कॅडबऱ्या विकणाऱ्या फाईव्ह स्टारनं स्कीम आणल्या, निवांत बसा आणि पैशे कमवा

तुम्हाला रमेश आणि सुरेश आठवतात का? हा तेच तेच वडलांच्या पँटची पार हाफचड्डी करून आणणारे. ‘मास्टरजी, पिताजी की पतलून एक बिलांग छोटी कर दो’ म्हणत पोरं कॅडबरी खाण्यात इतकी गुंग झाली, की पतलूनची खरंच हाफ पँट झाली.

ती जाहिरात होती फाईव्ह स्टार कॅडबरीची. आणि हा फक्त तीच जाहिरात नाय, तर फाईव्ह स्टारनं लय हार्ड जाहिराती आणल्या आणि खपाखप कॅडबऱ्या विकल्या. लहानपणी घरचे एक एक रुपया द्यायचे, ते पेप्सिकोले खाण्यात खर्च झाले नाहीत; तर पाच रुपये साठायचे आणि मग ‘ओ मामा पाचवाली फाईव्ह स्टार द्या,’ असा आवाज बरण्यांमागून देता यायचा.

आता लहान पोरांना एक एक रुपया दिल्यावर ते काय ऐकत नसतात. त्यांना डायरेक्ट मोठी नोट द्यावी लागत्या किंवा मग किंडर जॉय. त्यात पाव्हण्यांची आगाऊ पोरं थोडी वयात आलेली असतील, तर ती थेट क्रिप्टोकरन्सी मागायला पण पुढं मागं बघायची नाय. क्रिप्टोकरन्सीदेणं काय सोपंय होय भिडू?

बिटकॉईन, डॉजेकॉईन हे तर पगारापेक्षा जास्त किंमतीला गेलेत. आता ते कमवायला पैशे घालवा आणि किरकोळीत द्या हे काय परवडणारं ए होय? पण आता तसलं काय झालंच तर लोड घेऊ नका. कारण, मार्केटमध्ये नवा कॉईन आलाय आणि तो मिळणार ए काहीही न केल्यावर.

येड्यात नाय काढते भिडू, सगळं सांगतो. मेन विषय असाय की कॅडबऱ्या विकणाऱ्या फाईव्ह स्टारनं नवी करन्सी आणल्या ज्याचं नाव ए, नथिंग कॉईन. त्यात फाईव्ह स्टारनं या कॉईनची बँक काढल्यानं आणखीनच कालवा सुरू झाला.

फाईव्ह स्टारनं एक कॅम्पेन काढलेलं, डू नथिंग नावाचं. देशातल्या पोरांनी काय त्याला लय प्रतिसाद दिला नाही. लोकं म्हणाली काहीच नाय केलं, तर पैशे कसं मिळवणार. मग कंपनीतल्या कार्यकर्त्यांचे बल्ब पेटले आणि त्यांनी खुंखारवाली आयडिया आणल्या. ती म्हणजे फाईव्ह स्टारची क्रिप्टोकरन्सी – जिचं नाव ‘डू नथिंग.’

हीच ती काहीच न करता कॉईन कमवता येण्याची स्कीम

कंपनीच्या वेब साईटवर जाऊन डिटेल्स बिटेल्स भरले की तुमच्या मोबाईलवर कॉईन यायला सुरुवात होणार. पण तुम्ही मोबाईल वापरला की कॉईन येणं बंद होणार. मग तुम्ही गॅलरीतले फोटो बघा किंवा जिच्यासाठी कॅडबऱ्या घेतल्या तिला मेसेज करा, काहीतरी करताय म्हणल्यावर कॉईन येणं बंद. निवांत राहिलं की कॉईन येणार हे फिक्स.

त्यात या कॉईनची बँक उभी केलीये. तेही मुंबईत नरिमन पॉईंटला आणि डायरेक्ट एसबीआयच्या हेडऑफिसमोर. चुकून लंचब्रेकच्या वेळात एसबीआयवाल्यांना सापडलात तर या बँकमध्ये चक्कर टाकायला बरं.

या बँकेत काय होतं? तर इकडं जाऊन फाईव्ह स्टार विकत घ्यायची, कोड स्कॅन करायचा आणि मग कॉईन यायला सुरुवात आणि हा मोबाईल वापरला की कॉईन येणं थांबणार ही स्कीम इकडं पण लागू होत असत्या.

या कॉईनचं करायचं काय?

हे कॉईन तुम्ही चहाच्या टपरीवर, भाजीवाल्याला किंवा घराच्या हफ्त्यात वळवू शकत नाय. कारण हा कॉईन म्हणजे काय खरे पैशे नाहीत. ते एक आभासी चलन आहे, जे जाहिरातीसाठी बनवलंय. आता तुम्हाला असं वाटत असेल की या कॉईनचा काहीच खप नाही.

आता तसं असतं, तर आम्ही एवढं पुराण सांगितलं असतं का भिडू?

हे कॉईन वापरून तुम्ही जिओमार्ट व्हाऊचर विकत घेऊ शकता. म्हणजे कसं तिकडून खरेदी करता येऊ शकतेय. वर हे कॉईन फाईव्ह स्टार डिजिटल मॉलमध्ये पण चालणार आहेत, असं कंपनी म्हणतेय. त्यामुळं उगा निवांत वेळात कॉईन मिळवले तर निदान काही कॅडबऱ्यांपुरते पैशे वाचू शकतात की.

देशात सध्या क्रिप्टोकरन्सीचं मार्केट सनाट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं फाईव्ह स्टार वाल्यांना दणकट सपोर्ट मिळाला, तर ते आणखीन कायतर वाढीव करू शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.