कोळसा गोळा करणारा मस्तान या दोन गुजराती भावांमुळे तस्करीच्या जगात आला.

तर हा किस्सा आहे समुद्रावर आपली हुकूमत गाजवणाऱ्या दोन भावांचा ज्यांना प्रसिद्ध स्मग्लर हाजी मस्तानचा गुरू मानलं गेलं होतं. या दोन गुजराती भावांनी तयार केलेल्या रस्त्यावर हाजी मस्तान चालला आणि तो मुंबई अंडरवर्ल्डचा बादशहा बनला. तर कोण होते हे दोन भाऊ ? ते होते बखिया बंधू. या बखिया बंधूंकडे बघून अनेक लोकं डॉन बनायची स्वप्न बघू लागले.
लोकं हाजी मस्तानला तस्करीचा किंग मानतात पण जेव्हा हाजी मस्तान मुंबईत बंदरावर कोळसा भरत होता तेव्हा बखिया बंधू समुद्राचे राजे झालेले होते. त्यांचं सोनं थेट जोहरी लोकांकडे पोहचलं जायचं. बखिया बंधू इतक्या हुशारीने आपलं काम करायचे की पोलिसांना एकसुद्धा पुरावा त्यांच्याविरुद्ध सापडला नाही.
बखिया बंधू म्हणजे सुकुर नारायण बखिया आणि राजनारायण बखिया अशी दोन भावांची जोडी होती. जोपर्यंत ते जिवंत होते तोवर सोन्याची स्मगलिंग करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकला नाही. तेव्हा ना कोणी मस्तान किंग होता ना कोणी दाऊद जन्मला होता. अंडरवर्ल्ड बुलेट्स या पुस्तकाच्या अनुसार बखिया बंधू हे गुजरातचे राहणारे होते. मुंबईत येऊन त्यांनी तस्करीत हात आजमावयाला सुरवात केली. 70-80 दशक आलं तेव्हा बखिया बंधू गुजरात,गोवा,दमन आणि मुंबईच्या समुद्राचे बादशाह बनले होते. त्यांच्या हुकूमशिवाय कोणीच तिथं तस्करी करू शकत नसायचं.
हाजी मस्तान तेव्हा कोळसा भरण्याचं काम करून कुटुंब चालवत होता पण जेव्हा त्याला कळलं की बखिया बंधूंची तस्करी ही टॉपची आहे आणि त्यात पैसाही बराच आहे तेव्हा मस्तान बखिया बंधूंकडे गेला. तिथं मस्तानला गोदीतून सोनं बाहेर काढण्याचं काम मिळालं.
एकदा एका केसमध्ये मस्तानने सोन्याऐवजी साबणाने भरलेली गाडी पाठवली आणि नेमकी तीच गाडी जप्त करण्यात आली पण दुसरीकडून मस्तानने सोन्याचा ट्रक बखिया बंधूंना पाठवला होता. बखिया बंधू त्याच्यावर खुश होते. बखिया बंधूंसोबत राहून मस्तानने तस्करीचे फंडे शिकून घेतले आणि आपला स्वतःचा व्यवसाय थाटायचा प्लॅन तो करू लागला. इकडे मोठे बंधू राजनारायण यांचं निधन झालं आणि लहान बंधू सुकुर नारायण एकटे पडले. पण त्यांनी हार मानली नाही आपलं काम त्यांनी नियमित सुरू ठेवलं.
दुसरीकडे मस्तानने तस्करीच्या धंद्यात युसूफ पटेल, वरदा भाई , करीम लाला आणि लल्लू जोगी सोबत करत काम सुरू केलं. त्यांच्यात वाटण्या झाल्या. नंतर एकटं पडलेल्या सुकुर नारायण यांच्या विरोधात एकही पुरावा पोलिसांना सापडत नसायचा. जेव्हा माल पकडला जाई अचानक कोणीतरी जबाबदारी घेऊन जाई त्यामुळे शेवटपर्यंत ते हाती लागले नाही.
सुकुर नारायण यांच्या निधनानंतर मस्तान तस्करीच्या जगात बादशहा झाला पण त्याला बखिया बंधूंसारखी पत मिळवता आली नाही असं आजही बोललं जातं.
हे ही वाच भिडू :
- एका घटनेतल्या प्रामाणिकपणामुळे हाजी मस्तान मुंबईच्या गुन्हेगारीचा ‘ सुलतान ‘ बनला तो कायमचाच….
- उचल्या लोकांनी मस्तानीचे संरक्षण केले. आजही या गावाला ‘उचल्यांचे पाबळ’ म्हणून ओळखतात.
- जयप्रकाश नारायण यांच्यामुळे हाजी मस्तानसहीत ८० गुंडांनी स्मगलिंग सोडून दिली
- अबू सालेम शाहरुखला म्हणाला,” अभी पुलिस कि जरुरत नहीं, मै तुम्हे नही मारुंगा.”