हिरोजी म्हणाले, दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.
२५ नोव्हेंबर १६६४, मालवण जवळील कुरटे बेट. स्वतः महाराजांची स्वारी या बेटावर आली होती. खुद्द शिवाजी महाराज तळकोकणातल्या या निर्जन बेटावर का आलेत याची उत्सुकता सगळ्या गावकऱ्यांना लागली होती.
अरबी सागरात स्वराज्याचा धाक निर्माण करणाऱ्या सिंधूदुर्गाच भूमीपूजन सुरु होत.
आज जिथ मोरयाचा धोंडा म्हणून ओळखलं जात तिथे एका खडकावर गणेशमूर्ती आणि त्याच्या दोन्ही कडे सूर्यचंद्र कोरून त्याची शिवरायांच्या हस्ते पूजा करण्यात आली. किल्ल्याची जागा पाहता क्षणीच राजांना आवडली होती. स्वराज्याचे बांधकामप्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी आखलेल्या नकाशा प्रमाणे किल्ला उभारत होता. हजारो पाथरवट खपत होते. स्थानिक गवंडयांपासून ते पोर्तुगीज इंजिनियर सगळ्यांचा परामर्श घेण्यात आला होता.
शिवरायांच्या स्वप्नातला अजिंक्य जलदुर्ग उभारण्यासाठी कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी हिरोजी घेत होते.
तीस फुट उंच आणि बारा फुट रुंद अशी दोन मैल पसरलेली तटबंदी उभारण्यात आली. त्याच्या पायाला शिसे ओतण्यात आले होते. ठिकठिकाणी बावीस बुरुज उभारले होते. विशेष म्हणजे या तटावर संरक्षणासाठी असणारया रखवालदारांसाठी शौचकुप्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. नागमोडीवळणाच्या खिंडीतून दुर्गाचा मुख्य दरवाजा लपवण्यात आला होता. चोहोबाजूंनी अथांग पसरलेल्या अरबी सागराच्या मधोमध असूनही किल्ल्यामध्ये तीन गोड्या पाण्याच्या विहिरी उभारल्या होत्या.
किल्ला पूर्ण होईतोवर १ कोटी होण खर्च झाले होते.
राजे औरंगजेबाच्या कैदेत होते तेव्हाही किल्ल्याचं काम थांबलं नाही. हौशेने सुरु केलेल्या या दुर्ग उभारणीसाठी शिवरायांनी निधीची कमतरता पडू दिली नाही तीन वर्षांनी म्हणजेच १६६७ च्या हनुमान जयंतीच्या दिवशी किल्ला बांधून पूर्ण झाला. वास्तुशांतीच्या मुहूर्ताला महाराज सिंधुदुर्गावर आले. मोठा सोहळा साजरा करण्यात आला.
महाराज किल्ला बघून शिवराय वदले,
“चौऱ्याऐंशी बंदरात ऐसी जागा नाही”
सिंधूदुर्गामुळे आता स्वराज्याकडे डोळे वर करून पहायची हिंमत इंग्रज पोर्तुगीजांपासून सिद्धी आदिलशहापर्यंत कोणाचीच नव्हती.
“बारा टोपकरांच्या छातीवर निर्मिली शिवलंका”
असे वर्णन बखरकारांनी सिंधुदुर्गाबद्दल करून ठेवलं आहे. किल्ला उभारणाऱ्या प्रत्येक पाथरवटास बक्षिसे देण्यात आली. त्यांच्या नायकाला वस्त्र, सोन्याचा कडा देण्यात आला.
हे सर्व झाल्यावर शिवराय हिरोजी इंदुलकरांकडे वळले,
“हिरोजी तुम्हाला काय हवे.”
हिरोजी याक्षणाची वाटच बघत होते. त्यांनी एक तबक मागवले. त्यात चुनखडी आणि जस्त यांचे मिश्रण ठेवले होते. हिरोजीनी राजांना विनंती केली,
“महाराज, या किल्ल्यावर आपण सदैव असाव अशी सगळ्यांची इच्छा आहे. दुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चरणकमलाचे दर्शन व्हावे हेच आमचे बक्षीस.”
महाराज आवक झाले. त्यांनी हिरोजींची इच्छा मोडली नाही. शिवरायांच्या उजव्या पंजाचा आणि डाव्या पायाचा ठसा घेण्यात आला.
आजही त्याचे दर्शन सिंधुदुर्गावर येणाऱ्या प्रत्येकाला घेता येते.
याच हिरोजी इंदुलकरानी स्वराज्याची राजधानी रायगडाचीही निर्मिती केली. यावेळीही त्यांनी कोणतीही देशमुखी सोननाण मागितलं नाही. मागितली फक्त एक पायरी. शिवराय रायगडावर ज्या जगदीश्वराच्या दर्शनाला जायचे त्यांच्या चरणाचीधूळ कायम आपल्या नावावर पडावी एवढीच इच्छा त्यांची होती.
आजही त्या पायरीवर ठसठशीत पणे लिहिले आहे,
“सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर”
हे ही वाच भिडू.
- शिवरायांनी रायगडावर स्थापन केलेला लिहिता मंडप काय होता??
- स्वराज्याचा दूसरा तानाजी , ज्यांनी सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला.
- छ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली होती
- लायजी पाटलांनी जंजिऱ्याच्या सिद्दीला अरबी समुद्रात गाडण्यासाठी धाडसी योजना आखली होती.