सरपंच ताई MBBS करायला युक्रेनला गेल्या पण मदतीसाठी व्हिडिओ करणं अंगलट आल

रशिया युक्रेन संघर्षाचा आज ८ वा दिवस आहे. या संघर्षामुळे आपण देखील संकटात सापडलो कारण आपले काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. युक्रेनमध्ये एका बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने तर अजून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 

युक्रेन येथील विद्यार्थांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार ऑपरेशन गंगा राबवत असून त्या अंतर्गत सरकारने आपले ४ मंत्री देखील युक्रेनच्या शेजारील देशात पाठवलेत. युक्रेनवर रशिया करत असलेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे युक्रेनच्या हद्दीत विमानं  उडवण्यास मनाई आहे. त्यामुळे युक्रेनमधून विद्यार्थांना रोमानियात हलवलं आहे आणि आता तिथून भारतात आणलं जात आहे. आत्ता तर विद्यार्थांना सुखरूप परत आणण्यासाठी मोदी सरकारच्या विनंतीनुसार रशियाने ६ तास युद्ध थांबवल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत. 

तरी काही अडचणीत सापडलेले विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत सरकारला मदतीचे आवाहन करतायेत. त्यातले बरेच व्हिडीओ तुम्ही फेसबुक, ट्विटरवर पाहिले असतील. पण या सगळ्या गोंधळात नेहेमीप्रमाणे काही फेक गोष्टी पसरत आहेत. 

उत्तर प्रदेशची वैशाली यादव हि युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेली असतांना ती देखील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मदत मागतेय. 

पण झालं असं की,

काही भाजपचे कार्यकर्ते आणि सोशल मीडिया युजर्स वैशालीचे व्हिडिओ शेअर करत असा दावा करत आहेत की, वैशालीचे व्हिडीओ फेक आहेत आणि ती भाजप सरकारची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी व्हिडीओ करतेय, तसेच ती  युक्रेनमध्ये अडकली नसून आपल्या गावी घरीच असल्याचे दावे करत होते.

इतकंच नाही तर वैशालीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यावर सत्य समोर आल्याचे या पोस्टमध्ये म्हणलं आहे. 

बरं अशा पोस्ट लिहिणारे साधारण सोशल मीडिया युजर्स नसून भाजपचे काही नेते आहेत.

Screenshot 2022 03 03 at 7.21.19 PM

दिल्ली भाजपचे प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी मागचा-पुढचा विचार न करता, पूर्ण माहिती न घेता आपल्या ट्विटमध्ये असा दावा केला आहे की, वैशालीने केवळ सरकारला बदनाम करण्यासाठी आपल्या घरात बसून हा व्हिडिओ बनवला आहे.

तर आंध्र प्रदेशचे भाजपचे प्रदेश सचिव रमेश नायडू यांनीही वैशालीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणतात की,

“वैशाली यादव नावाच्या या तरुणीने केवळ भाजप सरकारची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ बनवला आणि ती युक्रेनमध्ये अडकलीच नसून ती तिच्या गावीच घरी आहे.” तसेच या पोस्ट मध्ये असा देखील उल्लेख आहे वैशाली पुरसौली या गावाची सरपंच आहे. ती आणि तिचे कुटुंबीय समाजवादी पार्टीचे असून तिच्या वडिलांनी केवळ राजकीय फायद्यासाठी युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलीला असे खोटे बोलायला लावले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय…

पण सोशल मीडियावर आली पोस्ट की कर फॉरवर्ड ही अर्धवट डोक्याची रीतच आहे. तेच वैशालीच्या बाबतीत झालं. कारण तिच्याबद्दल केलेले दावे खरे की खोटे याचा युपी पोलिसांनी तपास केला.  

हरदोईचे एसपी राजेश द्विवेदी यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘वैशाली भारतात नाहीये तर खरंच ती युक्रेनमध्ये अडकली आहे, तिने मदतीसाठी एक व्हिडिओ बनवलाय. त्यामुळे तिला अटक झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

माध्यमांनी वैशालीला संपर्क साधला तेव्हा वैशालीने माहिती दिली की,

ती २८ फेब्रुवारीला युक्रेनहून रोमानियाला पोहोचली होती, आता ती सुरक्षित आहे. जेव्हा तिला मदतीची गरज होती तेव्हा तिने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. तो व्हिडीओ काही दिवसांनंतर व्हायरल झाला. पण जेव्हा उत्तरप्रदेश मध्ये तिच्या बाबत खोटे दावे केले जात होते त्यानंतर वैशालीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने स्पष्ट केले आहे की ती भारतात नसून रोमानियातच आहे. 

तिने दिलेल्या माहितीनुसार ती खासगी बसने रोमानियाला पोहोचली. वैशालीने तिचे लाईव्ह लोकेशनही काही माध्यमांना पाठवले. हेन्री विमानतळ हे लोकेशन झूम करून पाहिले गेले ते रोमानियामधील एकमेव विमानतळ आहे ज्यावरून ती भारतात नसून रोमानियामध्ये असल्याचे सिद्ध झालं. 

पण हा विषय इथेच संपत नाही…

वैशाली बाबतीत ती भारतात असल्याचे दावे जरूर खोटे असतील पण ती युक्रेनमध्ये अडकली होती हे जितकं खरं आहे तितकंच ती सरपंच असल्याची गोष्ट देखील खरी आहे. वैशाली ही उत्तर प्रदेशातील अरवल क्षेत्रातील पुरसौली गावची सरपंच आहे. तिचे वडील महेंद्र यादव हे समाजवादी पार्टीचे नेते असून पंचायत समितीचे सदस्य आहेत. माध्यमांनी जेव्हा त्यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी देखील वैशाली सरपंच असल्याचं सांगितलं. 

वैशाली २०१८ मध्ये युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेली होती. मध्यंतरी कोरोनामुळे ती भारतात आली होती. २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि वैशालीने निवडणूक लढवली आणि निवडून आली.  सरपंच झाल्यानंतर ती ४-५ महिन्यांपूर्वीच युक्रेनला परत गेली होती. पण यामुळे नवीनच वाद समोर आलाय…

 गावाची सरपंच असताना वैशाली युक्रेनला मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी कशी काय गेली ? 

आता हा प्रश्नदेखील अशाच वेळेस समोर येतो जेंव्हा युक्रेनमधील बरेच भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी सरकारकडे मदत मागत आहेत. 

पण निर्माण झालेल्या वादामुळे स्थानिक जिल्हा प्रशासन याबाबत तपास करतय. काही बातम्यानुसार  जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना नोटीस बजावली की संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीतील कागदपत्रे ताब्यात घेण्यात यावीत. तसेच वैशाली भारतात परतल्यानंतर याबाबत तिचा जबाब घेतला जाणार असल्याचं देखील जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. 

वैशाली शिक्षणासाठी जरी परदेशात असली तरी गावासाठी येणारा निधी सरपंचांच्या खात्यात जमा होत असतो आणि याच बँक खात्यातील व्यवहारावरून गावात वाद निर्माण झाल्याचे कळतंय. ती नसतांना तिचे वडील सरपंचपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होते. त्यांनी माध्यमांना बोलतांना हे हि सांगितले की, आम्ही कोणतेही काम नियमाबाहेर करत नाहीये.

वैशाली सरपंच आहे मग तिने शिक्षण घेण्यात काय चूक आहे? असा सवाल उपस्थित केला. फक्त आम्ही समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे आमची जाणूनबुजून बदनामी करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.