उचल्या लोकांनी मस्तानीचे संरक्षण केले. आजही या गावाला ‘उचल्यांचे पाबळ’ म्हणून ओळखतात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू तसेच अनेक ऐतिहासिक महापुरुषांचे स्मरण ठेवणाऱ्या काही स्मृती अस्तित्वात आहेत. बरेचदा स्थानिक लोकांना याचे भान नसते मात्र ह्या गावाने आपल्या पूर्वजांचा वारसा प्राणपणाने जपला आहे.

गावातल्या सर्वांना जाती-धर्माच्या पलीकडे ह्या वारश्याचा उर भरून अभिमान आहे.

हे गाव म्हणजे पुण्यपासून 60 किलोमीटर अंतरावर असणारे शिरूर-राजगुरूनगर-आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असणारे पाबळ गाव होय. ह्या गावाला इतिहासाचा प्रचंड मोठा वारसा आहे. गावात भैरवनाथ व नागेश्वराचे जुने मंदीर आणि त्यासोबतच पीर आणि नाथांची गोलाकार मंदिरे असा सांस्कृतिक वारसा आहे.

येथील विज्ञान आश्रम देशभरात ग्रामीण तरुणांना तंत्रज्ञान विकसित आणि आत्मसात करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
गावाची प्राचीन वेस आणि जुने वाडे आणि बांधकामे ह्यातून गावाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अंदाज येतो मात्र त्याहूनही सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे येथील मस्तानीसाहेबांची कबर आणि गढी.

आता दीपिकाच्या चित्रपटात हे कुठं दाखवलं आहे असं विचाराल तर तुमची शंका बरोबरच आहे.

सगळ्याच पातळीवर ह्या गावाची सरकारदरबारी नेहमीच उपेक्षा होत आली आहे.

पुणे शहरात जेव्हा बाजीराव पेशवे पहिले बुंदेलखंड वरून राजकुमारी मस्तानी यांना घेऊन परत आले तेव्हा त्यांना पुणे शहरात राहण्यास मज्जाव करण्यात आला होता. मस्तानीला आत्मसन्मानाने स्वतः जगता यावे म्हणून पाबळ-केंदूर व आसपासच्या काही गावांची जहागीर बाजीराव पेशवे यांच्याकडून देण्यात आली. याच काळात ही गढी बांधली गेल्याचे सांगितले जाते.

आज जरी ह्या जागी फक्त भग्नावशेष उरले असले तरी कधी काळी या ठिकानाने सोन्याचे दिवस पाहिले असल्याची कथा गावात पूर्वपार चालत आली आहे.

येथील बऱ्याचशा गावांना कुठल्यातरी प्रसंगावरून किंवा विशेषणांनी ओळखले जाते. पाबळ गावात मस्तानी साहेबांच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील उपेक्षित ‘उचल्या’ समाजावर सोपविण्यात आली होती.

या बहादूर लोकांनी आपल्या राणीचा शूरपणे सांभाळ केला व पुण्याने नाकारलेल्या या राणीला आपल्या गावात सामावून घेतले.

या घटनेवरूनच आजही या गावाला जुनी माणसे ‘उचल्यांचे पाबळ’ म्हणून ओळखतात.

भीमा कोरेगावच्या लढाईतही चढाईसाठी हे गाव निर्णायक सिद्ध झाले, असा उल्लेख इतिहासात आढळतो. राणीसाठी शेजारील गावांकडून दररोज दहा मण लोणी व दुध येत असे, त्यावरून येथील एका गावचे नाव लोणी-धामणी पडल्याचेही सांगण्यात येते.

पुढे आजारपणात मस्तानी साहेबांचा मृत्यू झाला. त्यांची कबर त्यांना बांधून देण्यात आलेल्या गढीच्या परिसरात बांधण्यात आली. या कबरीचे विशेष म्हणजे यावर नेहमी जुईच्या फुलांचा बहर आलेला असतो.

मात्र त्यांच्या या मृत्यूविषयी अनेक अफवा समाजात पसरल्या.

मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केली ही सुद्धा त्यापैकीच एक. वर्षानुवर्षे ही अफवा समाजात होती. दरम्यानच्या काळात जेव्हा ह्या वारश्याकडे समाजाचे दुर्लक्ष झाले तेव्हा मात्र एक अनपेक्षित घटना घडली.

हिरा गिळल्याच्या अफवेवर विश्वास ठेवून काही चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कबरीची नासधूस केली. अर्थात ह्यात त्यांच्या हाती काही लागले नाहीच मात्र ह्या स्थळाचे प्रचंड नुकसान झाले.

सरकारदरबारी ह्या वारसा स्थळाची नेहमीच उपेक्षा झाली.

मरणानंतरसुद्धा मस्तानी साहेबांना ह्या उपेक्षेला सामोरे जावे लागले. इथे विकासाची व इतिहास जपून ठेवण्याची किरकोळ कामेही केली गेली नाहीत. शेवटी गावकऱ्यांनी स्वतः यासाठी कंबर कसली आणि गावाच्या एकीतून ह्या क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले.

गढीचे काम जुन्या दगडांचा वापर करून करण्यात आले. नमाज पढण्यासाठी उरलेल्या भागाची डागडुजी करण्यात आली. त्यावरील जुन्या लाकडी नक्षीकामाचे सुशोभीकरण करण्यात आले आणि कबरीचेही बांधकाम मूळ पद्धतीने त्याच साधनांचा वापर करून पुन्हा पूर्ववत करण्यात आले. ह्याकामी गावकऱ्यांनी सर्व कामात स्वतः सहभाग घेतला आणि आजतागायत ह्या स्थळाची स्वतः जोपासना केली. गावातील प्राचीन मंदिरे, दरवाजे असणारे प्रचंड मोठे बारव आणि विहीर व इतर जुन्या वास्तूंचे गावकऱ्यांनी प्राणपणाने जतन केले आहे.

गावातल्या लोकांना ह्या स्थळाचा आणि आपल्या राणीचा आजही अभिमान आहे.

गावातल्या कॉलेजात मस्तानीसाहिबांचे एक मोठे तैलचित्र दर्शनी भागात लावण्यात आले आहे. नुकतेच इथे मस्तानीच्या काही वंशजांनीही भेट दिली होती.

कधीतरी वाट वाकडी करून ह्या गावाला जाऊन आपल्याला नुसत्या जन्माच्या जोरावर मिळालेल्या वारशाचे स्मरण कसे ठेवावे ह्याचा वस्तुपाठ नक्की पाहून या.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Asif Ansari says

    Are me pabal cha aahe Bhaau Ya Kadhi Tari

  2. Pawar says

    Lockdown end zalyawar yeu ki

Leave A Reply

Your email address will not be published.