लेकरांचीअव्याहतपणे सेवा केली. इतर गाड्यांच्या वेगाशी सामना करणे भाग होते.

करोडो वारकरी माऊलीचा जयजयकार करत टाळ अभंगाच्या सोबतीने जिच्या अंगा-खांद्यावरून आले-गेले त्या एका परंपरेला २००६नंतर टप्याटप्याने विराम देण्यात करण्यात आला.

तिचे प्रतीक म्हणून एक लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन पंढरपूर स्थानकावर सध्या सन्मानाने उभे करण्यात आले आहे.

मध्यंतरी मिरजेहुन लातूरला पाणी पोहचवून दुष्काळी मराठवाड्याची तहान भागवण्याचा प्रयोग याच मार्गावर झाला.

देवाच्या गाडीचा वेग हळू होता मात्र प्रदीर्घ काळ वारकरी संप्रदाय आपल्या परीने प्रवाहित ठेवणारी ती जिवंत लोकवाहिनी होती. आता बार्शीचा ट्रॅक ब्रॉड गेज होऊन तिथे एक्स्प्रेस गाड्या धावतात मात्र वारकऱ्यांचा साधेपणा आणि भक्तीभावात रमलेली देवाची गाडी कोणीही विसरू शकणार नाही.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Dinesh says

    मी या गाडीने प्रवास केला आहे||| कुर्डुवाडी ते बार्शी| माझे गाव पांगरी||

  2. मंगला प्रसाद शेटकर says

    छानच देवाचीगाडी सुंदर सुरेख वण॔न

Leave A Reply

Your email address will not be published.