जयप्रकाश नारायण यांच्यामुळे हाजी मस्तानसहीत ८० गुंडांनी स्मगलिंग सोडून दिली

बच्चनचा दिवार आठवतोय?  यात एक सीन आहे. डॉकवर काही गुंड मजुरांच्याकडून खंडणी गोळा करत असतात, नाही म्हणणाऱ्याला ठोकत असतात. असाच एक कामगार त्यांना खंडणी द्यायला नकार देतो. त्याला ते सगळीकडे शोधतात पण तो त्यांची वाट बघत त्यांच्याच अड्ड्यावर बसलेला असतो.

“पीटर तुम मुझे उधर ढूंढ रहे थे और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा था !!”

तोंडात बिडी चघळत थंड नजरेने बच्चनने हा डायलॉग म्हटला आहे. त्या एका डायलॉग वरून कळतं हा पुढे जाऊन त्या गुंडांची किती धुलाई होणार आहे. पण हा फक्त पिक्चरमधला सीन नव्हता. ते एका माणसाच्या खऱ्या आयुष्यात घडलं होतं.

तो माणूस म्हणजे मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तान !

दिवारच्या आधी अमिताभ बच्चनने हाजी मस्तान सोबत काही दिवस राहून त्यांची स्टाईल शिकून घेतली होती असं म्हणतात. बच्चनचा दिवार असू दे नाही तर अजय देवगणचा वन्स अपोन टाईम इन मुंबई, आजवर अनेकांनी हाजी मस्तानला मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केलाय.

त्याच्यानंतर दाऊदसारखे अनेक डॉन मुंबईत होऊन गेले मात्र मस्तानची बरोबरी कोणीच करू शकत नाही. काय होत त्याच्यात असं विशेष?

१ मार्च १९२६ साली तामिळनाडूच्या कुड्डलोर गावात एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. खरं नाव मस्तान मिर्झा. शेतीतून विशेष उत्पन्न येत नव्हत. सावकारांच्या कर्जत बुडालेल्या बापाने दोन वेळच्सया जेवणाची भ्गरांत सुरु झाल्यावर सगळ कुटुंब घेऊन मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत क्रॉफर्ड मार्केट जवळ त्याने सायकल पंक्चर काढायचं दुकान सुरु केलं. तिथ बापाबरोबर बसून मस्तानने आयुष्याची शाळा शिकली. अहं धावत्या मुंबईने त्याला ती शिकवली.

पुढे जरा मोठा झाल्यावर मस्तान पोर्टवर हमाल बनला. तेव्हा इंग्रजांच राज्य होतं. भारतात इलेक्ट्रोनिक वस्तू, घड्याळे यांची निर्मिती होत नव्हती. आयातनिर्यातीचे नियम प्रचंड कडक होते. मस्तानला एक गालिब शेख नावाचा माणूस भेटला. त्याने त्याला बंदरावर हमाली करताना स्मगलिंग कशी करायची हे शिकवलं. थोड्याच दिवसात मस्तान त्यात एक्स्पर्ट बनला.

फिलिप्सचे ट्रांझिस्टर, घड्याळे यांची तस्करी करून मस्तानचा मस्तान भाई झाला.

मुंबईपासुन गुजरात पर्यंत त्याचं स्मगलिंगचं राज्य पसरल. त्याकाळी मुंबईतही भाई लोक होते. त्यांच्या गँग होत्या. वरदराजन मुदलियार, करिम लाला असे डॉन होते मात्र मस्तानचा दराराच काही और होता. त्याने कधी स्वतः हातात बंदूक घेतली नाही किंवा कोणाचा खून केला नाही पण त्याच्या नावाची गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड दहशत होती.

हाजी मस्तानच्या गाड्या, त्याची स्टाईल, त्याचं समुद्रकिनार्यावरचं अलिशान घर, त्याचे फिल्मी हिरोइन्सबरोबर असलेले अफेअर, बच्चन पासून फिरोज खान, दिलीप कुमार यांच्याबरोबरची मैत्री, इतके असूनही गरिबांना लोकांना भरभरून मदत करण्याची दानत या सगळ्या गोष्टी मुंबईत एक दंतकथाच बनल्या होत्या.

त्याने लग्न केलं होत ते पण मधुबालाच्या ड्युप्लिकेट सोना बरोबर. तिला सुपरस्टार हिरॉईन बनवण्याच्या प्रयत्नातून पिक्चरसुद्धा बनवले. मस्तान आपल्याच मस्तीत जगत होता.

कित्येकजण होते ज्यांना हाजी मस्तान बनायचं होत, त्याच्या प्रमाणे मुंबईवर राज्य करायचं होतं.

हाजी मस्तानचे सगळे घोडे रेसकोर्स वर पहील्या नंबरवर धावत होते आणि अचानक एक घटना घडली ज्यामुळे सगळ चित्रच पालटल.

इंदिरा गांधीनी लादलेली आणीबाणी.

अनुशासन पर्व म्हणून ओळखल्या गेलेल्या या काळात भारतातली गुन्हेगारी संपवायची म्हणून इंदिरा गांधीनी प्रयत्न केले. अस म्हणतात की त्याकाळी मुंबई कॉंग्रेसचा एक मोठा नेता हाजी मस्तानला अटक व्हावीम्हणून इंदिरा गांधींच्या ऑफिसात धरणे धरून बसला होता.मस्तानला जेव्हा आपल्या अटकेची भनक लागली तेव्हा त्याने पंतप्रधानांना मोठी लाच देण्याचा प्रयत्न केला.

पण याला भिक न घालता इंदिरा गांधीनी त्याच्या अटकेचे आदेश दिले.

