जगभरात एका शस्त्रक्रियेला या मराठी डॉक्टरच्या नावाने ओळखलं जातं.

गोष्ट आहे १९५६ सालची. अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध जॉन हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये सर्जरीचा अभ्यास करणार्‍या निरनिराळ्या देशांतील डॉक्टरांसाठी एक शैक्षणिक कार्यशाळा ठेवली होती.

त्यात वॉशिंग्टन येथील सुप्रसिद्ध स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. रॉबर्ट बार्टर व्याख्यान देत होते. त्यावेळी त्यांनी ‘गर्भावस्थेचे विकार’ या विषयावरील एक एक्सरे दाखवला आणि सांगितलं,

‘‘या अवस्थेमध्ये अवघडलेल्या स्त्रीला आपण काहीच साहाय्य करू शकत नाही, सध्याच्या आरोग्यशास्त्रात यावर कोणतीही शस्त्रक्रिया उपलब्ध नाही.’’

जगभरातील अनेक देशातून डॉक्टर आले होते या सर्वातून एक हात वर आला. तो हात भारतातून आलेले डॉक्टर, सनत जोशी यांचा होता.

त्याने उठून सांगितले,

‘‘ही परिस्थिती भारतामध्ये तरी खरी नाही. डॉ. शिरोडकरांनी शोधून काढलेल्या शस्त्रक्रियेने अशा तर्‍हेने होणारे गर्भपात टाळून पूर्ण दिवसांची प्रसूती होते.’’

त्या काळी भारतीय डॉक्टर्सची जगात विशेष प्रसिद्धी नव्हती. किंबहुना भारतीय डॉक्टरांचे खास स्वत:चे संशोधन असू शकेल यावर पाश्चात्त्यांचा विश्वास नव्हता, तशी त्यांची मनोधारणाही नव्हती.

अशावेळी ही अवघड शस्त्रक्रिया करणारे डॉ. शिरोडकर आहेत तरी कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला.

डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर

त्यांचं मुळगाव गोव्यातील शिरोडे. त्यांचं शिक्षण हुबळी व पुणे येथे झालं. पुढे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम्. बी. बी. एस्. (१९२३) आणि स्त्रीरोगविज्ञान व प्रसूतिविज्ञान या विषयांत एम्.डी. (१९२७) केली.

इंग्लंडमध्ये जाऊन एफ्. आर. सी. एस्. (इंग्लंड), एफ्. ए. सी. एस्. एफ्. आर. सी. ओ. जी. व अन्य पदव्याही त्यांनी संपादन केल्या. इंग्लंडहून परत आल्यावर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.

स्त्रियांच्यात होणारे गर्भपात हा त्यांच्या खास चिंतनाचा व अभ्यासाचा विषय होता.

गर्भातील बालकाचे वजन वाढले की, काही स्त्रियांत ते गर्भाशयाला न पेलल्यामुळे गर्भपात होतो. असे गर्भपात टाळण्यासाठी त्यांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण नवीन शस्त्रक्रिया शोधून काढली.

ती शिरोडकर शस्त्रक्रिया किंवा शिरोडकर टाका (शिरोडकर स्टिच) या नावाने जगभर प्रसिद्ध झाली.

या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांनाही त्यांचेच नाव देण्यात आले. यापूर्वी फॉदरगिल या वैद्यकशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या शस्त्रक्रियेत त्रुटी होत्या.

शिरोडकर यांनी शोधलेली शस्त्रक्रिया अधिक सोपी, निर्दोश, जास्त उपयुक्त, जवळजवळ रक्तस्रावरहित आहे, असा निर्वाळा न्यूटन, झॉंडिक इ. अनेक शास्त्रज्ञांनी दिला.

सनत जोशी या त्यांच्या विद्यार्थ्यामुळे व नार्टर यांनी केलेल्या प्रचार-प्रसारामुळे शिरोडकरांचे हे कार्य अमेरिकेत पोहोचले.

ग्रीन आर्मिटिज यांनी या शस्त्रक्रियेला ब्रिटनभर प्रसिद्धी दिली. स्त्रीरोगतज्ञांच्या तिसऱ्या जागतिक परिषदेत (१९६१) या शस्त्रक्रियेवर जगातील तज्ञांनी निबंध वाचले.

एवढंच नाही तर त्यांनी केलेल्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेच्या चित्रफिती जगभरातल्या मेडिकल कॉलेजमध्ये आजही दाखवल्या जातात.

इंग्लंड असो की अमेरिका प्रत्येक देशातील मातांच्या दुवा त्यांना मिळाल्या असतील.

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील या शोधांमुळे त्यांना जगभरातून निमंत्रणे येत असत.

त्यांनी केलेल्या संशोधनाप्रीत्यर्थ राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान झाला. त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची गणतीच नाही. इंडियन फेडरेशन ऑफ ऑब्स्टॅट्रिक्स  अँड गायनेकॉलॉजी या संस्थेच्या अधयक्षपदी ते १९६१ साली निवडले गेले.

वैद्यकीय क्षेत्राबरोबरच त्यांना संगीत, चित्रकला, गोल्फसारख्या खेळात आणि इतरही अनेक विषयांत गती आणि आवड होती. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी व पोर्तुगीज या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. कन्नड व रशियन या भाषाही ते शिकले. अनेक मानसन्मानांचे व पारितोषिकांचे ते मानकरी ठरले.

भारत सरकारने डॉ. शिरोडकरांना १९६० मध्ये ‘पद्मभूषण’ आणि १९७१ मध्ये ‘पद्मविभूषण’  हे किताब दिले.

7 मार्च 1971 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या नावे संशोधन संस्था व प्रयोगशाळा उभारून त्यांचे उचित असे स्मारक मुंबई व पुणे येथे उभे करण्यात आले आहे.

संदर्भ- मराठी विश्वकोश

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.