कमाई शून्य असली तरी इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल केलाच पाहिजे कारण…

त्यादिवशी आईला म्हटलं की, “अगं इन्कमटॅक्स रिटर्न्स भरायची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे जर काही बाकी असेल तर लगेच भरून टाकायला हवं.” यावर आई काहीसं हसत म्हणाली, “मला कशाला हे सांगतेस. मला थोडीच आयटीआर भरायचा आहे.” आईचा झालेला हा गैरसमज पाहून मी तिला समोर बसवून समजवायला लागले की, फक्त गडगंज कमावणारेच आयटीआर भारतात असं नाहीये. तुझ्या सारख्या गृहिणी किंवा घरतल्या घरात कमवणाऱ्या बायकांनी सुद्धा आयटीआर भरायला हवा. ज्याला झिरो आयटीआर असं म्हणतात. म्हणजे शून्य कमाई असली तरी तू झिरो आयटीआर भरायला हवास.” त्यावर तिने माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं.

तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आई सारखं इतर गृहिणींच्या मनात सुद्धा हा गैरसमज असेलच ना? म्हणूनच झिरो आयटीआर काय असतं? ते कोणी आणि का भरायचं? याबद्दल थोडी चर्चा करूया.

 

मुळात ज्या बायका घरात पिको फॉल, शिवणकाम अशी छोटी छोटी कामं करून स्वतःच्या खर्चापुरतं कमावतात किंवा अगदी गृहिणी ज्या घर चालवता चालवता चार पैसे गाठीशी ठेवतात त्यांनी झिरो आयटीआर भरला तर त्यांच्याच फायद्याचं आहे.

थोडक्यात ज्यांची शून्य कमाई असेल किंवा वार्षिक कमाई अडीच लाखाहून कमी असेल अशा सगळ्यांनी झिरो आयटीआर भरायला हवा. पण अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना इन्कमटॅक्स भरावा लागत नाही असं म्हणून सगळे याकडे दुर्लक्ष करतात. पण झिरो आयटीआर भरल्याने आर्थिक व्यवहार किंवा उत्पन्नाचा तपशील ठेवायला मदत होते.

सुरुवातीला झिरो आयटीआर म्हणजे काय ते पाहू

शून्य कमाई असणाऱ्या व्यक्तींना किंवा २.५० लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कर भरणं बंधनकारक नसतं. त्यांना कर माही असतं. पण जरी ती व्यक्ती आयटीआर फाईल करत असेल तर त्याला झिरो आयटीआर असं म्हणतात. झिरो आयटीआरला नील आयटीआर सुद्धा बोलतात. झिरो आयटीआर म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा कर भरता असं नाही तर फक्त आयटीआर फाईल करून ठेवता आणि ते ऑन रेकॉर्ड राहतं.

झिरो आयटीआर भरणं बंधनकारक नसलं तरी भविष्यात त्याचा फायदा होतो. 

त्यातला पहिला फायदा म्हणजे कर्ज घेणं सोप्प होऊन जातं. जर तुम्ही गृहिणी असून नियमित झिरो आयटीआर फाईल करत आहात आणि तुम्हाला घरातल्या घरात एखादा व्यवसाय चालू करायचा असेल, त्यासाठी जर तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार असेल तर ते तुम्ही सहज घेऊ शकता. 

व्हिजा मिळण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. शक्यतो व्हिसासाठी अर्ज करताना आयटीआर ची कागदपत्र लागतातच असं नाही पण असतील तर व्हिजा मिळण्याची प्रोसेस थोडी सोप्पी होऊन जाते. व्हिजासाठी ३ वर्षांचे आयटीआर भरल्याचे कागदपत्र लागतात. जेणेकरून व्हिजाचा अर्जदार सगळ्या कायद्यांचं पालन करतो. त्याचबरोबर जर तुम्हाला बाहेरगावी नोकरीची संधी मिळाली आणि तुम्ही पाच वर्ष झिरो आयटीआर भरताय तर त्या प्रक्रियेसाठी सुद्धा झिरो आयटीआरची कागदपत्र फायद्याची ठरतात.

झिरो आयटीआर भरण्याचा अजून एक फायदा म्हणजे एखादी स्वतःच्या नावावर असलेली जामीन किंवा घर तुम्ही सहज विकू शकता. 

त्याचबरोबर जर तुम्हाला स्टॉक मार्केट किंवा म्यूचुअल फंड्समध्ये इन्वेस्टमेंट करायची असेल त्यासठी सुद्धा झिरो आयटीआरचे कागदपत्र उपयोगी येतात. तसच तुमच्या बँक ठेवींवर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नावर मिळालेल्या व्याजावर कापलेला टीडीएस परत मिळण्यासाठी सुद्धा याची मदत होते.  एवढंच नाही तर काही जणांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती हवी असते तेव्हा हे झिरो आयटीआर कागदपत्र कामी येतात.

थोडक्यात हल्ली बाई पण भारी देवा चित्रपटाची हवा झाल्यापासून बायकांनी अमुक करायला हवं बायकांनी तमुक करायला हवं असे बरेच सल्ले बायकांना दिले जातायत आणि अर्ध्याधिक सल्ले तर गृहिणींना दिले जातायत. आता त्यापैकीच हा एक सल्ला असेल की, सगळं करा. नाचा फिरा खेळा पण झिरो आयटीआर भरा. तुमच्याकडे ३१ जुलै पर्यंतचाच वेळ आहे.

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.