चीनला ज्याचा माज आहे त्या ‘कुंगफू’ या मार्शल आर्टची निर्मिती एका भारतीय साधूने केली आहे.

गोष्ट आहे इसवी सणाच्या पाचव्या शतकातली. दक्षिण भारतातील पल्लव राजवंशाचा राजा सुगंध याचा बोधिधर्म हा तिसरा मुलगा.

हा इतर राजकुमारांपेक्षा वेगळा होता.

त्याला जन्मतः श्वासाचा विकार होता. त्यासाठी बोधीला योगभ्यास शिकण्यासाठी गुरूच्या आश्रमात पाठवण्यात आले. तिथेच तो दक्षिणभारतीय पारंपरिक युद्धकला शिकला.

पण राजमहालातील सुखापेक्षाही त्याला जंगलात जाऊन पशुपक्षी यांचं ध्यान लावून निरीक्षण करणे, जड ग्रंथ वाचणे याची आवड होती. यातूनच त्याचा ओढा शांततेची शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माच्या दिशेने झाला.

अगदी लहान वयातच त्याने भिक्षुकी स्वीकारली.

२२व्या वर्षी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. त्यांना गौतम बुद्धाच्या परंपरेतील २८ व्या आचार्यपदावर नेमण्यात आले.

त्याचे गुरू प्रज्ञाधर यांच्या आदेशानुसार इसवीसन ५२० मध्ये तो भारताबाहेर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पूर्व दिशेला गेला.

लाखो मैलांचा प्रवास करून मजल दरमजल करत बोधिधर्म चीनला पोहचला.

बोधिधर्माच्या आधी देखील काही बौद्ध भिख्खू चीन मध्ये आले होते. त्यांनीच चीनच्या सॉंग नावाच्या पर्वतावर शाओलिन मंदिराची निर्मिती केली होती.

त्याकाळात चीनमध्ये वू लियांग या राजाच राज्य होत. तिथल्या एका ज्योतिषाच्या भविष्यवाणी अनुसार चीनवर मोठं संकट येणार होतं. चीनमध्ये आलेल्या या भारतीय साधूला संकट समजून त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार झाला.

पण त्याच वर्षी चीनमध्ये मोठी साथ आली. अनेक लोक मृत्यू मुखी पडले. पण बोधिधर्मानी आयुर्वेदातील उपचार करून अनेकांना वाचवलं.

तिथून बोधिधर्माची ख्याती अख्ख्या चीनभर सर्वत्र पसरली.

ते जेव्हा शाओलिन मंदिरात पोहचले तेव्हा त्यांना तिथेही प्रवेश नाकारण्यात आला. पण त्यांनी तिथल्या एका गुहेत भिंतीकडे बघत त्यांनी सलग ९ वर्षे ध्यान धारणा केली.

या घटनेमुळे प्रभावित होऊन त्यांना सन्मानाने शाओलिन मठात बोलवून घेतले गेले आणि तिथला प्रमुख देखील बनवलं.

बोधीधर्मने तिथे शिष्यांना भारतीय योगाभ्यासातून समाधी, मनन किंवा चिंतन याची शिकवण दिली.

याच ध्यानधारणेतुन झेन या बौद्ध पंथाची सुरवात झाली.

संस्कृतमधील ध्यान किंवा पाली मधील ज्झान याचाच चिनी अपभ्रंश म्हणजे झेन. झेनमताचा उपदेश महायान पंथातील योगाचार आणि तथागत गर्भसूत्र या स्रोतांवर आधारलेला आहे

झेन तत्वज्ञान चीन मध्ये सर्वत्र स्वीकारले गेले. लाखोंनी लोक बोधिधर्माच्या शिकवणीचे पालन करू लागले. बोधिधर्मामुळेच चीनमध्ये बुद्ध धर्म वेगाने पसरला.

आचार्य बोधिधर्म योगाभ्यास व आयुर्वेदाबरोबरच आपल्या शाओलिन मठामध्ये शिष्यांना स्वसंरक्षणासाठी युद्धकलेचंही प्रशिक्षण देत. कांचीपुरममध्ये शिकलेल्या कलयरीपट्टूच ज्ञान बोधिधर्म यांनी आपल्या चिनी शिष्यांना दिलं.

यातूनच जन्म झाला शाओलिन कुंगफू या मल्ल विद्येचा.

बोधिधर्मांनी चीन मध्ये पाया रचलेल्या कुंगफूमधुन पुढे अनेक मार्शल आर्टची निर्मिती झाली. आज अनेक देश चीनला कुंगफू व इतर मार्शल आर्टचा निर्माता मानतात पण ही भारतीय तत्वज्ञानाची देणगी आहे हे अनेकांना ठाऊक नसते.

पण बोधिधर्म यांना आजही चीनमध्ये जगद्गुरूचं स्थान आहे. त्यांना बुद्धाचा अवतार मानलं जातं. त्यांच्या मुर्त्या मंदिरात पूजल्या जातात.

त्यांच्या बद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

एकदा आचार्य बोधिधर्म ध्यान करीत असताना झोपी गेले व त्यामुळे नंतर ते स्वत:वरच इतके चिडले की त्यांनी स्वत:च्या पापण्याच कापून टाकल्या.

त्या जमिनीवर पडल्या आणि त्यातून चहाचे पहिले रोपटे उगवले असे म्हणतात.

ही आख्यायिका काहीही असली तरी चहाची निर्मिती बोधिधर्माच्या आयुर्वेदातून झाली याबद्दल अभ्यासकांचे एकमत आहे.

आजही झेन तत्वज्ञानात चहापानाच्या विधीला आणि कलेलाही महत्व आहे.

वयाच्या दिडशेव्या वर्षी बोधिधर्म यांचा चीनमध्ये मृत्यू झाला. त्यांच्यावर विषप्रयोग झाला असल्याचही सांगितलं जातं.

बोधिधर्म कधीच भारतात परतू शकले नाहीत मात्र त्यांच्या शिष्यांनी त्यांची परंपरा चीनमध्ये जपली.

बोधिधर्म यांनी सांगितलेला झेन बौद्ध शिकवण, त्यांनी शिकवलेले मार्शल आर्ट, त्यांनी दिलेला चहा हे सगळे आज जगभरात चीनची ओळख बनले आहेत.

चीन या गोष्टींचा अभिमान मिरवत असतो त्या सर्व गोष्टींचं श्रेय एका भारतीय गुरूला जाते हे मात्र सोयीस्कर रीतीने विसरतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.