भारताला गुलाम बनवणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीवर आता एक भारतीय माणूस राज्य करतो
साधारण ४२० वर्षांपूर्वी म्हणजे १६०० सालमध्ये व्यापाराच्या उद्देशाने इस्ट इंडिया कंपनी भारतात पाऊल ठेवले आणि हळू हळू आपले पाय पसरले. त्यानंतर स्वतःच सैन्य उभं करत, इथल्या राजकारणात सहभाग घेण्यास सुरुवात केली, आणि कालांतराने भारतातील सर्व सत्ता आपल्या हातात घेतली.
साधारण १६०० ते १८५८ अशी तब्ब्ल २५८ वर्ष या कंपनीने भारतावर राज्य केलं, एवढ्या वर्षा इंग्लंडमधल्या या कंपनीने भारताला कसं आणि किती लुटलं हा तर इतिहासात आपण सगळेच जाणतो, आणि पुस्तकात तो वाचतो देखील.
पण आज गोष्ट अशी आहे की, एकेकाळी भारताला लुटणाऱ्या याच कंपनीचा मालक मात्र आज एक भारतीय व्यक्ती आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी हि ऐतिहासिक गोष्ट साकार केलीय मुंबईकर असलेल्या,
उद्योजक संजीव मेहता यांनी.
संजीव मेहतांचा हे मूळचे मुंबईचे. मुंबईतल्याच सिडनहॅम महाविद्यालयात शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील जेमॉलॉजिकल इन्स्टिट्युटमधून शिक्षण पूर्ण केलं. घरातच हिऱ्यांचा व्यवसाय असल्याने त्यांना साहजिक त्यात आवड होती म्हणून ते भारतात परत आले.
१९८३ मध्ये त्यांनी हिऱ्यांच्या कौटुंबिक व्यवसात लक्ष द्यायला चालू केलं. त्यानंतर पुढच्या काही वर्षांतच त्यांनी आपला उद्योग भारतासोबतच इतर देशांमध्ये देखील वाढवाला. यातूनच ते १९८९ साली लंडनमध्ये स्थायिक झाले.
तिथे देखील त्यांच्या यशाची घौडदौड चालू असताना ते इतकी यशस्वी ठरले कि एकेकाळची जगातील सर्वात मोठी कंपनी त्यांनी आपल्या नावावर केली.
ते कशी नावावर केली हे तर सांगणारच आहे पण आधी जरा कंपनीचा इतिहास काय सांगतो ते बघूया म्हणजे संजीव यांनी ती कशी खरेदी केली हे लक्षात येईल.
इतिहासात अशी सुरु झाली होती इस्ट इंडिया कंपनी….
राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या सहीने ३१ डिसेंबर १६०० रोजी ईस्ट इंडियाची स्थापना झाली. सर थॉमस स्मिथ हे कंपनीचे पहिले गव्हर्नर होते. पहिल्यांदा मद्रास त्यानंतर कोलकाता असं करत करत ईस्ट इंडिया कंपनीने दबक्या पावलांनी भारतात शिरकाव केला.
१६९० साली कोलकत्यात तर ट्रेडिंग सेंटरच उभं करण्यात आलं. व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनी भारत आणि चीनमध्ये वेगाने पसरत होती. दागिने, खाद्य पदार्थ, चामडं, फर्निचरचा वापर कंपनीकडून केला जात असे.
कालांतराने भारतात ईस्ट इंडिया कंपनीने केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता स्वत:चं सैन्य निर्माण केलं, प्रशासन निर्माण केलं आणि देशावरच सत्ता मिळवली.
पण जेव्हा १८५७ मध्ये भारतात पहिल्यांदा स्वातंत्र्याचा उठाव झाला तेव्हा ब्रिटिश शासनाला हा मोठा धक्का होता. त्यामुळे याचा व्हायचा तो परिणाम झाला. ज्या गतीने इस्ट इंडिया कंपनीने आपला कारभार वाढवला होता, अगदी त्याच गतीने ब्रिटिश प्रशासनाने कंपनीचे पंख छाटले.
