लॉर्ड्स गाजवणारे वेंगसरकर त्यादिवशी आपल्याच वानखेडेच्या पिचवर रडत होते…

रणजी क्रिकेट म्हणजे भारतीय क्रिकेटचा गाभा, सचिन, कोहली सोडा कपिल देव, गावसकर असे कित्येक हिरे या स्पर्धेनं दिले. आता रणजी ट्रॉफी स्पर्धा जेव्हा सुरू झाली, तेव्हा आपले पप्पा सोडा आजोबाही जन्माला आले नव्हते. कारण स्पर्धेला सुरुवात झाली, पार १९३५ मध्ये.

म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत कित्येक मॅचेस झाल्या, कित्येक जण घडले आणि कित्येक भारी क्षण अनुभवायला मिळाले.

लय डीप न जाता, थेट मुद्द्यावर येऊयात.

हा किस्सा आहे एका मॅचचा, अशी मॅच जी कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाहायला मिळाली नसती. या मॅचमध्ये एवढे खतरनाक खेळाडू होते की, विषयच नाही. म्हणजे एका टीममध्ये होते, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत आणि कॅप्टन संजय मांजरेकर अशी फौज. आता हुशार भिडूंनी ओळखलं असेलच, की ही टीम होती मुंबईची.

समोरची टीमही खुंखार होती, कारण यांच्याकडे होते, अजय जडेजा, चेतन शर्मा आणि स्वतः कपिल देव, ही टीम होती हरियाणाची.

मॅच पण कुठली साधी-सुधी नव्हती, १९९०-९१ च्या रणजी ट्रॉफीची फायनल.

रणजी ट्रॉफी म्हणजे मुंबई टीमची सिंगल हॅन्ड सत्ता, इथले डॉन तेच. त्यांना हरवणं मुश्किल ही नही, नामुमकीन है असला सिन. पण समोर कॅप्टन कपिलची टीम होती. कॅप्टन कपिलनं वाढीव वेस्ट इंडिजला हरवलं होतं, त्यामुळं तो काहीही करू शकतो… हे सगळ्या जगाला माहीत होतं.

टॉस उडाला, पहिली बॅटिंग आली हरियाणाची. पहिली विकेट झटकन गेली, पण दीपक शर्मा आणि अजय जडेजानं खुंखार बॅटिंग गेली. दीपक शर्मानं पार रन्सचा पाऊस पाडत १९९ रन्स मारले. त्याची डबल सेंच्युरी थोडक्यात हुकली. अजय जडेजाची सेंच्युरी ६ रन्सनं गेली, त्यानं केले ९४.

अमरजित कायपेनंही एक बाजू लाऊन धरत ४५ रन्स मारले. मुंबईकडून एकच गडी विकेट्स काढत होता, ॲबे कुरुविला. त्याचं बघून साहिल अंकोलाला चेव आला असणार कारण त्यानं सनासना विकेट्स काढायला सुरुवात केली. ४ आऊट २९४ वरुन हरियाणाचा स्कोअर झाला ७ आऊट ३५८.

तिथून पुढं आला चेतन शर्मा, समोरच्या टीममधला प्रत्येक बॉलर जणू काही जावेद मियाँदाद आहे, असं समजून त्यानं हाणामारीला सुरुवात केली. बघता बघता भावानं ९८ रन्स मारले. त्याचीही सेंच्युरी हुकली, नशीब फक्त हरियाणाच्या पोरांचंच खराब होतं असं नाही, मुंबईनं आठ कॅचेस सोडले होते.

सगळ्या गोष्टी होऊन हरियाणानं स्कोअर केला, ५२२.

आता ५२२ म्हणजे लय रन्स झाले, पण स्टॅन्डमधले कट्टर मुंबईकर प्रेक्षक म्हणत होते, “सचिन, विनोद आणि वेंगसरकर हे तिघंच लय झाले.” पण आऊट ऑफ सिलॅबस आल्यासारखे लालचंद राजपूत आणि संजय पाटील हरियाणावर तुटून पडले. मुंबईची टॉप ऑर्डर एक नंबर खेळली, पण मिडल ऑर्डरनं तुझं थोडं, माझं थोडं करत कल्टी मारली. एकट्या तेंडल्यानं ४७ केले, बाकी तिशीत आऊट झाले.

ज्याच्या हाणामारीवर लोकांनी पैजा लावलेल्या तो कांबळी ५ रन करुन आऊट झाला. चंद्रकांत पाटीलनं ४० मारत मुंबईचा दिवा मिणमिणत ठेवला होता.

मुंबईचा डाव संपला ४१० रन्सवर. हरियाणाला ११२ रन्सचं लीड मिळालं. आता रणजी ट्रॉफी स्पर्धेत एक गणित असतंय, जी टीम पहिल्या इनिंगमध्ये लीड मिळवेल, ती जिंकली. या लॉजिकनं हरियाणा जिंकल्यात जमा होती.

