‘मधुबालाचा मुखवटा घालून एक पुरुष डान्सर नाचला’ ही किमया होती एका मराठी माणसाची

मुघल ए आझम ” हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अक्षरशः खळबळ माजविणारा, अनेक विक्रम करणारा, अनेक दंतकथा आणि घटनांनी भरलेला ,खूप गुणी कलावंतांना एकत्र आणणारा, प्रचंड खर्चाचा असा खरंच ” या सम हा ” असा चित्रपट होता.

या चित्रपटाचे निर्माते शापूरजी पालनजी आणि दिग्दर्शक के.असिफ होते. चित्रपटाचे चित्रीकरण इतके खर्चिक होते की निर्मात्याचे दिवाळे वाजते की काय अशी स्थिती अनेकदा निर्माण होई. या चित्रपटातील युद्धाच्या चित्रीकरणासाठी २००० ऊंट, ४०० घोडे आणि ८००० सैनिकांचा वापर केला गेला होता. जोधाबाईंच्या महालातील कृष्णजन्म सोहोळ्यासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली. सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच मुळी, सुमारे १ तासाची होती.

“प्यार किया तो डरना क्या ” या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शिशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता.

या चित्रपटाचा शुभारंभ ( प्रिमियर ) ५ ऑगष्ट १९६० रोजी मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपटगृहात झाला. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता. येत्या ५ ऑगस्ट २०२० ला या चित्रपटाला चक्क ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

या चित्रपटाच्या यशामध्ये एका पुणेकराचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हा किस्सादेखील या चित्रपटासारखाच आगळावेगळा आहे.

यातील नायिकेचे काम करणारी मधुबाला ही उत्तम नर्तिका होती पण या नृत्यामधील अनेक पदन्यास तिला जमत नव्हते. ” प्यार किया तो डरना क्या” या गीताच्या सुरुवातीलाच असंख्य गिरक्या आहेत. तेथे दिग्दर्शक के.असिफ यांना मधुबालाकडून पाहिजे तसा परिणाम मिळत नव्हता.

शेवटी तेथे लक्ष्मी नारायण या पुरुष नर्तकाला मधुबालाच्या वेषभूषेसह नृत्यासाठी तयार केले.

त्याला पूर्ण मेकअप करूनही, वेगाने गिरक्या घेतांना लॉंगशॉटमध्ये दिसणारा त्याचा चेहरा असिफ यांना मान्य नव्हता. या चित्रपटाचे अनेक भव्य आणि दिमाखदार सेट्स पुण्याच्या निष्णात शिल्पकार श्री. बी.आर.उर्फ अप्पासाहेब खेडकर यांनी बनविले होते.

कला दिग्दर्शक सय्यद काद्री यांनी खेडकर यांना पाचारण केले. हे खेडकर अत्यंत प्रतिभावंत शिल्पकार होते. कुठलेही रीतसर शिक्षण न घेता त्यांनी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे ९ फुटपासून ते १९ फुटांपर्यंत ३४ अश्वारूढ पुतळे बनविले होते. बाजीराव पेशवे, राणी चैनम्मा, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गगनगिरी महाराज अशा अनेक दिग्गजांचे पुतळे त्यांनी बनविले.

या खेडकरांनी यांनी एक वेगळीच शक्कल लढविली. त्यांनी केवळ फोटोंवरून मधुबालाच्या चेहेऱ्याचा एक हुबेहूब पुतळा तयार केला.

तरीही अचूकतेसाठी प्रत्यक्ष मधुबालाने समोर येऊन बसणे आवश्यक होते. त्यासाठी मधुबालातयार झाली. तिला तिचाच हुबेहूब पुतळा पाहून आनंद झाला. नंतर हा पुतळा घेऊन खेडकर त्यांच्या घराजवळच असलेल्या एका रबरी फुग्यांचा कारखान्यात गेले. तेथे विनंती करून त्यांनी या पुतळ्यावर रबराचा जाडसर द्रव ओतून एक सुंदर मुखवटा बनविला.

६० वर्षांपूर्वी आपल्याकडे फारसे तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना, पुण्यातील या महान शिल्पकाराने भारतातील हा पहिलावहिला मुखवटा बनविला !

हा मुखवटा घालून आणि पूर्ण वेशभूषा, मेकअपसह जेव्हा पुरुष नर्तक लक्ष्मी नारायण सज्ज झाला तेव्हा त्याला पाहून दिग्दर्शक के.असिफ खुश झाले. ते खेडेकरांना म्हणाले

” अरे खेडकर, क्या अच्छा काम किया है “!

या नंतर संपूर्ण नृत्याचे सर्व टेक ओके होत गेले. या गाण्याच्या सुरुवातीच्या गिरक्या किती उत्तम वाटतात हे कळण्यासाठी सोबतची या चित्रपटाची क्लिप जरूर पाहा.

 

त्यानंतर खेडकरांनी असाच दिलीपकुमारचा एक मुखवटा बनविला. तो मुखवटा घातलेल्या एका कलावंताला खुद्द के.असिफ यांनी पाहिल्यावर ते म्हणाले,

अरे आज दिलीपसाब यहाँ कैसे ? उनकी आज कोई शूटिंग नाही है.

जेव्हा त्यांना कळले की खेडकरांनी बनविलेला हा मुखवटा आहे. त्यावर त्यांनी खेडकरांची मुक्तकंठाने स्तुती केली.

मुघल ए आझम या चित्रपटाला ५ ऑगस्ट २०२० ला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट आणि ” प्यार किया तो डरना क्या ” हे त्यातील गीत अजरामर झाले. या अभूतपूर्व यशामध्ये श्री. अप्पासाहेब खेडकरांच्या या आगळ्यावेगळ्या आणि खूप महत्वाच्या योगदानाबद्दल त्यांना अभिवादन करूया !

(संदर्भ — INDIA TV. व्हिडीयो क्लिप — युट्युब. खेडकरांचे छायाचित्र — PUNE MIRROR …. अन्य छायाचित्रे — गुगल )

 • मकरंद करंदीकर.
  makarandsk@gmail.com

हे ही वाच भिडू.

2 Comments
 1. अनूप says

  “नवरी मिळे नवऱ्याला” चित्रपटात अशोक सराफ ह्यांच्या सोबत असलेली अभिनेत्री कोण आहे? निशाणा तुला दिसला ना.. ह्या गाण्यात ह्या अभिनेत्रीने कमाल केली आहे. दुर्दैवाने ह्यांच्याबद्दल कुठेही माहिती उपलब्ध नाही. (बहुदा, निलिमा नाव असावे.)
  एक लेख ह्यांंच्यावर यायला हवा.

 2. Dinesh D. Kamat . says

  सर्वच उत्तम प्रकारे बनवल आहे यात शंकाच नाही .विविध माहिती त्यांनी कुठून मिळविली ?असा प्रश्न हे वाचताना मला सतावत होता .कारण लेखक व त्यांची पार्श्वभूमी मला अजिबात ठावूक नव्हती.. नासिकला असताना मुरलीधर धारणकर या नावाचे एक टेलर माझे दाट परिचयाचे होते.पण ती घटना १९५० सालातली ! या धारणकरांचा त्याचेशी काही नाते संबंध असेल काय ते माहीत नाही. यातील सर्व फोटो अत्यंत उत्तम व ठसठशीत आले आहेत.कॅमेराची लेन्स जास्त मेगापिक्सेल वाली असावी.शेवटी धरणकर ,खेडकर व नृत्यकल्काकार या सर्वांना धन्यवाद देवून हे लिखाण संपवितो!!

Leave A Reply

Your email address will not be published.