पंतप्रधानांनी लाच घेती नाही पण त्यांच्या खालचे नेते अस करू शकत नव्हते. अगदी हवालदारापासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सगळीकडे मस्तानचा हफ्ता जात होता. पोलिसांनी त्याला नावाला अटक केली पण तुरुंगात त्याची बडदास्त ठेवली.

याच तुरुंगाच्या काळात त्याची ओळख आणीबाणीचे हिरो जयप्रकाश नारायण यांच्याशी झाली. जनता पक्षाचे अनेक नेते त्याकाळी तुरुंगात होते. अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी भूमिगत झाले होते. हाजी मस्तानचे जनता पार्टीशी सूर जुळले. जेपींच्या विचारांनी तो भारावून गेला होता.

जनता पार्टीच्या भूमीगत नेत्यांना पोलिसांपासून वाचवण्यासाठी हाजी मस्तानने मदत केली. त्याचे प्रोटेक्शन वापरून मोठमोठे नेते मुंबईत लपून बसले होते आणि कोणाला भनक देखील लागली नाही. हाजी मस्तानच्या पर्सनॅलिटीच्या प्रेमात जनता पार्टीदेखील पडली होती.

पुढे आणीबाणी उठली, जनता पार्टीचे सरकार आले. सिंहासन खाली करो कि जनता आती है। च्या घोषणा देत इंदिरा गांधींचा पराभव झाला.

मोरारजी देसाईंनी पंतप्रधान झाल्या झाल्या सगळ्या राजकीय कैद्यांची सुटका केली. यात हाजी मस्तानचा देखील समावेश होता. १८ महिन्यांच्या त्या कारावासामुळे त्याच आयुष्यच बदलून गेलं होतं. त्याने गुन्हेगारीविश्व सोडून दिलं.

मस्तानला आता राजकारणात इंटरेस्ट आला होता.

आणिबाणीमध्ये जेलमध्ये गेलेले सगळे नेते स्वतःला नवा स्वातंत्र्यसैनिक म्हणवून घेत होते. हाजी मस्तानसुद्धा याचा भाग होता. तो स्वतः तर सुधारलाच पण सोबतच त्याने इतरांना देखील स्मगलिंग आणि काळ्या धंद्यांतून बाहेर पडायला लावलं.

३० एप्रिल १९७७ रोजी अख्ख्या मुंबईला धक्का देणारी एक अनोखी घटना घडली.

जयप्रकाश नारायण  तेव्हा आजारी असल्यामुळे मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल ऍडमिट होते. तेव्हा हाजी मस्तानने जसलोक हॉस्पिटलच्या ऑडिटोरियममध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला. मुंबईचे सगळे नामचीन स्मगलर तिथे हजर होते.

जयप्रकाश नारायण यांच्यासमोर हाजी मस्तानच्या नेतृत्वाखाली जवळपास ८० स्मगलरनी सर्व काळे धंदे सोडणार असल्याची प्रतिज्ञा घेतली.

हाजी मस्तानच्या आजवरच्या स्टाईलप्रमाणे अगदी फिल्मी सोहळा पार पडला. देशातली सगळी मिडिया हे दृश्य टिपण्यासाठी हजर होते. दुसऱ्या दिवशी ब्रेकिंग न्यूज म्हणून अगदी आंतरराष्ट्रीय लेव्हलला हि बातमी पोहचली.

काही टीकाकारांनी हाजी मस्तानचा फिल्मी तमाशा म्हणून देखील या कार्यक्रमाची संभावना केली. सर्वसामान्य जनतेने मात्र मस्तानचं कौतुक केलं. युसूफ पटेल, गुजरातचा सुकूर बाखिया असे अनेक स्मगलर या प्रतिज्ञेमध्ये सहभागी होते. मुलाखत घेतल्यावर ते म्हणाले,

“आम्ही प्रतिज्ञा घेतली याचा अर्थ असा नव्हे की आम्ही स्मगलर आहे हे मान्य केलय. आम्ही जी प्रतिज्ञा घेतली ती प्रत्येक राष्ट्राभिमानी भारतवासियाने घेतली पाहिजे.”

बाकीच्यांचं माहित नाही पण मस्तान मात्र या काळ्या गुन्हेगारी जगापासून दूर आला. आपल्या पांढर्या कपड्यां प्रमाणे व्हाईट कॉलरधंदा करायचा त्याने ठरवल होतं. जनता पार्टीतर्फे राजकारणात घुसायची तयारी केली पण अवघ्या दोन वर्षातच त्यांचे सरकार कोसळले. इंदिरा गांधीनी कमबॅक करत त्यांची धूळधाण केली.

सगळे आणीबाणीचे हिरो फ्लॉप झाले होते.

पण मस्तानच्या डोक्यातून राजकारणाचे खूळ उतरले नाही. त्याने दलित नेते जोगेंद्र कवाडे यांच्या सोबतीने दलित-मुस्लिम सुरक्षा महासंघ नावाचा पक्ष उभारला. त्याच्या पक्षाने मुंबई, कलकत्ता मद्रास अशा मोठ्या शहरांमध्ये निवडणुका लढवल्या. स्वतः दिलीप कुमार सगळीकडे त्यांचा जोरदार प्रचार करत होता. पण दुर्दैवाने मस्तानच्या पार्टीला एकाही]जागेवर यश मिळाले नाही.

हाजी मस्तानने आपल्या मृत्युपर्यंत हा पक्ष चालवला. त्याचा दत्तक मुलगा सुंदर शेखर हा आजही या पक्षाचा अध्यक्ष आहे. काही निवडणुका ते लढवतात मात्र किंग हाजी मस्तानला जे जमल नाही ते त्याला कुठून जमणार आहे?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.