‘महात्मा गांधी हे त्या काळचे सगळ्यात मोठे हिंदु भक्त होते’ असं सांगणारं पुस्तक येतय…

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे दिल्लीमधील राजघाटावर महात्मा गांधी यांच्यावर लिहिलेल्या एका नव्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत.

‘मेकिंग ऑफ ए हिंदू पॅट्रियॉट: बॅकग्राउंड ऑफ हिंद स्वराज’

असं नाव असलेल्या या पुस्तकाचे लेखक जे. के. बजाज आणि एम डी श्रीनिवास असे आहेत. बजाज हे दिल्ली स्थित ‘सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’मध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर श्रीनिवास हे विश्वस्त आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनाला या लेखकांसोबतच केंद्रीय मंत्री प्रहलाद पटेल आणि वी मुरलीधरन हे देखील उपस्थित राहणार आहेत.

लेखक बजाज यांनी या पुस्तक प्रकाशनापूर्वी माध्यमांना या पुस्तकाबद्दल सविस्तर मुलाखती दिल्या.

यात त्यांनी जवळपास १००० पानांच्या या पुस्तकाविषयी विविध गोष्टी आणि विशेषतः महात्मा गांधी यांचं हिंदुत्व उलगडून सांगितलं आहे. पुस्तकामध्ये त्यांच्या १८९१ ते १९०९ पर्यंत लिहीलेल्या ‘हिंद स्वराज’ मधील हस्तलिखितांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

या पुस्तकात लेखकांनी महात्मा गांधी यांचा त्या जमान्यातील ‘सर्वश्रेष्ठ हिंदू’ म्हणून उल्लेख केला आहे. सोबतच त्यांचा जन्माने हिंदू ते जागरूक हिंदू बनण्याचा प्रवासाच देखील वर्णन केलं आहे. सोबतच त्यांची देशभक्ती, स्वदेशी शिक्षण यावरील विचार याविषयी देखील सविस्तर लिखाण केलं आहे.

लेखक बजाज यांनी सांगितलेल्या माहितीवरून या पुस्तकात महात्मा गांधी यांची,

धर्म आणि देशभक्ती विषयक मत :

महात्मा गांधी यांचं विविध धर्म आणि देशभक्ती याविषयी स्पष्ट मत होती. त्यांच्या मते,

एक चांगला मुसलमान खरा देशभक्त होऊ शकतो, एक चांगला हिंदू खरा देशभक्त होऊ शकतो, एक चांगला ख्रिश्चन खरा देशभक्त होऊ शकतो. पण जर तो मूलतः चांगला हिंदू, मुसलमान किंवा ख्रिश्चन नसेल तर तो खरा देशभक्त होऊच शकत नाही.

महात्मा गांधी यांनी देशाला शिकवले की, जर तुम्हाला तुमचा धर्मच ओळखता आला नाही तर तुम्ही देशप्रेमी असूच शकत नाही. त्यामुळे मी देखील त्यांच्या मताशी सहमत आहे असे बजाज म्हणतात. कारण धर्म ही सभ्यता आहे. देश प्रेम हे फक्त भौतिक गोष्टीतून येत नाही तर ते आपल्या सभ्यता आणि विचारांशी जोडलेले असते.

धर्म, हिंदुत्व आणि देशप्रेम यांच्या वैशिष्ट्यांना पुस्तकामध्ये अगदी सविस्तर सांगितल आहे. ते असं की, महात्मा गांधी यांच्यासाठी धर्म, हिंदुत्व आणि देश प्रेम या पैकी कोणत्याही गोष्टी वेगवेगळ्या नाहीत.

बजाज यांनी सांगितलं कि, महात्मा गांधी यांचा धर्म हा त्यांच्या माणसांसाठी होता. ते सातत्याने म्हणायचे की त्यांच्यासाठी देशप्रेम आणि धर्म या दोन्ही समानच गोष्टी आहेत. त्यामुळेच मला माझ्या देशासाठी, माझ्या स्वतःच्या धर्मासाठी आणि माझ्या स्वतःच्या लोकांसाठी प्रेम हे एकाच स्रोतांमधून येत.

रशियन लेखक टॉलस्टॉय आणि महात्मा गांधी यांची खूप चांगली ओळख होती. बजाज म्हणतात टॉलस्टॉय गांधी यांच्या हिंदू देशप्रेमावरील विचारांवर काहीसे नाराज होते. टॉलस्टॉय यांच्या मते गांधी सार्वभौमी नव्हते. यावर गांधीनी पुढे जाऊन प्रतिक्रिया दिली की,

माझं देश प्रेम आणि माझा धर्म हे दोन्ही सर्वांसमोर आहे. त्याला कोणीही जवळून बघू शकतो. माझं देश प्रेम माझ्या धर्मातूनच येतं त्यामुळे ते वेगळे असू शकत नाही.

धर्म परिवर्तनावर महात्मा गांधी यांचं मत : 

१९१४ मध्ये महात्मा गांधी यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा प्रवास केला. यावेळीच्या देखील काही गोष्टींचा या पुस्तकात उल्लेख केला आहे.

इंग्लंडमध्ये गांधीजींनी संस्कृत मध्ये गीता वाचली होती असा दावा लेखकांनी केला आहे. सोबतच पुढे गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले तेव्हा प्रीटोरियामध्ये पहिल्या वर्षाच्या दरम्यान त्यांचा एक मदतनीस मुस्लिम होता आणि अटॉर्नी ख्रिश्चन होता.

गांधी हे खूपच धार्मिक व्यक्ती असल्यामुळे त्या दोघांनी गांधी यांना आपल्या दोघांपैकी एकाच्या धर्मात येण्याचा प्रस्ताव दिला. गांधीजी यांनी यावर विचार करून सांगेन असं त्या दोघांना सांगितलं.

