साबरमती रिव्हरफ्रंटप्रमाणे पुण्याच्या मुळा-मुठेत सिमेंटच्या भिंती उभारल्या जाणार आहेत .

हल्ली थोडा जास्तीचा पाऊस आला की, नद्यांना  महापूर येतोय. तसा महापूर येण्याची कारण खूप आहेत. आणि एकंदरीत पाहायला गेली तर ही सगळी कारण मानवनिर्मित आहेत. मग हा नद्यांना येणारा पूर कसा थांबवावा, यासाठी महाराष्ट्र सरकार म्हंटल होत, नद्यांच्या बाजूने संरक्षण भिंती बांधता येतील.

सरकारच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने सरकारलाच थेट ट्रोल केलं होत.

पण भिडूंनो तुम्हाला माहिती आहे का, अशा पद्धतीच्या संरक्षक भिंती गुजरातमध्ये बांधण्यात आल्या आहेत. त्या प्रोजेक्टचं नाव आहे साबरमती रिव्हरफ्रंट. पण त्यानंतर बारमाही कोरडी असणाऱ्या साबरमतीला २०१६ मध्ये पूर आला आणि रिव्हरफ्रंटचा वॉकवे पाण्याखाली गेला. नदीकाठच्या २५ गावांना हायअलर्ट जरी करण्यात आलं. म्हणजे पूर ना येणाऱ्या नदीला रिव्हरफ्रंटमुळे पूर आला.

आणि आता अशाच धर्तीवर पुण्याच्या मुळा – मुठा नदीपात्रात दोन्ही बाजूंना ३०-४० फूट उंचीच्या काँक्रिटच्या किंवा दगडी भिंती उभारून नदीला कालव्याचे स्वरूप दिले जाणार आहे. हा पुणे भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हंटल जातंय. म्हणजे आता साधा सुधा पूर येणाऱ्या मुळा मुठेला महापूर येणार.  त्यामुळे आधी साबरमती रिव्हरफ्रंट बघूया म्हणजे पूर कसा येईल हे तुम्हाला समजेल.

खरं तर साबरमती रिव्हरफ्रंट हा नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट होता. 

साबरमती रिव्हरफ्रंट हा प्रोजेक्ट अहमदाबादमधील साबरमती नदीच्या काठावर विकसित झालेला आहे. साबरमती नदी काठावर विकास करण्यासाठी १९६० च्या दशकातच रिव्हरफ्रंटचे प्रस्ताव आले. या बहुआयामी प्रकल्पाची कल्पना १९९८ मध्ये तयार करण्यात आली होती. तर २००५ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

या प्रकल्पाच्या अनुक्रमामध्ये अनेक टप्प्यांचा समावेश होता. खालच्या स्तरावर नदीच्या सभोवतालचे काम, जे बावीस किलोमीटर लांब जलमार्ग पादचारी क्षेत्र आहे. हे सर्व भाग आता सार्वजनिक वापरासाठी खुले आहेत. तीन बोटिंग स्टेशन कार्यरत आहेत, लॉन्ड्री कॅम्पस आणि दोन उद्याने जानेवारी २०१४ मध्ये पूर्ण होऊन सार्वजनिक वापरासाठी खुली झाली आहेत. फेब्रुवारी २०१४ पासून रिव्हरफ्रंट मार्केट देखील पूर्ण कार्यरत झाले.

या रिव्हरफ्रंटचा उद्देश अहमदाबादला वॉटरफ्रंट वातावरण प्रदान करणे आणि नदीच्या आसपास अहमदाबादची ओळख पुन्हा नव्याने निर्माण करणे होता. हा प्रकल्प शहराला पुन्हा नदीशी जोडण्याचा आणि नदीच्या काठाच्या दुर्लक्षित बाबींचा सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न होता.

साबरमती रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रकल्पांपैकी एक होता. २००१ मध्ये नरेंद्र मोदींनी गुजरातची सत्ता हाती घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी साबरमती रिव्हरफ्रंटच्या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचा संकल्प केला होता.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींनी या रिव्हरफ्रंटसह अमेरिका आणि लंडनच्या धर्तीवर साबरमती नदीच्या आसपासचा परिसर विकसित करण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु त्याच्या बांधणीनंतर आणि या रिव्हरफ्रंटचा अभ्यास केल्यानंतर, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

अहमदाबाद हे गुजरातचे एक महत्त्वाचे शहर आहे जिथे साबरमती नदीच्या काठावर वॉटरफ्रंट विकसित करून साबरमती रिव्हरफ्रंट बांधण्यात आला आहे. आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या साबरमती नदीच्या वरून नर्मदा कालव्याची एक वाहिनी  जाते. गुजरात सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने या वाहिनीद्वारे साबरमतीला पाणी आणले.

