आपल्या ठुमक्यानं येडं लावणाऱ्या ‘इंडियन शकिरा’नं डान्सपायी मार सुद्धा खाल्ला होता

कोलंबियाची फेमस सिंगर शकिरा जिचे जगभरात लाखो चाहते आहे. तिचं ‘वका वका’ गाणं म्हणा किंवा बाकीची कुठली गाणी ज्यांचा अर्थ जरी लागला नाही तरी शकीराच्या आवाजानेच अर्धेजण तिचे फॅन होतात. तिची गाणी ट्रान्सलेट करून नाहीतर म्युझिक बनवून वाजवणारी बरीच मंडळी आहेत. पण तिच्या गाण्यावर देशी ठुमका लावून सगळ्यांना येडं लावणारी एकच ती म्हणजे ‘इंडियन शकिरा’.  रातोरात स्टार झालेल्या लोकांच्या यादीत या इंडियन शकीराचं नाव घेतलच पाहिजे. 

ही इंडियन शकिरा म्हणजे गौरी नागौरी. जिने अख्ख्या भारतात खासकरून राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि युपीमध्ये राडा करून ठेवलाय. म्हणजे हरियाणाची फेमस डान्सर सपना चौधरीचं मार्केटसुद्धा या इंडियन शकिरानं खाल्लयं. आपला जबरदस्त परफॉर्मन्स आणि बोल्ड मूव्हने तिने लोकांच्या मनावर राज्य केलंय. 

२४ वर्षाच्या या गौरी नागौरीच खरं नाव तस्लिमा बानो. जी मूळची राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील मेरता शहरातली आहे. पण तिच्या चाहत्यांमध्ये तर ती इंडियन शकीरा नावानेच फेमस आहे. यामागचं कारण म्हणेज ती कोलंबियाची इंटरनॅशनल सिंगर शकीरा हिला आपला आदर्श मानते. गौरी बऱ्याचदा तिच्याच गाण्यांवर ठुमके लावताना पाहायला मिळते. 

एका मुलाखतीदरम्यान गौरीने  सांगितले होते की, ती लहान असताना तिने टीव्हीवर इंटरनॅशनल सिंगर आणि डान्सर शकीराचा डान्स पाहिला होता. तेव्हापासून ती तिची फॅन झाली आहे. त्यादिवशी गौरीने ठरवले होते की एक दिवस ती सुद्धा शकीरा सारखे बनेल. मग काय गौरी तिच्या डान्स स्टेप्समध्ये शकीराला फॉलो करायला लागली. पण आपला देशी बीट सांभाळून… 

गौरीचे वडील नूर मोहम्मद राजस्थान पीडब्ल्यूडीमध्ये कर्मचारी होते, ज्यांचं २०१० मध्ये निधन झालं. गौरी सध्या आई बेगम आणि बहिणींसोबत राहते. ती ९ व्या वर्षांपासून डान्स करतेय.  गौरीने सांगितले की, तिला एका कार्यक्रमात डान्स करताना पाहून आई आणि वडिलांना इतका राग आला की त्यांनी तिला जवळपास १२ दिवस खोलीत कोंडून ठेवलं होत. तरीही ती ऐकत नव्हती म्हणून तिला बेदम मारहाण सुद्धा केली होती.

पण तरीसुद्धा तिने डान्सलाच आपलं करियर करायचं ठरवलं. तिने बरेच स्टेज परफॉर्मन्स दिले आणि हळू- हळू ती फेमस झाली. त्यातूनच तिने युट्युबवर डान्सचे विडिओ बनवायला लागली ज्याला चांगलीच पसंती मिळायला लागली. २०१८ सालचं तिचं ‘ले फोटू ले’ हे गाणं तर सुपरहिट झालं, ज्यांनंतर अनेक मोठ्या म्युझिक कंपोजर्सने तिला आपल्या गाण्यात घेतलं.

तिच्या बोल्ड मुव्ह्ज ह्या दिलफेक तर असतात, पण यामुळे तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतो. गौरीने ट्रोल करणाऱ्यांना बऱ्याचदा चांगलचं ऐकवलं सुद्धा आहे. ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडत नाहीत. त्यांनी माझे विडिओ बघू सुद्धा नये, असंही ती स्पष्टपणे बोलते.

गौरीच्या डान्सचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. तिच्या एका- एका व्हिडिओला लाखो लाखो व्ह्यूज असतात. गेल्या वर्षीच्या तिच्या ‘घाघरो’ या गाण्याला तर एका दिवसात १६ मिलियन व्ह्यूज मिळालेत. गौरी नागोरी सध्या हरियाणवी फिल्म इंडस्ट्रीजचे प्रसिद्ध अभिनेता, रॅपर, गायक, निर्माता आणि डान्सर सनी चौधरी यांच्या सहकार्याने परफॉर्म करते. त्यांची सुपरहिट डान्स गाणी एकापाठोपाठ हिट होत आहेत. 

 हे ही वाच भिडू :

  

Leave A Reply

Your email address will not be published.