सोबतच ते म्हणाले कि, माझ्या धर्म परिवर्तनाच्या आधी मला याबद्दल देखील आश्वस्त व्हाव लागेल की माझा स्वतःचा धर्म माझ्या अपेक्षांना पूर्ण करू शकत नाही. किंवा पूर्ण करण्यासाठी सक्षम नाही. जर मला माझ्या धर्मात काही कमतरता जाणवली तर मी नक्कीच तुमच्या धर्मात येईन. असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. 

बजाज यांनी पुढे सांगितले कि, यानंतर गांधीजी यांनी एक जैन मुनि शीलवंत रायचं यांच्या मदतीने हिंदुत्वावर अनेक पुस्तक वाचली. त्यातून त्यांनी हिंदू धर्म समजावून घेण्याचा प्रयत्न केला. सोबतच ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मावरती पण जास्तीत जास्त पुस्तक वाचून काढण्याचा प्रयत्न केला.

यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की त्यांच्या धर्मामध्ये कोणतीही कमतरता नाही. त्यामुळेच त्यांना इतर कोणत्या धर्मामध्ये जावे याची आवश्यकता वाटली नाही. याच वाचनानंतर ते प्रकृतिक हिंदू पासून जागरूक आणि विद्वत्तापूर्ण हिंदू बनले.

बजाज यांच्यामते, महात्मा गांधी हे देखील कोणाचही धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यांची अशी इच्छा होती कि, प्रत्येकाने आस्थेने आणि विश्वासाने स्वतःच्या धर्मांचे पालन करावं, त्याबद्दल शिकावं, आचरण करावं. कारण त्यांच्या मते धर्मच तुम्हाला देशपेमाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो.

मिशनरींनविषयी आयुष्यभर नकारात्मकता : 

या पुस्तकानुसार, महात्मा गांधी यांनी गुजरातमधील आपल्या घरात आणि शहरात विविध धार्मिक विश्वासांच्या सहिष्णुतेच्या भावनेचा अनुभव घेत असतानाच त्यांनी अगदी लहान वयातच त्या वेळी चालत असलेल्या मिशनरी कारवायांना नापसंती दर्शवली.

गांधीजी आपल्या लिखाणात म्हणतात “… बऱ्याच गोष्टी एकत्रित केल्याने सर्व श्रद्धा मला सहिष्णू बनवतात. पण त्यावेळी फक्त ख्रिस्ती धर्म माझ्यासाठी अपवाद होता. माझ्या मनात या धर्माविषयी एक प्रकारची नापसंती तयार झाली होती. आणि ती एकाच कारणास्तव होती. ते म्हणजे त्या काळी ख्रिस्ती मिशनरी हायस्कूलजवळील कोपऱ्यात उभे राहून हिंदूवर अत्याचार आणि त्यांच्या देवांची विटंबना करत असत.

सर्व धर्मांबद्दल सहिष्णू असलेल्या गांधीजींच्या मानत मिशनरींविषयी पुढे मात्र आयुष्यभर नकारात्मकता राहिली. असं हि लेखक म्हणतात .

हिंदू – मुस्लिम ऐक्य : 

महात्मा गांधी हे यांना जाणीव होत कि, ब्रिटिश सरकार भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजाला कधीच एकत्र येऊ देणार नाहीत. पण ते या मताशी देखील ठाम होते कि, भारत हा मुस्लिम, पारशी किंवा ख्रिश्चन असा कोणा एकाच म्हणून नाही पण एक देश म्हणून नक्कीच पुढे जाऊ शकतो.

गांधी यांचं व्यावहारिक मत होत कि, हिंदू आणि मुस्लिम यांचं एकीकरण होणं हे खूपच अवघड आहे.

या पुस्तकात असे म्हटले आहे की, महात्मा गांधी यांना मुस्लिम समाजाचे वागणे काही बाबतीत अवास्तव वाटायचे. उदाहरणार्थ गोहत्याबंदीला मुस्लिमांचा विरोध. मात्र हिंदू मुस्लिम ऐक्य हि गोष्ट त्यांच्यासाठी इतकी महत्वाची होती कि त्यासाठी त्यांनी ‘मुस्लिम जर एवढे आग्रही असतील तर गोहत्याबंदीचा प्रश्न बाजूला ठेवायला देखील हरकत नाही’ असे सांगितले होते.

स्वदेशी शिक्षणाविषयी गांधीजी आग्रही होते.  

लेखक या पुस्तकामध्ये सांगतात कि, गांधी यांचे शिक्षणविषयीचे विचार देखील स्पष्ट होते,

मुलांना सर्व शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले जावे. या आग्रही मताचे ते होते.

परकीय शिक्षण देणं हे मुलांचा आणि देशाचा दोघांचा देखील विश्वासघात केल्याप्रमाणे होईल. आपल्या हिंद स्वराज मधील लिखाणात गांधी म्हणायचे कि,

इंग्लिश शिक्षण हे रोजच्या शिक्षणाशी जोडणे हि एक मोठी चूक ठरले.

लाखो मुलांना इंग्रजीचे ज्ञान देणे म्हणजे गुलाम करणे होय असे गांधीजी यांचं स्पष्ट मत होत. मॅकॉलेने शिक्षणाचा पाया हा आपल्याला गुलाम बनविण्यासाठी घातला, असे ही गांधींनी हिंद स्वराज्यात लिहिले आहे.

अशा प्रकारचे महात्मा गांधी यांचे धर्म, देशभक्ती, स्वदेशी शिक्षण अशा विविध विषयांवर मत असल्याचं पुस्तक नव्या वर्षाच्या निमित्ताने येऊ घातलं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.