पण साबरमतीला पाणी आणण्याच्या नादात, नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना, शेती करणाऱ्यांना  येथून सक्तीने विस्थापित करण्यात आले. साबरमती रिव्हरफ्रंटला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले. सरकारी भाषेत सांगायचं झालं तर नदीच्या किनाऱ्यावरच अतिक्रमण हटवून नदीच्या प्राकृतिक स्वरूपाला कॉन्क्रीटचे सुशोभीकरण करण्यात आले. 

आता तुम्हाला असं वाटेल साबरमती रिव्हरफ्रंट तर अमेरिका आणि लंडनच्या धर्तीवर विकसित करण्यात आलंय. पण इथं लक्षात घेतलं पाहिजे कि, अमेरिका किंवा लंडन सारख्या देशांत रिव्हरफ्रंट बनवताना नद्यांच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का लावला जात नाही. म्हणजे त्यांच्यासारखं आपल्याला बनायचंय तर त्यांच्यासारख्या गोष्टींचं आपण अनुकरण नको का करायला?

लंडनची थेम्स नदी किंवा मग अमेरिकेची हडसन नदीच्या किनाऱ्यावर भिंती बांधल्या आहेत. पण या भिंती बांधताना त्यांनी एक्टिव फल्ड प्लेन सोडून बाजूला भिंती बांधल्यात. म्हणजे त्यांनी नद्यांचं नैसर्गिक स्वरूप आहे तसेच ठेवलंय. पण आपल्या देशात रिव्हरफ्रंट म्हणजे नदीला कालव्याच स्वरूपच दिल जातंय. तिच्या नैसर्गिक स्वरूपाचं आकुंचन करून मग त्यावर भिंती उभारल्या जातायंत.

थेम्स आणि हडसन नदीचा विचार करता या नदीच्या बाजूने भिंती बांधल्या ते केवळ या नद्यांच्या प्राकृतिक किनाऱ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून. नदीपात्रात अतिक्रमण होऊ नये यासाठी, सुशोभीकरणासाठी नव्हे. त्यात हि त्यांनी या भिंती उभारल्या पण त्या भिंती अगदी तळापर्यंत उभारल्या नाहीत. म्हणजे  नदीचा भूजल प्रवाह खेळता राहावा हे कारण.

आपण अमेरिका आणि लंडनच्या धर्तीवर साबरमती रिव्हरफ्रंट विकसित तर केला पण थेम्स, हडसन आणि इतर युरोपियन नद्यांचा प्रवाह समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. साबरमती ही बारमाही वाहणारी नदी नाही. ती आणि इतर विदेशी नद्या एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांच्या उगमाचा काळ, पर्यावरण, वाहण्याचा मार्ग काहीच सारख नाही. तेथे नद्यांवर जे काही बांधकाम केले गेले आहे ते पूर्णपणे न्याय्य आहे. नद्यांच्या स्वरूपाशी कोणतीही छेडछाड केली गेली नाही. तर आपण इथे साबरमतीचे मूळ पात्रच बदलले आहे.

आणि आता येऊ मुळा मुठाकडं. जसं परदेशातल्या नद्या आणि आपली साबरमती यांच्यात काहीच साम्य नाही. अगदी त्याच पद्धतीत आपल्या मुळा मुठा आणि साबरमती मध्ये काहीच साम्य नाही. त्यामुळे मुळा मुठेचं रिव्हरफ्रंटद्वारे सुशोभीकरण करताना आपण त्यांना महापूर यावा, अशी तरी तजवीज करीत नाही ना ? हे बघणं तितकंच संयुक्तिक ठरेल.

शेवटी, किती ही काही केलं तरी नैसर्गिक गोष्टी बदलून मानवनिर्मित गोष्टी  किती काळ तग धरून राहतील यावरच एखाद संशोधन करावं लागेल.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.