युक्रेनवर पाठवलेल्या ‘चेचेन फौजे’ला पुतीन यांचं सगळ्यात खुंखार वेपन म्हणतायत

युद्ध आणि हिंसाचार म्हटलं की हिटलरची आठवण होतेच होते. हिटरने जो काय हाहाकार आणि दहशत माजवली होती त्याचा साक्षीदार बनून आज इतिहास उभाय. पण याच इतिहासात असंही सांगितलंय की, हिटलर या सगळ्या गोष्टी काय स्वतः करत नव्हता तर त्यासाठी त्याची विशिष्ट अशी फौज होती. जी इतकी खुंखार होती की, त्यांचं नाव घ्यायला देखील लोक घाबरायचे. आता मध्येच हा विषय का म्हणाल,

तर याचं कारण आहे ‘चेचेन फौज’. 

युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध सुरु आहे, ज्यात रोजच काही तरी नवीन ऐकायला मिळतंय. याच युद्धांच्या अपडेट्समध्ये चेचेन फौजेचं नाव सध्या गाजतंय. रशियाने युक्रेनमध्ये या फौजेला पाठवलं असून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना मारण्याचा ठेका या फौजेनं घेतला असल्याचं बोललं जातंय. शिवाय युक्रेनमधील सर्व महत्त्वाच्या नेत्यांना मारण्याचही त्यांचं ध्येय आहे.

तेव्हा नेमकं हे चेचेन सैन्य आहे काय? कुठून आलंय? ते रशियाच्या बाजूने युद्धात का उतरलंय? याची सगळी महिती आम्ही शोधली आणि तीच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…

दिवसेंदिवस चिघळत जाणाऱ्या रशिया-युक्रेन वादात चेचेन फौजेची एंट्री झालीये. पण हे काही आताचं नाहीये. युद्धाला सुरुवात झाली तेव्हाच चेचेन्यांचं आगमन त्यात होणारच हे पुतीन यांनी घोषित केलं होतं. त्यानुसार आता चेचन्याचे राष्ट्राध्यक्ष रमजान कादिरोव्ह यांनी युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाला पाठिंबा देण्यासाठी सैन्य पाठवलं आहे. त्याचबरोबर पुतीन यांच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

पण रशियाशी इतकी प्रामाणिकता दाखवणाऱ्या या चेचन्याचा रशिया एकेकाळी शत्रू होता. हा इतिहास जाणून घेऊया…

रशियाच्या दक्षिणेकडे जॉर्जिया देशाच्या सीमेला लागून चेचन्या नावाचा देश आहे. अगदी छोटासा. मुस्लिमबगुल असलेला हा देश स्वतंत्र असला तरी हा रशियन फेडरेशनचा एक भाग आहे. १९१७ च्या रशियन क्रांतीदरम्यान, वेगवेगळ्या वांशिक गटांनी रशियापासून स्वतःला स्वातंत्र्य घोषित केलं. चेचन्या देखील त्यातील एक होता.

जगातील अनेक देशांनी त्याला उत्तर काकेशसचा संयुक्त पर्वतीय रहिवासी म्हणूनही मान्यता दिली. पण सोव्हिएत संघाने चेचन्यावर हल्ला केला. तेव्हा चेचन्याच्या लोकांनी मोठा लढा दिला. अखेर १९९१ मध्ये सोव्हिएत संघ संपुष्ठात आला, तेव्हा कुठे देश स्वतंत्र झाला. मात्र हार मानेल तो रशिया कसला. मोठया आणि बलाढ्य रशियाची कायमच नजर या लहानश्या देशावर होती.

त्यानुसार १९९४ मध्ये रशियाने चेचन्यावर हल्ला केला. पहिला वार अयशस्वी झाला तेव्हा रशियाने परत हल्ला चढवला. यावेळी मात्र चेचन्या देश हरला. रशिया जिंकला होता पण त्याने चेचन्याचं स्वतंत्र देश असल्याचं बिरुद काही मागे घेतलं नाही. तर हा देश स्वतंत्रच राहील मात्र त्यावर रशियाचा नियंत्रण असेल, अशी घोषणा रशियाने केली. 

यासाठी चेचन्यामध्ये जनमत सुद्धा घेण्यात आलं. तेव्हा या देशातील मोठ्या समूहाने रशियन फेडरेशनचा भाग होण्याच्या बाजूने आपलं मत दिलं. आणि अशाप्रकारे चेचन्या देश स्वतंत्र असूनही स्वातंत्र्य गमावून बसला. २००३ चं साल होतं. त्यावेळी पुतीन यांनी हा देश सांभाळण्याची जबाबदारी अखमद कादिरोव्ह यांना सोपवली.

हे चेचेन सैन्य याच देशाचे रहिवाशी आहेत.

