शिक्षकांनी परराज्यातला म्हणून चिडवल्यावर गड्यानं अख्या चंद्रपूरचा इतिहास शोधून काढला.

युपी-बिहार मधले महाराष्ट्रात व्यवसाय, नोकरीसाठी आले की आपण त्यांना अगदी सहजपणे ‘अरे ओय युपीवाले भैय्या’ म्हणून मोकळं होते. यात मुळामध्ये त्यांचा अपमान करण्याचं आपल्या मनात नसतचं, पण तरी आपण त्यांना परकेपणाची जाणीव करून देत. भले मग तो भैय्या मागच्या २०-२५ वर्षापासून महाराष्ट्रात राहत असला तरी.

पण असचं परकेपणाचं वाक्य एका शाळेतल्या पोराला खटकलं आणि त्या अपमानातून जगासमोर आला सबंध चंद्रपूरचा इतिहास. 

साधारण १९४३ सालची गोष्ट असावी. उत्तरप्रदेशातील वाराणसीमधून जयराजसिंह ठाकूर नावाचे एक फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर चंद्रपूरमध्ये कामासाठी आले. काही दिवसातच महाराष्ट्रातील हे शहर त्यांना इतकं आवडलं की वाराणसी सोडून चंद्रपूर मध्येच ते कायमचे स्थायिक झाले. इथचं संसार थाटला, चार मुलांचा जन्म देखील इथचं झाला.

याच मुलांपैकी दोन नंबरच्या मुलाचं नाव होतं अशोक सिंह.

लहानपणापासून त्यांच्यावर सगळे संस्कार महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीतले. आजूबाजूला ज्या मित्रांसोबत खेळायला जायचं ते मराठी बोलणारे होते. शिक्षण पण मराठी मध्यमाच्या शाळेतच चालू झालं. एकूणच काय तर मातृभाषा जरी नसली तरी चंद्रपूर आणि मराठी भाषा ही त्यांनी आपली मनाली होती. लहानग्या वयातच या शहरावर भूमिपुत्रासारखं प्रेम करत होते.

पण एक दिवस अचानक अशोक सिंह ठाकूरांना त्यांच्या शिक्षकांनी सगळ्या वर्गासमोर त्यांना ‘पराज्यातील’ म्हणून चिडवलं. हे ऐकल्यावर त्यांनी शिक्षकांना असं म्हणण्याचं उलटं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं,

तुम्ही महाराष्ट्रातील नाही तर वाराणसीवरून आला आहे.

हा अपमान अशोक सिहांच्या चांगलाच वर्मी बसला. त्यांनी घरी येत आपल्या वडिलांना सगळी गोष्ट सांगितली, त्यावेळी वडिलांनी त्यांना सांगितलं यात रडण्यासारखी किंवा वाईट वाटून घेण्यासारखी काहीच गोष्ट नाही.

पण अशोकसिंहाच्या डोक्यातनं शिक्षकांचं ते वाक्य डोक्यातनं जात नव्हतं. जसं जसं वय वाढतं गेलं तसं आपण बाहेरचे आहोत तर इथले लोक कोण होते?, ते कसे होते?, आपल्या लोकांचा आणि इथला काही तरी संबंध असेल का? हा इतिहास जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढायला लागली.

आपल्या घराचा व्यवसाय सांभाळत अशोकसिंह इतिहासाचा अभ्यास करण्यात आणि जुनी नाणी जमा करण्यात इंटरेस्ट घेऊ लागले.

