बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून देणारे आजही भारतात शरणार्थी म्हणून जगत आहेत

राज्यघटनेची निर्मिती हे डॉ. बाबासाहेबांनी भारतीय लोकशाहीला दिलेली सर्वात अनमोल देणगी. बाबासाहेबांनी एकहाती या घटनेचा मसुदा लिहून काढला आणि आज जगाच्या कौतुकास पात्र ठरलेली सार्वभौम अशी घटना आकारास आली.

या संविधानाची निर्मिती ब्रिटिशांनी स्वातंत्र्य देण्याच्याही आधी १९४६ साली निवडणुकांद्वारे अस्तित्वात आलेल्या संविधानसभेपासून सुरु झाली होती.

पण असं म्हणतात की जेव्हा संविधान सभेच्या निवडणूक झाल्या तेव्हा काँग्रेसचे काही नेते बाबासाहेबांना घटनासमिती पासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकप्रियता वाढत आहे हे पाहून त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याची जबाबदारी वल्लभभाई पटेलांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या कडे दिली होती.

नुकताच प्रांतीय निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव झाला होता. संविधानसभेच्या निवडणुकीत देखील त्यांना नेस्तनाबूत करायसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठी शक्ती पणाला लावली होती. २९६ सदस्य असणाऱ्या घटना समितीच्या सदस्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडून जावू शकणार नाहीत असंच सगळ्यांना वाटत होतं.

पण एक माणूस होता ज्याने जिद्दीने विडा उचलला कि काहीही झालं तरी बाबासाहेब आंबेडकरांना संविधानसभेवर निवडून आणायचं. 

नाव जोगेंद्रनाथ मंडल 

जोगेंद्रनाथ हे मूळचे बंगालचे. ते नामशुद्र ज्याला पूर्वी चांडाल म्हणून ओळखले जायचे या समाजातले होते. या जातीला तत्कालीन समाजव्यवस्थेत अस्पृश्यतेचा दर्जा होता. मात्र जोगेंद्रनाथ मंडल यांनी अनेक अडथळ्यांचा सामना करत आपलं शिक्षण पूर्ण केलं. मात्र समाजाच्या उन्नतीसाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वःतच आयुष्य अर्पण केलं.

१९३७ साली त्यांनी बंगालच्या बखरगंज ग्रामीण मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे दिग्गज नेते सरतचंद्र दत्त हे होते. पहिल्याच निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या मंडल यांनी त्यांचा मोठा पराभव केला. जायंट किलर म्हणून त्यांना देशभरात ओळख मिळाली. सुभाषचन्द्र बोस यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. बंगालच्या काँग्रेसेतर राजकारणात मंडल यांना मोठे स्थान मिळाले.

मोहम्मद अली जिना यांच्याशी देखील त्यांची गाढ मैत्री होती. यातूनच मंडल यांचा मुस्लिम लीगशी संबंध आला.

दलित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जेव्हा मंडल यांची ओळख झाली तेव्हा ते प्रचंड प्रभावित झाले. जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची बंगाल येथे शाखा स्थापन केली.

वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा बाबासाहेबांना मुंबईत रोखण्याचे काँग्रेसचे डावपेच सुरु झाले तेव्हा मंडल यांनी त्यांना बंगालमध्ये येऊन निवडणूक लढवण्याचं आमंत्रण दिलं.

डॉ.बाबासाहेबांनी  जोगेंद्रनाथ मंडल यांचे मुळगाव बारिशाल येथून उमेदवारी दाखल केली. काँग्रेसने तिथेही त्यांना पराभूत करण्याची रणनीती आखली होती. मात्र मंडल यांचा अफाट जनसंपर्क आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असणारे जनतेमध्ये असणारे प्रेम याच्या जीवावर विरोधकांचे सर्व मनसुभे उधळून लावण्यात आले.

