घरच्यांचा विरोध तर होताच पण त्यांच्या लग्नाचे मेन व्हिलन खुद्द महात्मा गांधी होते

मुलगा सिंधी पोरगी बंगाली. दोघांच्यात वीस वर्षांचं अंतर. पण प्रेमात पडले होते. लग्न करायचं होतं. आता घरच्यांचा विरोध होता हे विचार करण्यासारखं आहे हे मान्य पण खुद्द महात्मा गांधींचा देखील त्यांच्या लग्नाला विरोध होता.

गोष्ट आहे आचार्य जे.बी.कृपलानी आणि सुचेता कृपलानी यांच्या लग्नाची.

आत्ता पाकिस्तानमध्ये असणाऱ्या सिंधच्या हैद्राबादमध्ये जीवनराम भगवानदास कृपलानी यांचा जन्म झाला. लहानपणापासून प्रचंड हुशार असणाऱ्या जेबी यांच कॉलेजच शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झालं.

वाराणसीच्या बनारस हिंदू विश्वविद्यापीठात इतिहासाचे प्रोफेसर म्हणून नोकरी पकडली. अल्पावधीतच विद्यार्थ्यांचे लाडके म्हणून प्रसिद्धी कमावली.

गांधीजींच्या असहकार आंदोलनाच्या धामधुमीचा काळ.

अनेक तरुण त्यांच्या विचारांनी आकर्षित होऊन स्वातंत्र्यलढ्यात उतरत होते. ब्रिटिश सत्तेला धक्का द्यायचा म्हणून पेटून उठलेले जे.बी.कृपलानींनी देखील आपल्या नोकरीला लाथ मारली.

आचार्य कृपलानी थेट गांधीजींच्या आश्रमात जाऊन राहिले.

गांधीजींच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश केला जात होता. अधूनमधून कृपलानी जेव्हा वाराणसीला जायचे तेव्हा बीएचयु मधील आपल्या इतिहास डिपार्टमेंटला हमखास भेट द्यायचे. जुने सहकारी, विद्यार्थी यांची भेट व्हायची.

बीएचयु मध्ये आचार्य कृपलानी यांच्या राजीनाम्यानंतर सुचेता मुजुमदार नावाची एक युवती प्रोफेसर म्हणून आली होती. नेहमी आचार्य कृपलानी यांच कौतुक ती ऐकायची. त्यांना प्रत्यक्षात भेटली तेव्हा अगदी भारावूनच गेली.

सुचेता यांना देखील गांधी विचार पटत होते. आचार्य कृपलानी यांच्या कडे तिने मलाही आंदोलनात भाग घ्यायचा आहे अशी इच्छा जाहीर केली.

खरं तर कृपलानी यांच स्त्रियांनी राजकारणाच्या जंजाळात अडकू नये असं मत होतं, त्यांनी तसं सुचेता यांना समजावून सांगितलं पण त्या ऐकत नव्हत्या.

अखेर आचार्य कृपलानी सुचेता मुजुमदार यांना गांधीजींच्या आश्रमात घेऊन आले.

स्वातंत्र्य आंदोलनात सुचेता डगमगल्या नाहीत. पुरुष कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या लढत होत्या. गांधीजींनी देखील त्यांचं कौतुक केलं होतं. आचार्य कृपलानी त्यांचे मार्गदर्शक बनले होते.

या काळात दोघे जवळ आले. सुरवातीला त्यांची मैत्री जमली त्याच रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. पण जाती पासून ते वयापर्यंत प्रत्येक गोष्टीत अंतर होतं.

घरच्यांना कळल्यावर त्यांनी आरडाओरडा तर केलाच पण सर्वात मोठा विरोध होता महात्मा गांधी यांचा.

हे दोघे गांधीजींचे सर्वात जवळचे शिष्य. तरीही गांधीजी त्यांच्या लग्नात व्हिलन बनून उभे होते.

गांधीजींचे मत होते की लग्न केल्यानंतर येणाऱ्या सांसारिक जबाबदारीमुळे हे दोघे स्वातंत्र्यलढ्याच्या मुख्य कार्यापासून दूर जातील. एकदा तर गांधीजी एवढे चिडले होते की त्यांनी आचार्य कृपलानी यांना थेट सुनावलं,

अगर तुम उससे शादी करोगे तो मेरा दायां हाथ तोड़ दोगे.

यावर सुचेता गांधींना म्हणाल्या,

आप ऐसा क्यों सोचते हैं बल्कि आपको तो ये सोचना चाहिए कि उन्हें आजादी की लड़ाई में एक की बजाए दो कार्यकर्ता मिल जाएंगे.

गांधीजींनी त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ केलेली दोघांनाही पसंत नव्हती तरीही ते त्यांचं ऐकून लग्न न करण्यास तयार झाले होते. मात्र तरीही गांधीजींनी सुचेता यांचं लग्न वेगळीकडे जमवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र दोघे चिडले व एकमेकांशी लग्न करून टाकलं.

ते वर्ष १९३६ हे होते.

सुचेता कृपलानी आपल्या चरित्रात सांगतात की जवाहरलाल नेहरूंनी आमच्या वतीने गांधीजींना समजावून सांगितलं. गांधीजी त्यांना बोलवून म्हणाले,

” मै तुम दोनो को आशीर्वाद नहीं दे सकता मगर तुम्हारे लिए प्रार्थना जरूर करुंगा”

इतकं होऊनही दोघे गांधीजींच्या विचारापासून दूर गेले नाहीत. लग्नानंतरही त्यांनी गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात पुढे राहून नेतृत्व केलं, कारावास स्वीकारला.

जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी आचार्य कृपलानी होते.

पुढे नेहरू व सरदार पटेल यांच्या भांडणात आचार्य कृपलानी यांचा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. सरदार पटेलांच्यावर चिडून आचार्य कृपलानी यांनी काँग्रेस पक्ष सोडला.

त्यांनी किसान मजदूर पार्टीची स्थापना केली. सुचेता कृपलानी या देखील त्यांच्या पक्षात होत्या.

पुढे काही वर्षांनी नेहरूंनी सुचेता यांना समजावून सांगून काँग्रेसमध्ये परत आणले. आचार्य कृपलानी मात्र कधीच आयुष्यभर काँग्रेसमध्ये परतले नाहीत.

एकेकाळ असा होता की लोकसभेत आचार्य कृपलानी विरोधी पक्षातून नेहरूंच्या सरकारवर घणाघाती हल्ला करायचे आणि त्यांची पत्नी सुचेता कृपलानी त्यांना जशास तसे उत्तर देऊन त्यांचा हल्ला परतवून लावायच्या.

या नवरा बायकोची जुगलबंदी लोकसभेत चांगलीच गाजायची. आचार्य कृपलानी गंमतीत नेहमी म्हणायचे,

कांग्रेसी इतने बदमाश हैं कि वो मेरी पत्नी ही भगा ले गए.

सुचेता कृपलानी यांनी आपल्या नेतृत्वगुणाने एक काळ गाजवला. उत्तरप्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. पुढे जाऊन इंदिरा गांधींच्या हुकूमशाही कारभाराला नवराबायकोने विरोध केला.

१९७४ साली पत्नीच्या निधनानंतर आचार्य कृपलानी देखील राजकीय जीवनातून निवृत्त झाले.

हे ही वाच भिडू,

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.