पण मुंबईची रणजी टीम म्हणजे कसलेला पैलवान, कितीही लढा पाठ टेकवणार नाही.

दुसऱ्या इनिंगमध्ये मुंबईच्या बॉलर्सनं हरियाणाचा सपशेल बाजार उठवला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हरियाणाच्या १५९ वर ८ विकेट्स पडल्या होत्या. अजय बॅनर्जीचे ६० आणि कॅप्टन कपिलचे ४१ हाच काय तो हरियाणाच्या दिलासा होता. अजय बॅनर्जीनं तळाच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेतलं आणि लीड वाढवलं ३५४ पर्यंत.

आता खरी रंगत आली होती

मुंबईला जिंकायला ३५५ रन्स हवे होते, तर हरियाणाला १० विकेट्स. मुंबईची पहिली विकेट गेली, ३ रन्सवर आणि पुढच्या दोन गेल्या ३४ रन्सवर. वानखेडेवर टेन्शनची लाट पसरली होती. पण तरीही लोकांना जिंकण्याचा विश्वास होता, कारण क्रीझवर सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर होते.

सचिन तेव्हा तसा लहान होता, पण पाकिस्तानला फोडून आलेला… वेंगसरकर म्हणजे तर लॉर्ड ऑफ लॉर्ड्स, लय मोठा प्लेअर. या दोघांच्या संयमाला खाली विनोद कांबळी नावाचा फटाकाही बूस्टर देऊ शकत होताच.

सचिन आणि वेंगसरकरनं १३४ रन्सची पार्टनरशिप केली. विशेष म्हणजे ‘तेंडल्या मारतोय’ ही बातमी जशी मोबाईल नसणाऱ्या जमान्यात व्हायरल झाली, तशी वानखेडेवर गर्दी वाढली. मुंबईचा हा रनचेस पाहायला जवळपास १८ ते २० हजार लोकं वानखेडेवर जमले होते. सचिनही भरात होता, ९ फोर आणि ५ सिक्स मारुन ९६ रन्सवर खेळत होता.

त्याच्या सेंच्युरीला एकच फोर हवी होती आणि सचिन गेला. नर्व्हस नाईंटीज… दुसरं काय.

कांबळी क्रीझवर आला, ४५ रन्सचा तडाखा दिला आणि आऊट झाला. त्याच्यामागं रांग लावल्यासारख्या विकेट्स पडत होत्या. शेवटची विकेट राहिलेली आणि जिंकायला हवे होते ९ रन्स.

तरीही सगळ्या वानखेडेला वाटत होतं, मुंबई जिंकणार… कारण क्रीझवर सेंच्युरी मारणारा वेंगसरकर होता.

त्याला क्रॅम्प्स येत होते, त्यामुळं लालचंद राजपूत त्याचा रनर होता. कुरुविलानं बॅटला बॉल लावला तरी खूप होतं कारण समोर वेंगसरकरचं प्रॉपर ठोककाम सुरु होतं. योगेंद्र भंडारीच्या एका ओव्हरमध्ये त्यानं ३ सिक्स २ फोर मारल्या. फक्त ६ बॉलमध्ये टारगेट निम्मं झालं होतं.

सिंगल-डबल घेत मॅच आणखी जवळ आली. आता मुंबईला जिंकायला हव्या होते फक्त ३ रन्स. बॉलिंगला होता चेतन शर्मा, ओव्हरचा चौथा बॉल. कुरुविलानं शॉर्ट फाईन लेगला ग्लान्स केला, नॉन स्ट्राईकर एन्डवरुन राजपूत पळ म्हणाला खरा, पण दोघंही गडबडले.

 अमरजित कायपेनं आपल्या जिंदगीतली ती सुवर्णसंधी गमावली नाही आणि परफेक्ट थ्रो दिला. कुरुविला रनआऊट आणि मुंबई हरली.

त्यानंतरचं मैदानावरचं चित्र असं होतं, पहिल्यांदाच रणजी जिंकलेला हरियाणाचा संघ नाच होता आणि मुंबईच्या उन्हात क्रॅम्प्सची पर्वा न करता नॉटआऊट १३९ रन्स मारलेला वेंगसरकर लहान मुलासारखं रडत होता.वानखेडेच्या स्टॅन्डवरही सन्नाटा होता, कित्येक जण रडत होते… कारण त्यांच्या हिरोची झुंज अपयशी ठरली होती.

मुंबईची टीम लय बाप प्लेअर असलेली होती, त्यांनी मॅच जवळपास जिंकलीही होती.. पण कपिल देव आणि हरियाणानं जिंकून दाखवलं. हेच क्रिकेट असतं, कधीही काहीही होऊ शकतं, हे साऱ्या जगाला समजलं.. सचिनपासून वेंगसरकरसकट… सगळ्या जगाला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.