सिनेमा असो कि गणपती, गेली सत्तर वर्षे अख्खा भारतदेश त्यांच्या डान्स स्टेप कॉपी करतो.

शिक्षण केवळ चौथी. बाल वयात ज्याने वडिलांना मदत म्हणून कापड गिरणीत काम केले त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल कि ‘तो’ जगप्रसिद्ध दिग्दर्शक बनेल. पण, त्याने अजाणत्या वयात पडेल ती काम करून एक दिवस महान अभिनेता बनला. तो अलबेला आहे मास्टर भगवान अर्थात भगवान आबाजी पालव होय. आज मास्टर भगवान यांचा स्मृतिदिन. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

१ ऑगस्ट १९१३ या दिवशी सिंधुर्दुगमध्ये मास्टर भगवान यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल हे कापडाच्या कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. शाळा शिकत असतानाच वडिलांसोबत भगवान दादा कामावर जायचे.पण, चित्रपटाची आवड असलेले दादा फार काळ तिथे रमले नाहीत.

दादांनी चौथीतच शाळेतून पळ काढत स्टुडिओचा रस्ता धरला.

अभिनेते मास्टर विठ्ठल हे भगवानदादांचे दैवत होते. त्यामुळे चित्रपटात स्टंटबाजी, फाइट सीन्स करायची स्वप्ने पाहत भगवानदादांनी आपल्या शरीरावर, व्यायामावर मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीमुळे त्यांना रजतपटावर चमकण्याची संधी मिळाली.

१९३० मध्ये निर्माता सिराज अली हकीम यांच्या ‘बेवफा आशिक’ या मूकपटामध्ये त्यांना आपले कौशल्य दाखवण्याची एक संधी मिळाली. दादांना ‘हिम्मत-ए-मर्दा’ या पहिल्या बोलपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात काम करत त्यांनी ‘जागृती पिक्चर्स’ या चित्रपट संस्थेची आणि भगवान आर्टस् प्रोडक्शीनची निर्मिती केली होती. या संस्थेद्वारा त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. यासोबतच ‘जागृती स्टुडिओ’ही दादांनी उभारला.

या प्रोडक्शन हाऊसखाली मतलबी, लालच, मतवाले, बदला यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हिम्मत-ए-मर्दा हा त्यांचा पहिल्या बोलपटानंतर 1938 ते 1949 च्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

भगवानदादा यांनी आपल्या डान्स आणि अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीला विनोदाची एक वेगळी ओखळ करून दिली जी आजही भगवान दादांच्याच नावाने ओळखली जाते.

त्या काळात जुहू चौपाटी परिसरात भगवान दादांचा २५ खोल्यांचा बंगला होता. आठवड्याच्या प्रत्येक दिवसानुसार घरातून बाहेर काढावी अशा सात गाड्यांचा ताफा दादांकडे  होता. 

‘भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे’.किंवा ‘शोला जो भडके दिल मेरा धडके’..ही थिरकायला लावणारी गाणी भगवान दादांचीच आहेत हे आजच्या पिढीला माहितीही नसेल.

झनक झनक पायल बाजे, चोरी-चोरी, दोस्ती, जालान, भेदी बंगला तसेच बडे साहेब, दामाद, गजब, राम भरोसे, भुले भटके, गुंज, तराना, एक से बढ कर एक, शराबी यासारख्या शेकडो चित्रपटात दादांनी काम केले.

भगवान दादा यांची साधी सरळ सोपी पण अनोखी डान्स स्टाईल गेली सत्तर वर्षे फेमस आहे.

सुपरस्टार अमिताभ बच्चन गोविंदा असो कि गणपतीमध्ये नाचणारी मुलं असो अख्खा भारत देश भगवान दादा ना कॉपी करतो.   

१९४२  मध्ये दादा आणि ललिता पवार एका चित्रपटात काम करत होते. एका सीनदरम्यान दादांनी ललिता पवार यांना चापट मारायची असा सीन होता. त्यावेळी त्यांनी  ही चापट एवढ्या जोरात मारली होती की, त्यामुळे ललिता पवार यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला अर्धांगवायु झाला होता. खुप महिन्याच्या उपचारानंतर ललिता पवार बऱ्या झाल्या.

किशोर कुमार यांना घेऊन बनवीत असलेल्या ‘हसते रहना या चित्रपटाची निर्मिती करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या चित्रपटासाठी त्यांनी सर्व बचत, बायकोचे दागिने खर्च केले. एवढे करूनही चित्रपट पूर्ण झालाच नाही. आणि काही काळातच बंगला, गाड्या विकून भगवानदादा दादर टी. टी. येथील दोन खोल्यांच्या चाळीत राहू लागले.

चाळीत आल्यावर लीड रोल करणारे भगवानदादा चित्रपटात साइड रोल, छोट्या भूमिका करायला सुरवात केली. मात्र, त्यांच्या मद्यपानाच्या सवयीचा फायदा अनेक निर्मात्यांनी पैशांऐवजी दारूच्या बाटल्या दादांच्या हाती टेकवल्या. 

दिलीप कुमार हे ज्या-ज्यावेळी दादरवरुन जात त्यावेळी गाडीचा मोठ्याने हॉर्न वाजवून दादांना हात दाखवल्याशिवाय पुढे जात नसत. सुनील दत्त, ओमप्रकाश, राजेंद्रकृष्ण, सी. रामचंद्र आदी चित्रपटसृष्टीतील फार कमी लोकांनी निर्धन झालेल्या भगवानदादांशी संपर्क ठेवला होता.

अतिश्रीमंत असणाऱ्या दादांनी दोन खोल्यांच्या घरातील वातावरण तेवढ्याच सहजतेने स्विकारले होते.

२५ खोल्यांच्या बंगल्यातून २ खोलीपर्यंतचे सगळे टप्पे दादांनी अनुभवले. दादरच्या या दोन खोल्या शेवटच्या क्षणी त्यांच्या सोबती बनल्या. अखेर ४ फेब्रुवारी २००२ रोजी या महान कलाकाराने शेवटचा श्वास घेतला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.