अशा पद्धतीने काढू शकता दारू पिण्याचे लायसन्स..

दारू प्यायला लायसन्स लागतं वे? हे काय नवीन? 

भिडूंनो यात नवीन काहीच नाही. सगळं जूनं आहे. आपल्याला फक्त आत्ता माहित झालं असेल. झालय अस की लॉकडाऊन नंतर सगळ्यात अजेंड्यावर राहिलेला विषय दारू आहे. पहिल्या आणि दूसऱ्या लॉकडाऊनमध्ये दारू पुर्णपणे बंद होती. त्यामुळे लोकांकडे दोनच पर्याय शिल्लक होते.

एकतर १०० रुपयांचे क्वॉटर ब्लॅकमध्ये ५०० रुपयात घ्यायची नाहीतर सॅनिटायझर प्यायचं. म्हणजे सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असतं या भाबड्या आशेपोटी काहीजणांनी आपला जीव पणाला लावला. लॉकडाऊन एक व दोनच्या काळात दारू मिळत नाही म्हणून येड लागण्यापासून ते मरणाऱ्यापर्यन्तची आकडेवारी आहे.

पण खरा राडा सुरू झाला तो लॉकडाऊन तीन मध्ये.. 

दारूची दूकाने सुरू करण्यात आली. लोकांनी ह्या भल्यामोठ्या रांगा लावल्या. टिका करणाऱ्यांनी टिका केली. कौतुक करणाऱ्यांनी कौतुक केलं. नोटबंदीच्या काळात कस दिवसाला दहा दहा नव्या सुचना येत होत्या. त्याचप्रमाणे सुचनांचा काळ सुरू झाला. रोज नवी सुचना. तळीरामांना या गोष्टीचा सामना करावा लागला.

तर आत्ता काल एक सुचना आली. 

दारू घरपोच मिळणार. दारूची होम डिलिव्हरी शक्य. आत्ता या गोष्टी म्हणजे पुण्या-मुंबईच्या नागरिकांच फुकटचं लाड. आपल्या गावाकडं कोण देणार आहे होम डिलिव्हरी. विचार करा इतर वेळी एक रुपाया कमी असला तरी अड्यावर जो मालक आपल्याला उभा करत नाही तो मालक काय शेट ही आहे तुमची टॅगोपंचची ऑर्डर म्हणून घरी येईल का?

असो, तर आपल्या मोदी साहेबांच्या कालच्या भाषणासारखं मी तुम्हाला फिरवून फिरवून मुद्यावर नेवून सोडतो. 

दारू प्यायचं लायसन्स मिळतं का..?

हो तर असं लायसन्स असतं. एक दिवसासाठी, एक वर्षासाठी आणि लाईफटाईम अशा तिन प्रकारात अस लायसन्स मिळत.

हे लायसन्स गरजेचं असत का ?

हे बघा आत्ता तुमच्याकडं दारूची बाटली आहे. तुम्हाला पोलीस किंवा एक्साईज वाल्यांनी अडवलं. तर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतात. कारण काय तर तुमच्याकडे लायसन्स नाही. अस का? तर समजा तुम्ही दारू चोरून विकणारे असला तर? हे बाटली माझी असून मी मलाच दारू प्यायची आहे अशा परस्थितीवर गोष्टी सिद्ध करायच्या असल्या तर असं लायसन्स आवश्यक ठरतं.

हे लायसन्स आत्ता आवश्यक केल आहे का ?

होय म्हणून तर एवढी लांबड लावल्या नं. कालच राज्यमंत्री शंभूराजे देसाई टिव्हीवर सांगत होते. हे लायसन्स बंधनकारक केलय. तुमच्याकडे दारू प्यायचं लायसन्स असलं तरच तुम्ही ऑनलाईन घरपोच दारू मिळवू शकता असं ते म्हणालेत.

आत्ता दारू प्यायचं लायसन्स कसं काढायचं. 

त्यासाठीची ही वेबसाईट. यावर क्लिक करा तुम्हाला लिस्ट ऑफ सर्व्हिसेस मधले प्रकार दिसून जातील.

https://exciseservices.mahaonline.gov.in/Home/Listofservices

इथं पहिल्यांदा आपली डिटेल माहिती भरून लॉगईन करायचं. त्यानंतर प्रत्येक प्रकारच्या अर्जासाठी वेगवेगळे आवश्यक ती माहिती इथे भरावी लागते. म्हणजे कसं तर आपला फोटो, आधार क्रमांक, घरचा पत्ता इत्यादी.

(माहिती भराताना खात्री बाळगा. ही माहीती कुठेही लिक होत नाही. त्यामुळे तुम्ही दारूडे आहात हे तुम्ही आणि शासन यांच्यामध्येच गुप्त राहतं. तिसरा कोणी हा फॉर्म घेवून बघा बघा तुमचा पोरगा दारू पितो म्हणून तुमच्या घरी येणार नाही) 

तर यानुसार फॉरेन लिकरसाठी तिन प्रकारचे लायसन्स तुम्हाला काढता येतात. एकाच दिवसासाठी लायसन्स पाहीजे असेल तर तीन रुपये. एका वर्षासाठी पाहिजे असेल तर शंभर रुपये आणि लाईफटाईम हवे असल्यास एक हजार रुपये लागतात. हे पैसे ऑनलाईन भरायचे असतात.

ज्या लायसन्ससाठी जे कागदपत्र आवश्यक आहेत ते भरून तुम्ही लायसन्स मिळवू शकता.

यासोबत तुमचा युजर आयडी निघतो. त्यानंतर तुमच्या लायसन्सचं काम कुठवर आले हे स्टेटस मध्ये तुम्हाला कळू शकतं. साधारण सात दिवसाच्या आत परवाना मिळतो असं अधिकारी सांगतात.

तर ड्रिंकर भिडू हो जा शुरू…

परत एकदा लिंक देतोय, क्लिक करा आणि शासनमान्यतेत दारू प्या..!

 

  • मद्यपान आरोग्यास अपायकारक आहे. 
Leave A Reply

Your email address will not be published.