चंद्रपॉलच्या डोळ्याखालच्या पट्ट्यामागे कोणती काळी जादू होती?

लहानपणी क्रिकेट बद्दल अनेक मजेदार गैरसमज होते, ज्याबद्दल आज माहिती जाऊन घेताना मोक्कार हसायला येतं. यात पॉंटिंगच्या बॅट मध्ये स्प्रिंग होते हे कायम बोललं जाणार वाक्य होतं, जे आजही जोक म्हणून बोललं जातं अन त्यावर हसायला ही तितकंच येतं.

याशिवाय सचिन तेंडुलकरची बॅट वजनाने जगात सगळ्यात भारी होती, पाकिस्तानी प्लेयर्स इंनिंग ब्रेकमध्ये दश्या खाऊन येतात आणि जुम्मे की दिन मॅच असली तर तेच जिंकतात अशा एकसे बढकर एक अफवा होत्या.

ज्या आज घडीला बोलल्या की, पोट धरून हसायला येतं, अगदी आता हा लेख लिहिताना सुद्धा येतंय.

सगळ्यात जास्त  गैरसमज वेस्ट इंडिजच्या खेळाडुबद्दल होते. त्यांचे बॉलर म्हणे रात्री भूत होतात. खर तर दिवसापण एखाद्या भूतापेक्षा कमी नव्हते. आणखी चर्चा असायची की त्यांचे लेफ्टी बॅट्समन लै भारी खेळत्यात.

धुवांधार खेळत नुसते छक्के मारत्यात अन लवकर आऊट बी होत नाही. लारामुळे हा समज दृढ झाला असेल पण आणखी एक बॅट्समन होता जो आपल्याला आउटचं व्हायचा नाही.

शिवनारायण चंद्रपॉल.

ह्याची खासियत होती ती, याची बॅटिंग करण्याची स्टाईल. बॅट्समन क्रिज आल्यावर समोरून स्टंप दिसतोय का विचारून बुटाच्या खिळ्याने रेघ ओढतो. पण चंद्रपॉलच वेगळंच होतं. ह्यो गडी आला की, बुटाच्या खिळ्याने रेघ पडायच्याया जागी स्टंप वरची बेल उचलुन ती बॅटने क्रिजवर ठोकून भोक पडायचा.

परत त्याची उभं राहण्याची पद्धत बी अजबच. हा सरळ उभा न राहता स्टंपला समांतर उभा राहायचा. आणि चौफेर फटकेबाजी करायचा. मग आम्ही बी गल्ली क्रिकेट खेळताना त्याची स्टाईल कॉपी मारायचो तेव्हा पोरं मोक्कार हसायची.

पण फुकटची स्टाईल मारायला काय जातंय म्हणून मारायची. भले मग दोन बॉल्स मध्ये आऊट का होईना.

पण ते सगळ जाऊ दे.

चंद्रपॉल म्हटल की आठवते की त्याच्या डोळ्याखाली दिसणाऱ्या काळ्या पट्ट्या.

तेव्हा वाटायचं की, ते देशाच्या संबंधित काही असेल. तर त्यावर काहीतरी लिहिलेलं दिसत असल्याने कुणी म्हणायच ते त्याच्या मुला-मुलीचे नाव आहेत. आमच्या गल्लीतल्या एका अतिहुशार पोरान सांगीतलेल की तो खरा भारतीय आहे आणि शिवशंभोचा भक्त आहे. त्याच्या गुरुने काही तरी काळा मंत्र दिलाय. त्याच्या काळ्या पट्टीवर तेच लिहिली. तेव्हा इंटरनेट वैगेरे कळत नसल्याने गूगल करून सर्च करण्याच्या प्रश्नच येत नव्हता. लोक म्हणतात मग असेल तसेच.

पण नंतर नंतर कळलं की, ते तस काहीच नसून अँटी-ग्लेयरचे स्टिकर होते. जे उन्हात खेळतांना डोळ्यावर पडणाऱ्या सुर्यकिरणांचा प्रभाव कमी करतात.

सूर्याची किरणे सरळ डोळ्यावर पडायला नको म्हणून चंद्रपॉल ते स्टिकर लावायचा.

ह्याच्या बाबतीत एकच तथ्य बरोबर होतं. ते म्हणजे त्याच्या नावावरून तो भारतीय आहे असे वाटायचं. आणि हो तो खरोखरच भारतीय वंशाचा आहे. खर तर बिहारी होता. त्याचे पूर्वज अठराव्या शतकात बिहार सोडून गुयाना मध्ये जाऊन स्थायिक झालेले.

२०११ मध्ये जेव्हा वेस्टइंडिज भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा, एका मॅचमध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर चंद्रपॉल खेळत होता. त्याच दरम्यान बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारी टेस्ट क्रिकेटरला अवॉर्ड देण्याचे जाहीर केले. पूर्ण भारतात चर्चा झाली की एका परदेशी खेळाडूला का हा सन्मान दिला?

झालं असं होत की त्या वर्षी बिहार मध्ये एकही एवढी मोठी कामगिरी केलेला खेळाडू सापडत नव्हता.  धोनीला देऊ शकत नव्हते, कारण तो झारखंडचा होता. मग जेव्हा नितीश कुमार यांना चंद्रपॉल बद्दल कळलं की, तो बिहारी आहे, अनायसे तो भारत दौऱ्यावर आला होता.

मग बिहार सरकारने त्याला ‘बिहारी क्रिकेटर ऑफ द डेकेड’ चा अवॉर्ड दिला.

चंद्रपॉल जवळपास वीस वर्षे क्रिकेट खेळला. एवढी वर्षे कसोटी क्रिकेट खेळत राहणे ही चेष्टा नाही.जगभरातल्या फक्त लिजेंड क्रिकेटर्सनाच हे जमलंय.

तसं बघितल तर चंद्रपॉलला वेस्ट इंडीज क्रिकेटर्सच्या सुपरस्टार खेळाडू मध्ये धरत नाहीत. तो एवढे वर्षे खेळेल हे ही कोणाला वाटलं नव्हत.

पण पठ्ठ्याने आपल्या बिहारी रक्तातल्या मेहनतीच्या जोरावर चिकाटीने लढा दिला आणि कित्येक सो कॉल्ड  सुपरस्टार खेळाडूंपेक्षा जास्त विक्रम मोडले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.