त्यांनी नथुरामला एका फटक्यात पकडले अन् त्याच्या हातातला सुरा काढून घेतला.

सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर जवळच भिलार गाव. आज अख्खा देश या गावाला पुस्तकांचं गाव म्हणून ओळखतोय. पण तरिही आज या गावाची ओळख, गांधीजींना वाचवणाऱ्या भिलारे गुरुजींचं गाव अशीच आहे.

भिकू दाजी भिलारे. जन्म २६ नोव्हेंबर १९१९.

भिलार गावच्या प्राथमिक शाळेतले एक शिक्षक. गावच्या तालमीत लहानपणापासून पहिलवानकी केलेली. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातल्या दऱ्याखोऱ्यात वाढलेला हा तरुण मावळा पारतंत्र्यात राहण्यासाठी जन्माला आला नव्हता. गांधीजीच्या विचाराने भारावून गेलेल्या त्या काळात भिलारे गुरुजीनीही कॉंग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रचळवळीत उडी घेतली.

१९४२ च्या चलेजाव आंदोलनावेळी गांधीजीसह कॉंग्रेसच्या सगळ्या नेत्यांना अटक केली गेली होती. देशभर कार्यकर्ते स्वतःला पटेल त्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करू लागले. ब्रिटीश सत्ता भारतातून घालवून द्यायची याच उद्देशाने पेटून उठलेले सातारा जिल्ह्यातले तरुण नाना पाटलांच्या प्रतिसरकारच्या झेंड्याखाली एकत्र येत होते. भिलारे गुरुजी देखील या क्रांती यज्ञात सामील झाले.

किसन वीर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक जणांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भूमिगत काळात फक्त पत्रके पोहचवण्यासाठी सायकलवरून सातारा ते मुंबई हा जीवावर बेतणारा प्रवास केला . प्रतिसरकारच्या क्रांतीकार्याबरोबर त्यांचे रचनात्मक कार्यही सुरूच होते. १९४३ साली महाबळेश्वर येथे ग्रामोन्नती संघाची स्थापना करून अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम हाती घेतलं.

६ मे १९४४ साली महात्मा गांधींची प्रकृती अस्वस्थामुळे जेलमधून सुटका झाली.

पुणे येथे कैदेत असतानाच गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सेक्रेटरी  महादेव देसाई यांचा मृत्यू झाला होता. गांधीजींना देखील मलेरियाने जखडले होते. जर त्यांचा काही कारणास्तव तिथे मृत्यू झाला असता तर अख्खा देश पेटून उठला असता. यामुळे इंग्रज सरकारने त्यांना सोडायचा निर्णय घेतला होता.

गांधीजीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांची रवानगी पाचगणी येथे करण्यात आली. गांधीजी च्या तिथल्या प्रार्थना सभा भेटायला येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था राष्ट्र सेवा दलाच्या तरुणांना देण्यात आली होती. यात भिलारे गुरुजी देखील होती.

भिलारे गुरुजी सांगतात त्याप्रमाणे एक दिवस पुण्याहून अठरा वीस तरुणांचे टोळके पाचगणीला आले. आल्या आल्या त्यांनी गावात गांधीजीविरुद्ध घोषणाबाजी सुरु केली. यामध्ये पुण्याच्या हिंदू राष्ट्र या वर्तमानपत्राचा संपादक नथुराम गोडसे देखील होता. हा गोंधळ पाहून गांधीजीनी त्यांना चर्चेला बोलवा म्हणून सांगितले. पण नथुराम आला नाही.

संध्याकाळची प्रार्थना सभा सुरु झाली. सेवा दलाच्या तरुणांना अंदाज होताच की पुण्याहून आलेले टोळके काही ना काही विघ्न आणणार. यामुळेच त्यांनी गांधीजीच्या संरक्षणासाठी गुप्त व्यवस्था केली होती. सभा सुरु झाली. इतक्यात कोणाला तरी दिसले नथुराम गोडसे हातात जंबिया घेऊन गांधीजीवर चालून येत आहे.

भिलारे गुरुजींनी नथुराम ला बरोबर हेरले होते. त्यांनी धावणाऱ्या नथुराम ला एका फटक्यात पकडले. त्याच्या हातातला तो भयानक सुरा काढून घेतला. सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला सभागृहा तून बाहेर काढून चोप दिला . गांधीजीनी समजावून सांगितल्यावर त्याला जावू देण्यात आले.

गांधीजींचे नातू तुषार गांधी यांनी हा किस्सा आपल्या पुस्तकात लिहून ठेवला आहे. पुढे गांधीजींची हत्या झाल्यावर नथुराम गोडसे वर कपूर आयोगा पुढे जी सुनावणी झाली तेव्हा पुण्याच्या जोगळेकर नावाच्या पत्रकाराने साक्ष दिलेली की नथुरामने पाचगणीला गांधीजींवर हल्ला केला होता.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.