१८५८ मध्ये भारत सरकार कायदा बनवून ब्रिटिश सरकारने कंपनीच राष्ट्रीयकरण केलं आणि भारताची सत्ता आपल्या हातात घेतली. यानंतर कंपनीला बंद करण्याची प्रक्रिया सुरु झाली.
यासाठी ईस्ट इंडिया स्टॉक डिविडेंड रिडेम्प्शन ऍक्ट बनवून १ जानेवारी १८७४ ला कंपनी अधिकृत रित्या बंद झाली.
मग कंपनी पुन्हा कशी सुरु झाली? आणि ती भारतीयाच्या नावावर कशी झाली?
तर याच उत्तर म्हणजे, १९ व्या शतकामध्ये कंपनी बंद केल्या नंतर पुढच्या अनेक वर्ष ती केवळ इतिहास आणि पुस्तकांमध्ये वाचायला मिळत होती. पण १९८० च्या दशकात लंडनमधील ३० ते ४० जणांना वाटलं की, ईस्ट इंडिया प्रचंड ताकदीचा ब्रँड आहे.
त्यामुळे त्यांनी कंपनीत आर्थिक गुंतवणूक केली, शेअर्स घेतले आणि कंपनीला पुन्हा सुरू केलं.
त्यावेळी इंग्लंड मध्येच स्थायिक असलेल्या संजीव मेहता यांनी या गोष्टीची माहिती मिळाली. तेव्हा त्यांना २००० सालापासूनच ईस्ट इंडिया कंपनीवर लक्ष द्यायला चालू केलं. सुरुवातीला काही शेअर त्यांनी खरेदी केले. यानंतर एक-एक पायरी वर चढत आणि कंपनीत जम बसवत,
२००५ साली सगळ्या ३० ते ४० उद्योगपतींचे शेअर्स विकत घेत संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीची संपूर्ण मालकी स्वत:कडे घेतली.
त्यावेळी त्यांनी दीड कोटी डॉलर इतकी गुंतवणूक केली. सोबतच १० जणांची व्यवस्थापन टीम तयार केली.
२००५ नंतरची पुढची ३ वर्ष संजीव यांनी केवळ ईस्ट इंडिया कंपनीचा अभ्यास केला. कंपनीचा इतिहास काय आहे, कंपनीचा व्यापार कसा चालायचा याची माहिती असलेल्या संग्रहालयांना आणि विविध देशांना भेटी दिल्या. कंपनी त्या काळात विक्री करत असलेल्या उत्पादनांसंबंधी माहिती घेतली.
जगभरातील लोकांपर्यंत पोहचलेल्या या कंपनीने मागील १५ वर्षांमध्ये चहा, कॉफी, मसाल्याच्या पदार्थांसह अनेक क्षेत्रांमध्ये विस्तार केला आहे, यात गिफ्ट्स, खाद्यपदार्थ, सिगार, सोने आणि चांदीचे दागिने, सजावटीच्या गोष्टी, फ्रेम इत्यादी विविध वस्तूंचं उत्पदान आणि विक्री करते.
अलीकडेच सप्टेंबर २०१९ मध्ये कंपनीला नाणी बनवण्यासाठी टाकसाळची परवानगी मिळाली आहे. ज्यात १९१८ मध्ये ब्रिटिश इंडिया काळामध्ये शेवटचं बनवले गेलेल्या सोन्याची मुहरसाठीच्या परवानगीचा देखील समावेश आहे.
इतिहासात भले कंपनीने आक्रमक व्यापाराचे धोरण स्वीकारले असेल पण सध्याच्या परिस्थितीमध्ये कंपनी अतिशय संवेशनशीलपणाने आपला व्यापार पुढे नेत आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की कि, ज्या कंपनीने भारताला गुलाम म्हणून वागणूक दिली त्याच कंपनीचा मालकी हक्क एका भारतीय व्यक्तीनं मिळवणं ही नक्कीच अभिमानस्पद गोष्ट आहे. हरवलेलं साम्राज्य पुन्हा मिळवल्याची फिलिंग आहे ही.
हे हि वाच भिडू.