हजारो लोक ओढत असलेला जगन्नाथाचा रथ एका मुस्लिम भक्ताच्या प्रार्थनेसाठी थांबतो

पुरीची जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा आजअखेर पर्यंत निर्धारित वेळेनुसारच सुरु आहे. शतकानुशतके चाललेल्या या रथ यात्रेच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडत असेल की, हा भव्य उत्सव भाविकांविना आयोजित केला जात असेल. पुरीतील भगवान जगन्नाथांवर त्यांच्या भक्तांच अतीव प्रेम आहे, म्हणूनच त्यांना भक्त वत्सल म्हणूनही ओळखलं जातं.

प्रथा व परंपरेनुसार विशिष्ट धर्मातील लोकांना पुरीच्या मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. ही प्रथा सार्वभौमत्वाच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचं दिसतं. ज्याची व्याख्या स्वतः पुरीच्या श्रीकृष्णाने केली आहे. दुसरीकडे, ही यात्रा भक्तांच्या वैश्विक प्रेमाची आणि भक्तीची अभिव्यक्ती आहे.

एका मुस्लिम भक्ताचा देवावर असणाऱ्या प्रेमाचा किस्सा या जगन्नाथ पुरीत लोकप्रिय आहे. 

रथयात्रेच्या वेळी, देवाचा हा रथ ग्रँड रोडपासून  (किंवा बडा डंडा) २०० मीटर अंतरावर पुढे सरकतो. आणि मग नंदीघोष म्हणजेच भगवान जगन्नाथचा रथ उजव्या बाजूला असणाऱ्या कबरीशेजारी थांबतो. हा रथ इथं थोड्या वेळासाठी थांबतो, त्या दरम्यान थडग्यात विश्रांती घेत असलेल्या आत्म्याचं स्मरण केलं जात, त्यानंतर रथ आपल्या मार्गावर पुढं निघतो.

या थडग्या शेजारी देवाचा रथ थांबवण्याच्या प्रथेमागे एक रंजक कथा आहे.

हि घटना शेकडो वर्षांपूर्वी मुघल काळात घडली होती.

जहांगीर कुली खान हा मुघल बादशहा जहांगीरच्या कारकीर्दीत बंगालचा एक वर्षासाठी  (१६०७-१६०८) सुभेदार होता. त्याला लालबेग या नावानं देखील ओळखलं जायचं. ओडिशाच्या एका सैन्य प्रवासात त्यानं  एका तरुण ब्राह्मण विधवेस स्नान करताना पाहिलं.

त्या बाईच्या सौंदर्यानं लालबेग तिच्याकडे आकर्षित झाला. त्याने त्या महिलेस जबरदस्तीने आपल्या घोड्यावर बसवलं आणि आपल्याबरोबर घेतलं. तो त्या बाईच्या प्रेमात पडला होता त्यामुळं त्यानं तिच्याशी लग्न केलं.

त्यांना एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव सालबेग ठेवण्यात आलं. आई जवळ राहणारा सालबेग सुरुवातीपासूनच भगवान जगन्नाथ यांच्या भक्तीत वळला कारण त्याची आई याच परमेश्वराची भक्त होती.

पण भगवान जगन्नाथच्या मंदिरात मुस्लिम भक्तांना प्रवेश करण्यास मनाई होती.

मुघल पूर्वजांच्या छायेत वाढलेला एक तरुण मुस्लिम, सालबेगला भगवान जगन्नाथांवरची आपली भक्ती वाढवण्यास फार काळ लागला नाही. त्यांच्या भक्तीच्या कहाण्या अजूनही असंख्य स्तोत्र आणि गाण्यांमध्ये जिवंत आहेत. पण सालबेगला एक खंत होती ती म्हणजे, त्याच्या वेगळ्या धर्मामुळे तो स्वत:च्या देवाचीच उपासना करण्यासाठी मंदिरात जाऊ शकत नव्हता.

असं म्हणतात की, त्याने श्रीकृष्णाच्या भक्तीच्या समर्पणासाठी किमान एक वर्ष वृंदावन म्हणजे श्रीकृष्णच्या जन्मभूमीत घालवलं.

अशी आख्यायिका आहे की सालबेग रथ यात्रेसाठी सामील होण्यासाठी ओडिशात परत येत असताना आजारी पडला. त्याच शरीर जवळजवळ मरणासन्न अवस्थेत असताना त्याने भगवान जगन्नाथांना एकदा तरी दर्शन देण्याची मनोमन विनंती केली. देवाच्या स्तुतीमध्ये शेकडो गाणी आणि स्तोत्रे गाणारा सालबेग याचा त्याच्या देवावर अटळ विश्वास होता.

त्याच्या आत्म्यातून निघणाऱ्या आवाजाने भगवान जगन्नाथ सुद्धा हादरले. यात्रा सुरू झाली तेव्हा परमेश्वराचा रथ सालबेगच्या झोपडीसमोर थांबला आणि पुढं सरकलाच नाही.  कारण सालबेगच्या आत्म्याचा आवाज ऐकून, रथ थांबायला दैवी मान्यता मिळाली होती.

अशाप्रकारे भगवान जगन्नाथ आपल्या कट्टर भक्ताकडे गेले आणि त्यांना आपल्या रथात येऊन पूजा करण्याची परवानगी दिली. भगवान जगन्नाथचा रथ सालबेगला मान देऊनच पुढे सरकला होता.

आणि आजही ही परंपरा चालू आहे. हजारो लोक ओढत असलेला जगन्नाथाचा रथ सालबेगच्या  प्रार्थनेसाठी थांबवावाच लागतो.

सुंदरानंद विद्याविनोद आणि सुकुमार सेन यांच्यासारखे समीक्षक सालाबेगला १७ व्या शतकातील ओडिशाचा प्रस्थापित भक्ती कवी म्हणून ओळखतात. हिंदी, बंगाली आणि उडिया भाषेत लिहिलेल्या त्याच्या वैष्णव श्लोकांचा संशोधनासाठी आजही आधार घेतला जातो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.