त्याच दरम्यान योगायोगानं त्यांना १९८४ च्या निवडणुकीवेळी जिल्ह्यातील लोकांचे मतदान ओळखपत्र बनवण्याचं काम मिळालं. या कामानिमित्त अशोकसिंहाचं अखंड चंद्रपूर जिल्हा पालथा घातला. गावा-गावात जायचा, भेटी द्यायचा चान्स मिळाला. त्यांना जिल्ह्यातील लोकांची आणि स्थळांची माहिती असलेल्या गॅझेटअर संबंधित माहिती मिळाली

यातूनच अशोक सिंहांना समजलं की, ठाकूर समुदायातील लोक १२ शतकापासूनच इथं राहत आहेत. एवढं काय तर चंद्रपुर शहरातील किल्ल्याच डिझाइन तेल सिंह ठाकुर नावाच्या एका व्यक्तीने बनवले आहेत. लहानपणा पासून जो विचार मनात गोंधळ घालत होता त्याची उत्तर त्यांना हळू हळू मिळायला आणि चंद्रपूरचा अज्ञात इतिहास जगासमोर यायला सुरुवात झाली. 

चंद्रपूरचा अगदी पहिल्या शतकापासूनच इतिहास मांडताना अशोक सिंहांनी त्यावर तब्बल ४ पुस्तक, आणि शेकडो लेख लिहिले आहेत.

यात राजा खांडक्य आणि हिरातानी राणी पासूनच इतिहास, १२४७ ते १७५१ या दरम्यानचा ५०० वर्षांचा गोंडकालीन चंद्रपूरचा इतिहास, जुनोना इथला जल महाल, अंचलेश्वर मंदिरचा राजा खांडक्य पासून १७१९ पर्यंतच्या हिराई राणीचा इतिहास, राणी हिरातनीने अंचलेश्वर मंदिराच्यावेळीच बांधलेलं महाकाली मंदिर अशा अनेक ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे.

तसचं बीरशाहची १८ शतकातील राणी हिराईने आपला पती राजा वीर(बीर) शाहची बांधलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी समाधी, १७ व्या शतकाच्या सुरुवातीला राजा धुन्द्या रामशाह यांच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिलेलं देवालय आणि तिथली गणपतीच, शिवलिंगाची मूर्ती, दशावतार दुर्गाची माहिती, गोंड राजा हिरशाह याने आपल्या १४९७-१५२२ या काळात बांधलेलं जटपुरा गेट यांचा पण इतिहास त्यांनी जगासमोर आणला आहे. 

एवढंच नाही तर आशिया खंडात १०००० वर्ष जुनं असलेलं डोलमेन (मेगालिथिक स्ट्रक्चर), पहिल्या शतकात सत्व हंस राज्यचा राजा विजय सत्कारणी यांच्या काळात बांधलेली विजासन गुहेचा इतिहास त्यांनी उजेडात आणला आहे.

अशोक सिंह ठाकुर माध्यमांशी बोलताना सांगतात,

या विजासन गुहेचा वापर गावातील लोक जनावर बांधण्यासाठी करत होते, पण या ऐतिहासिक जागेच महत्व आम्ही लोकांना समजावून सांगितलं आणि त्यांनाच या जागेच संरक्षण करण्यासाठी विनंती केली. प्रत्येक वेळी ते सरकार वर अवलंबून राहू शकत नाही, हे पटवून दिलं.

अशोक सिंह यांना जेव्हा पण अशा जागांबद्दल समजतं तेव्हा ते संबंधित गावात जाऊन गावातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना एकत्रित करून सगळी माहिती देतात. त्यांचं म्हणणं आहे की, मुलं अशा ऐतिहासिक जागेंमुळे प्रभावित होतात, त्यांना जेव्हा समजत कि हे सगळं आपल्याच पूर्वजांनी बनवलं आहे, आणि आपणच याचे वारसदार आहोत तेव्हा त्यांना जाबबदारीची देखील जाणीव होते.

Indian National Trust for Art and Cultural Heritage (INTACH) आणि Archaeological Survey of India (ASI) यांच्या मदतीनं अशोक सिंह यांनी शहरातील आणि जिल्ह्यातीलअशी अनेक ऐतिहासिक स्थळ शोधून त्यांचं आजही संरक्षण केलं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.