राज कपूरची बोलणी ऐकूनही शम्मी कपूर पान मसाल्याच्या ॲडमध्ये काम करून खुश होता

एकाच कालखंडात रुपेरी पडद्यावर कार्यरत असताना दोन कलावंत एकत्र काम करू शकत नाही अशी अनेक उदाहरणे आहेत नायक नायकांची आहेत तसेच दोन नायिकांची देखील आहेत. शम्मी कपूर आणि अशोक कुमार हे आयुष्यात कधीच एकत्र एका सिनेमात आले नाहीत. खरं तर शम्मी कपूर अशोक कुमारचा प्रचंड मोठा फॅन होता. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की ‘अशोक कुमार चे चाळीस च्या दशकातील सिनेमे त्याने अनेक वेळा पाहिले होते. अछुत कन्या, बंधन हे अशोक कुमार चे सिनेमे त्यांच्या आवडीचे होते. ‘किस्मत’ हा अशोक कुमारचा चित्रपट तर शम्मी कपूरने अक्षरशः पारायण केल्यासारखा पाहिला होता.

पुढे अनेक वर्षांनी याच सिनेमाचा रिमेक जेव्हा आला ‘बॉयफ्रेंड’ या नावाने त्यात शम्मी ने नायकाची भूमिका केली होती. शम्मी कपूरने या मुलाखतीत पुढे असे सांगितले की ‘ज्यावेळी माझा स्टारडम वाढला होता आणि माझ्या इशाऱ्यावर बॉलीवूड चालत होतं त्यावेळी सुद्धा मला अशोक कुमार सोबत काम करण्याची संधी मिळाली नाही.

हे मी माझं खूप दुर्दैव समजतो.’ दादा मुनी सारखा अभिनेता शतकातून एकदाच निर्माण होतो.

सत्तरच्या दशकामध्ये शम्मी कपूर चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करू लागला. त्यावेळी सुद्धा त्याला खूप अपेक्षा होती की आपल्याला कधीतरी अशोक कुमार सोबत काम करता येईल पण इथे सुद्धा काही कारणांनी योग काही जुळून आलाच नाही.
१९८२ साली अनपेक्षित पणे एका जाहिरातीत या दोघांनी एकत्र काम केले. ‘पान पराग पान मसाला ‘ या जाहिरातीत ज्या वेळेला आपल्याला अशोक कुमार सोबत शूट करायचे आहे असे शंभर कपूरला कळाले त्यावेळी तो टुमकन उडी मारून ‘या s s हू’ असे ओरडला! कारण वर्षानुवर्षाची त्याची ‘तमन्ना’ आता पूर्ण होणार होती.

ॲड एजन्सीला त्याने सांगितले ,”मला या जाहिरातीचा एक पैसा ही नको! मला अशोक कुमार सोबत काम करता येते आहे ही माझ्यासाठी अमूल्य अशी संधी आहे!”

अशोक कुमार आणि शम्मी कपूर यांची ही जाहिरात त्यावेळी दूरदर्शनवर प्रचंड गाजली. ‘पान पराग पान मसाला’ ही जाहिरात त्याकाळी सर्वांच्या तोंडी होती. या जाहिरातीत जलाल आगा देखील होता. संपूर्ण देश विदेशात या जाहिरातीने एकच धूम मचवली होती. पण याच जाहिरातीमुळे शम्मी कपूरला त्याचे मोठे बंधू राज कपूरचा मोठा ओरडा ऐकून घ्यावा लागला होता. तो किस्सा असा आहे!

१९८२ साली Hongcong मध्ये कपूर फॅमिलीचा मोठा सत्कार तिकडे होणार होता.

त्यामुळे संपूर्ण कपूर फॅमिली हॉंगकॉंग ला रवाना झाली होती. कार्यक्रम उत्तम झाला. ज्या वेळी हे लोक परतत होते; त्यावेळी हॉंगकॉंग एअरपोर्टवर भरपूर भारतीय लोक होते. त्यांनी शम्मी कपूरला पाहताच ‘पान पराग पान पराग’ असे ओरडणे सुरू केले. शम्मी कपूरला देखील आश्चर्य वाटले.

पण खरी गंमत पुढेच आहे. प्रेक्षकांचे असे ओरडणे ऐकून राज कपूरला अतिशय वाईट वाटले. रागही आला. चिडून त्याने शम्मी कपूरला बाजूला घेतले आणि त्याला झाप झाप झापले! राजकपूर शम्मी कपूरला म्हणाले,” तुला लाज कशी वाटली नाही हि जाहिरात करताना? कुठे गेला तुझा जंगली? कुठे गेला तुझा तिसरी मंजिल? कुठे गेला तुझा प्रिन्स? आणि कुठे गेला तुझा दिल तेरा दिवाना? लोक सगळे सिनेमे विसरले. ठार विसरले.

आता तुझी ओळख आहे फक्त पान पराग म्हणून राहिली आहे.

एक अभिनेता म्हणून तुझी ओळख पूर्ण पुसून गेली आहे. हे काय करून ठेवले आहेस? तू हि जाहिरात करण्यापूर्वी तू थोडा देखील विचार केला नाहीस का?” राज कपूर संतापून शम्मी कपूरला झापत होता. शम्मी कपूर शांतपणे ऐकून घेत होता. मोठा भाऊ वडिलांच्या ठिकाणी होता. त्याची कळकळ त्याला समजत होती. पण राज कपूर काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

या मुलाखतीत शम्मी कपूर पुढे सांगिलते ,” आता मी राज कपूरला कसे समजावून सांगू की दादामुनी सोबत काही सेकंदाची जाहिरात करायला मिळते हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता! तो मी कसा गमावणार?” खैर नंतर प्रकरण शांत झाले. शम्मी कपूरची अभिनेता म्हणून असलेली ओळख काही पुसली गेली नाही.

पण पान परागच्या जाहिरातीने जगभरातून शम्मी कपूरला कौतुकाची थाप मिळाली जरी असली तरी मोठ्या भावाकडून म्हणजे राज कपूर कडून त्याला चांगलाच ओरडा खायला मिळाला होता!

भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.