त्यांना ‘चेचेन हंटर्स’ असं देखील म्हटलं जातं. चेचन्याच्या स्पेशल फोर्ससमध्ये त्यांचं नाव येतं. शिवाय ते अत्यंत क्रूर आणि त्यांच्या कामात निष्णात असल्याचं त्यांच्याबद्दल बोलल जातं. त्यांना कठीणातील कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी तयार केलं गेलंय, इतकी स्ट्रॉंग ट्रेनींग त्यांना दिली जाते. असे जवळपास १० हजारांपेक्षा जास्त सैनिक सध्या युक्रेनमध्ये पाठवण्यात आले आहेत.

यामागे त्यांचं युक्रेनसोबत काही वैयक्तिक वैर नाहीये. पण रशियासोबत चेचन्याच्या राष्ट्राध्यक्षांची एकनिष्ठता हे कारण आहे.

२००७ मध्ये एका बॉम्बस्फोटमध्ये अखमद कादिरोव्ह यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा पुतीन यांनी त्यांचा मुलगा रमजान कादिरोव्ह यांना राष्ट्राध्यक्ष केलं आणि तेव्हापासून ते पुतीन यांचे अनुयायी झाले आहेत. कादिरोव्ह हे रशियाचे प्रबळ समर्थक मानले जातात. जे स्वतःला रशियन “फूट सोल्जर” म्हणतात. इतकंच नाही तर पुतीन यांची धोरणं आणि त्यांचे शब्द हेच त्यांच्यासाठी शासन आहे, असं रमजान यांनी अनेकवेळा सांगितलं आहे.

त्यांच्यासाठी पुतीन हे केवळ राष्ट्राध्यक्ष नसून त्यांच्या लोकांचं रक्षण करणारा माणूस आहे. तेव्हा आता रशिया युक्रेनवर हल्ला करत असताना रमजान कादिरोव्ह यांच्याकडे आपली निष्ठा सिद्ध करण्याची चांगली संधी असल्याचं त्यांचं म्हणणंय. म्हणून चेचेन सैन्य रशियाच्या बाजूने लढतंय. पण ही काही पहिलीच वेळ नाहीये.

याआधी सुद्धा कादिरोव्ह यांनी पुतीन याना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या सैन्याला जॉर्जिया आणि सीरियामध्ये पाठवलं होतं.

पुतीन यांच्या सांगण्यावरूनच या चेचेन शिकारींना युक्रेनमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह  युक्रेनच्या सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हत्या करण्याचं टार्गेट दिलाय. या गटाकडे तशी ‘किल लिस्ट’ देखील असल्याचं सांगितलं जातंय, ज्यामध्ये युक्रेनच्या जवळपास २५ उच्च अधिकार्‍यांचे नाव, पत्ते आणि फोटोसहित तपशील नोंदविला आहे.

रमजान कादिरोव्ह यांनी प्रत्येक कामासाठी आपल्या सैनिकांना एक रेट कार्ड दिलंय. ज्यानुसार युक्रेनचा एक लढाऊ टॅंक नष्ट करण्यासाठी २० हजार डॉलर्सचे बक्षीस देण्याचे म्हटले गेलंय. शिवाय या सैन्याने पुतीन याना केवळ दोन दिवस स्वतःचे डोळे बंद ठेवून सगळं चार्ज आम्हाला द्या, युक्रेन तुमच्या पायाशी असेल अशी मागणी देखील केलं असल्याची सांगण्यात आलं होतं.

मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर युक्रेनच्या सैन्याकडून चेचेन शिकारींना जोरदार लढत दिली जातेय. युक्रेनचा दावा आहे की, हल्ल्यासाठी आलेल्या चेचेन गटातील अनेक लढवय्ये मारले गेले आहेत. युक्रेनियन सैन्याने काही दिवसांपूर्वी चेचेन जनरल मॅगोमेड तुशायेव यांनाही ठार केलं आहे, जे चेचेन नॅशनल गार्डच्या १४१ व्या मोटराइज्ड रेजिमेंटचे प्रमुख होते. शिवाय त्यांनी अनेक चेचेन टँक्ससुद्धा नष्ट केले आहेत, असं युक्रेनकडून सांगण्यात येतंय.

आता रशिया आणि युक्रेनची परिस्थिती पाहता पुतीन हात धुवून युक्रेनच्या मागे लागल्याचं दिसतंय. त्यात भर पडली आहे ती चेचेन फौजेची. त्यांच्या नावातूनच दहशत जाणवत असल्याचं रशिया सांगतं. म्हणूनच तर आपलं स्ट्रॉंग वेपन म्हणत त्यांनी या फौजेला युक्रेनवर पाठवलंय. ही फौजही हिटलरच्या फौजेप्रमाणे इतिहास रचते का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.