एकही रुपया न घेता लाखो रुपयांची सर्जरी मोफत करणारे डॉक्टर

डॉक्टरांना पृथ्वीवरचा देवमाणूस म्हणतात, याची प्रचिती आपल्याला कोरोना महामारीच्या काळात झाली. जेव्हा डोक्यावर मृत्यूचं सावट होतं, तेव्हा सगळ्यांच्याच विश्वास होता फक्त डॉक्टरांवर. आणि कोरोनाचं नाही तर इतर वेळी सुद्धा आपल्याला अशी बरीच उदाहरणं मिळतात.

यातचं आवर्जून नाना घेतलं जाईल डॉ. सुबोध कुमार सिंग यांचे. मुलांच्या चेहऱ्यावर खरखूरं हसू आणण्यासाठी वाराणसीच्या या डॉक्टरांनी आतापर्यंत ३७ हजार शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.

आता खरंखुरं हसू म्हणजे बऱ्याच लहान मुलांच्या जन्मतः ओठ आणि तोंडात काही विकृती असते. त्याला मेडिकल भाषेत क्लेफ्ट लिफ्ट असं म्हणतात. या शारीरिक विकृतीने ग्रस्त असलेल्या मुलांना लहानपणापासूनचं दूध पिणं किंवा साधा बाल आहार घेणं अवघड जायचं. आणि हळू हळू ते जेव्हा मोठे होतात तेव्हा ते दिसण्यात देखील विचित्र दिसतात. त्यामुळे लोक त्यांची खिल्ली तरी उडवतात नाही तर त्यांची किळस करतात.

आता या विकृतीवर उपाय नाही असं नाही, सर्जरी करून आपण हा प्रॉब्लेम दूरही करू शकतो. पण सर्जरीसाठी बक्कळ पैसे मोजावे लागतात. जी प्रत्येकालाचं परवडणारी नसते. गरीब घरातली लोकं तर हा सर्जरीचा आकडा फक्त ऐकूचं शकतात.

अशा परिस्थितीत डॉ. सुबोध अशा मुलांची मदत करतात. जनरल सर्जरीमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलयं. त्यांचा दवाखाना तर आहे पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबासाठी ते खास शिबिरे घेतात.

डॉ. सुबोध यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,

 ‘ व्यवस्थित आहार किंवा शरीराला गरजेपुरते दूधही न मिळाल्यामुळे अशी मुले कुपोषणानेही मरतात. मुलांना बोलण्यासाठी जीभ वापरण्यात अडचण येते. या विकृतीमुळे त्यांच्या कानातही इन्फेक्शन होते.’

एवढचं नाही डॉ. सुबोध सांगतात, अशी मुले शाळाही पूर्ण करू शकत नाहीत, त्यात नोकरी मिळणे तर कठीणचं. पालकांनाही खूप मानसिक त्रास सहन कारावा लागतो. विशेषतः आई कारण लोक त्यांना या आजारासाठी जबाबदार मानतात. परंतु या सर्व गोष्टी शस्त्रक्रियेद्वारे दूर केल्या जाऊ शकतात.

यामुळेच २००४ पासून त्यांनी आपली वैद्यकीय कारकीर्द अशा मुलांना समर्पित केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी ३७,००० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. ज्यामुळे हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात त्यांना यश आलयं.

डॉ. सुबोध या सर्जरी मोफत करतात, कारण गरीबी काय असते हे त्यांना सुद्धा चांगलचं माहितीये. डॉ. सुबोध चार भावांमध्ये सर्वात लहान. १३ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुटुंब चालवण्यासाठी त्यांच्या भावांना शिक्षण सोडावे लागले. डॉ. सुबोध यांनी सुद्धा आपल्या भावांसोबत मेणबत्त्या, साबण आणि ग्लासेस विकून पैसे कमवले.

दरम्यान, डॉक्टर सुबोध यांचे वडील सरकारी कारकून होते. त्यामुळे मोठ्या भावाला त्यांच्या जागी नोकरी मिळाली. त्यांच्या भावानेच सुबोध यांना शिकवले. कुटुंबीयांच्या मदतीने आणि त्यांच्या आवडीमुळे त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाले.

त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून शिक्षण पूर्ण केले. आपल्या संघर्षातूनचं ते आज इथपर्यंत पोहोचले आहेत. डॉक्टर असूनही त्यांनी कधीही बाकीच्यांसारखं पैसे कमवण्याचा विचार केला नाही. त्याउलट त्यांनी आपल्या पेशेला समाजसेवेत बदलत समाज आणि मुलांच्या भल्यासाठी वापरत आहेत.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.