शेड्युल्ड कास्ट फेडरेशन च्या तिकिटावर लढणाऱ्या बाबासाहेबांनी बारिशाल येथून मोठा विजय मिळवला. संविधान सभेत त्यांचा प्रवेश झाला.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य दिले. मात्र हे स्वातंत्र्य देताना पाकिस्तानच्या  निर्मितीची पाचर मारली. धर्माच्या आधारे फाळणी करून लोकांना आपल्याच भूमीत बनवलं. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे स्थलांतर आणि त्यातुन झालेला रक्तपात आपल्या देशाने अनुभवला.

जोगेंद्रनाथ मंडल यांचे बारिशाल हे गाव देखील पूर्व पाकिस्तानमध्ये जोडले गेले. तिथल्या नामशुद्र समाजातील लाखो लोकांनी भारतात प्रवेश केला. जोगेंद्रनाथ मंडल यांना मात्र मोहम्मद अली जिना यांनी रोखलं.

जिना यांनी पाकिस्तान हा धर्मनिरपेक्ष देश असेल असे मंडल यांना आश्वासन दिले होते. आंबेडकरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण मंडल जीनांच्या शब्दांवर विश्वास ठेवून पाकिस्तानमध्येच राहिले. 

इकडे भारतात काँग्रेसला डॉ.बाबासाहेब आंबेडर यांची नव्या राष्ट्रनिर्मितीमध्ये संविधान सभेतील महत्व लक्षात आले होते. बॅरिस्टर जयकर यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं आणि घटनेच्या मसुदा समितीची जबाबदारी दिली. इतकेच नाही तर पंतप्रधानांनी त्यांना आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा व न्याय विभागाचा कॅबिनेट मंत्री बनवलं.

त्याच वेळी मोहम्मद अली जिना यांनी मंडल यांना पाकिस्तानचा कायदा मंत्री बनवलं. ते पाकिस्तानचे आंबेडकर बनून देशाला रुळावर आणतील असच जिना यांना वाटत होतं.

पण दुर्दैवाने जिना यांचा लवकरच मृत्यू झाला. पाकिस्तानची वाटचाल एका जातीयवादी देशाकडे होते आहे हे लक्षात आल्यावर जोगेन्द्रनाथ मंडल यांनी त्याचा विरोध केला. पाकिस्तानमध्ये दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी लढा उभा केला. तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लियाकत अली यांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढलं.

पाकिस्तानने अपेक्षाभंग केल्यामुळे निराश होऊन जोगेंद्र मंडल भारतात पळून आले. मात्र तिथेही त्यांना आदर मिळाला नाही. पाकिस्तानला जाण्याच्या एका चुकीमुळे त्यांचे आयुष्य राजकीय विजनवासात गेले. कलकत्त्याच्या निर्वासितांच्या एका वस्तीत अगदी छोट्याशा झोपडीत त्यांनी आसरा घेतला. तिथेही अनेक गोर गरीब दलित कुटुंबे त्यांच्याकडे मदतीची अपेक्ष घेऊन यायची मात्र मंडल यांच्या स्वतःच्या हातात आता काही उरलं नव्हतं.

अशाच दरिद्री व एकटेपणामध्ये त्यांचा १९६८ साली मृत्यू झाला.

आज बारीशाल बांगलादेश मध्ये आहे. मात्र त्याकाळी मंडल यांच्यासोबत नामशुद्र समाजातील मंडळी भारतात शरण घेण्यास आली त्यांना तत्कालीन सरकारने देशभरात ठिकठिकाणी वसवले. महाराष्ट्रातही नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हे शरणार्थी येऊन राहिले. मात्र आजही त्यांना भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. याविरोधात वेळोवेळी समाजाने आंदोलन केले आहे मात्र आंबेडकरांसारख्या महापुरुषाला संविधानसभेत पाठवणारा हा समाज आज स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या सीएए या कायद्यात त्यांना नागरिकता मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र त्यावरूनहि वाद सुरूच आहे.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.