इलेक्ट्रिक बाईकला लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज का पडत नाही?

समस्त भिडू लोकांना आज एक प्रसंग आठवायला लावणार आहे. लोड घेऊ नका, लायसन्सचा विषय आहे. कधी तरी नाक्यावर, चौकात हवालदारानं कशासाठी पण आडवल्यावर पहिला प्रश्न असतोय, लायसन्स दाखव. दुसरा असतोय गाडीची कागदपत्र दाखव. हे दोन्ही क्लिअर असलं तर तिसरा असतो, इन्शुरन्सची, पीयुसीची कागदपत्र दाखव.

आता हे पण जर असलं तर मग हेल्मेट, नंबर प्लेट या गोष्टी येतात. थोडक्यात काय. एकदा अडवलं तर कुठल्या तरी गोष्टीत तुम्हाला कात्री लागते हे नक्की. अर्थात या गोष्टी पोलीस मुद्दाम करत नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठीच असतात.

मात्र या सगळ्याला अपवाद ठरत आहेत ते म्हणजे इलेक्ट्रिक स्कुटर चालवणारे.

त्यांना ना कोणी लायसन्स मागताना दिसत, ना कोणी गाडीची कागदपत्र विचारात, ना पीयूसी विचारत. पोलिसांच्या डोळ्यासमोरुन पोरं गाड्या पळवत जातेत. पण ते अडवत नाहीत. आणि यात विना हेल्मेट वाली पण असतेत बरं.

आता हे कसं काय शक्य आहे? भारतात सगळ्या गाडयांना कागदपत्र, त्या चालवणाऱ्यांना लायसन्स कम्पल्सरी असेल तर इलेक्ट्रिक बाईकवाले अपवाद का ठरत आहेत?

तर त्याचं कारण सापडतं मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये.

The battery operated vehicle shall not be deemed to be a motor vehicle.

म्हणजे काय तर ज्या स्कुटरचा वेग जास्तीत जास्त २५ किलोमीटर प्रतितास आहे आणि त्यांची २५० वॅट पर्यंतची इलेक्ट्रिक मोटार आहे, त्या गाडया या कायद्यांतर्गत येत नाहीत. त्यामुळेच त्यांना लायसन्सची गरज लागत नाही. तसचं अशा गाडयांची नोंदणी करण्याची देखील गरज नसते.

सोबतच ही स्कुटर चालवताना हेल्मेट देखील लागतं नाही. पण घातलेलं सुरक्षेच्या दृष्टीनं कधी पण चांगलचं. सोबतच या गाड्यांमुळे प्रदूषण होतं नाही त्यामुळे पीयूसीची पण गरज नाही.

त्यामुळे तुम्ही घरातून कोणत्याही कागदपत्राशिवाय बाहेर पडला तरी नो टेन्शन. फक्त ही स्कुटर चालवताना एक कार्ड कायम सोबत पाहिजे जे कि खरेदी करताना दिलं जातं. ज्यात ही गाडी २५ किलोमीटर प्रतितास आहे असा उल्लेख केलेला असतो.

पण २५० वॅट पेक्षा जास्त इंजिन असलेल्या गाड्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं.

आता तुम्ही म्हणालं ही गाडी घेतली तर फायदा असतोय का? सरकारकडून अशा गाड्यांचं भविष्य काय?

तर ही गाडी घेण्यात फायदाच फायदा आहे. एक तर सध्या पेट्रोल १०० वर गेलयं. त्यामुळे कंपन्यांच्या दाव्यानुसार या इलेक्ट्रिक बाईकचा वापर करुन तुम्ही केवळ ७ ते ८ रुपयांच्या किंमतीत १०० किलोमीटरचा प्रवास करू शकता. त्यासाठी केवळ ४ तास बॅटरी चार्ज करण्याची गरज असते.

जर तुम्ही सामान्य पेट्रोल बाईक किंवा स्कूटर्सचा विचार केलात तर १०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी १५० रुपयांचं पेट्रोल टाकायला लागत. त्यामुळे ते पैसे वाचू शकतायत.

त्या तुलनेत १५० रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाईवरुवन कमीत कमी २ हजार किलोमीटर सहज फिरुन होवू शकतं.

दुसरीकडे या गाड्यांच भविष्य सांगायचं तर, तज्ञांच्या म्हणण्यानुसार सरकार १५० सीसी च्या खालील सर्व पेट्रोल गाड्या २०२५ पर्यंत बॅन करण्याच्या विचारात आहे. तसचं २०३० पर्यंत संपुर्ण इलेक्ट्रिकरण करण्याच नियोजन आहे .

२०३० पर्यंत केवळ इलेक्ट्रिक गाड्या विकण्याच्या धोरणाबाबत कच्चा अहवाल निती आयोगाला आला आहे.

त्यामुळे मिलिंद गांगल या वाहन उद्योगातील तज्ज्ञ आणि अभ्यासक यांच्या मतानुसार, येत्या १५ वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहन इंटर्नल कंबशन इंजिनाच्या मदताने जगातील कच्च्या तेलाची बाजारपेठ उलथवून टाकतील, अशी शक्यता आहे.

याच मुख्य कारण म्हणजे आगामी ९ ते १० वर्षांत म्हणजेच २०३० पर्यंत आयात होणाऱ्या इंधनामध्ये दरवर्षी ६० अब्ज डॉलरची अर्थात ३.८ लाख कोटी रुपयांची आणि ३७ टक्के कार्बन उत्सर्जनाची बचत करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक कारना प्रोत्साहन देण्याचं धोरण केंद्र सरकारने स्वीकारलं आहे.

तिकडं दिल्ली सरकारनं या दिशेनं तयारी देखील सुरु केली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिल्ली सरकारकडून ईव्ही धोरण सुरू करण्यात आलं होतं, त्यात असं म्हटलं आहे की, २०२४ पर्यंत दिल्लीत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ४ वाहनांपैकी १ वाहन इलेक्ट्रिक असेल.

त्यानंतर त्या योजनेचा पुढचा पट्टा म्हणून मागील महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये दिल्ली सरकारनं ‘स्विच दिल्ली अभियान’ सुरु केलं आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार आणि प्रचार सुरु केला आहे.

यात दिल्ली सरकारचे परिवहन मंत्री कैशाल गहलोत सांगतात,

तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केलीत तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी २२ हजार रुपयांची बचत करु शकता. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी २० हजार रुपयांची बचत करु शकता. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल.

त्यामुळे भिडूंनों, आम्ही काय कुठलं नाव सांगणार नाही की याच कंपनीची घ्या किंवा त्याचं कंपनीची घ्या. पण इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करायला काय हरकत आहे. हो ना…

हे हि वाच भिडू

1 Comment
  1. VINAYAK Kandelkar says

    Electric vehicle mule je battery pollution honar aahe tya sathi ky plan kelay govt ne??

Leave A Reply

Your email address will not be published.