कधीकाळी तो मुंबईचा गॅंगस्टर होता, आज तो प्रसिद्ध धावपटू आहे…

आपल्याकडं सामाजिक चर्चा करत असताना सिनेमाचा जनसामान्यांवर होणारा परिणाम असा एक हॉट टॉपिक असतोय. पिक्चर पाहून लोकं कधी बिघडतात हे पटवून सांगितलं जातय. दूसरीकडे तमाशाने माणूस बिघडत नाही आणि किर्तनाने माणूस सुधारत नाही अस ठामपणे सांगितलं जातय.

आत्ता यातलं किती खरं आणि किती खोटं हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा विषय. पण ही गोष्ट अशीच आहे. पिक्चर बघुन भिकू झालेल्या एका गॅंगस्टरची…

सत्या पिक्चरमधला भिकू आजच्या चड्डीतल्या पोराला देखील माहिती असावा. मुंबईचा किंग कोण म्हणणारा भिकू प्रेमात पाडणारा होता. सिनेमा म्हणून मनोज वाजपेयीने केलेला रोल जबरा होता. पण मुंबईच्या एका शुटरने “भिकू” हे पात्र मनावर घेतलं…

तो काळ मुंबईत पैसा हा फक्त गॅंगस्टर मिळवू शकतो हे सांगणारा होता. याच काळात राहूल जाधव हा मुलगा मोठा होत गेला. दहावी झाली आणि सर्वसामान्य चाळीत राहणाऱ्या या पोरानं मनात पक्क केलं की हातात बंदुक घेतल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत.

राहूल जाधव डोंबवलीत रहायचा. म्हटलं तर तर मुंबईच्या आऊटसाईडचा भाग. पण इथेही गुन्हेगारी होती. मुंबईत गुन्हा करून डोंबवली लपून राहण्यासाठी चांगली जागा होती. राहूल इथून पुढे आला.

तो अगदी कमी वयात गुन्हेगारीकडे वळला. याच काळात रिलीज झाला राम गोपाल वर्माचा सत्या. यातला भिकू म्हात्रे म्हणजे जादू होता जादू. अगदी मनाला येईल तस वागणारा. मुंबई कवेत घेण्याचं स्वप्न बघणारा आणि खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे “मराठी माणूस”. राहूल या भिकूच्या प्रेमात पडला. गुन्हेगारी क्षेत्रात जम बसू लागला…

आणि एकदिवस गुन्हेगारी क्षेत्रात राहूलला टोपन नाव पडलं “भिकू….”

राहूल अर्थात भिकू आत्ता मोठमोठ्या टोळ्यांसाठी शूटरच काम करू लागला. एकामागून एक गुन्हे करु लागला. मुंबईचा किंग बनायचं त्याचं स्वप्न उराशी घेवून तो कामकाज करत होता. बऱ्याच मोठ्या गुन्हेगारांसाठी राहूल अर्थात भिकू हा शुटर होता. सोबतच खंडणी गोळा करण्याचं काम ओघाने त्याच्याकडे आलच होतं.

सत्या मधला भिकू आणि राहूलचा झालेला भिकू यात काहीही फरक नव्हता. अगदी दिसण्यापासून ते असण्यापर्यन्त सर्व काही त्याच्याकडे होते.

पण झालं अस की सिनेमासारखं सगळं सोप्प नसतं. राहूलला हे कळालं तेव्हा त्याला अटक झाली होती. एन्काऊंटर फेम विजय साळसकरांनी त्याला २००७ साली अटक केली. त्याला अटक झाली तेव्हा त्याच्यावर ११ वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे होते. त्यामध्ये चार गुन्हे हे खून करण्याचा प्रयत्न करणारे होते.

खंडणी, मारामारी, धमकी अशा गंभीर स्वरुपाचे खून त्याच्या नावावर होते. मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. सिनेमाप्रमाणे इथे लगेच मोक्ष मिळत नाही. त्याला अटक झाल्यानंतर चार वर्ष कारावासाची शिक्षा झाली. आर्थर रोड तुरूंग हे त्यांच दूसरं घर झालं.

चार वर्ष जेलमध्ये घालवल्यानंतर तो २०११ साली जेलमधून बाहेर पडला. पण त्याच्यावरील सर्व गुन्ह्यातून मुक्तता व्हायला २०१३ सालं उजाडलं. इथंवर आल्यानंतर तो भानावर आलेला. भिकू सारखं जगणं हे फक्त सिनेमात बर वाटतं. सिनेमा तीन तासात संपतो आयुष्य नाही हे समजून घ्यायला त्याला आपल्या आयुष्याची ४ वर्ष जेलमध्ये काढावी लागली.

त्यानंतर राहूल भानावर आला. २०१३ साली त्याने सर्व गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर जॉब सोडण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी गुणवत्ता निरिक्षक म्हणून त्याला काम मिळाले. या दरम्यानच्या काळात २०११ साली एका पत्रकाराची हत्या झाली.

या हत्येनंतर पोलीसांनी जुन्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली. पोलीसांची चौकशी सुरू झाली. कंपनीत त्याची पार्श्वभूमी समजली आणि आहे त्या नोकरीतून त्याला काढून टाकण्यात आलं. सुधरायचं म्हटलं तरी जग सुधरून देत नाही…!

राहूल डिप्रेशनमध्ये गेला…

समोर कोणताच मार्ग दिसत नव्हता. अशा वेळी माणसाला आसरा मिळतो तो दारूचा. बेरोजगार असणारा राहूल दारूच्या आहारी गेला. दिवसभर नैराश्यात राहू लागला. असा राहूल एकदिवस स्वत:ला संपवून घेणार हे घरातल्यांना समजायला वेळ लागला नाही. या वेळी घरातल्यांनी राहूलसाठी हक्काने व तितक्याचं अधिकाराने एक ठाम निर्णय घेतला.

तो म्हणजे पुण्याच्या मुक्तांगणचा…

पुण्याच्या व्यसनमुक्ती केंद्रात राहूलची रवानगी करण्यात आली.

मुक्तांगण मध्ये त्यांची दारू सुटली. मोकळ्या वेळात तो स्वत:चा विचार करु लागला. इथे हबीबा जेठा त्याला मार्गदर्शन करु लागले. ते म्हणाले एखादं ध्येय ठरवल्याशिवाय तूला यातून बाहेर येणं अशक्य आहे…

त्यावर राहूल म्हणाला, करणार काय..? मी नोकरी करू शकत नाही, मिळाली तर माझा भूतकाळ पाहून कोणी विश्वास ठेवत नाही.

यावर तू कोणती गोष्ट चांगली करू शकतो अस जेठा यांनी त्याला विचारलं. तेव्हा तो म्हणाला मी पळू शकतो. समाजापासून, पोलीसांपासून, गुंडापासून, दूसऱ्याला मारायला पण पळालोय, सर्वापासून मी आजवर पळतच आलोय. इतकं की आत्ता तुम्ही मला या व्यसनमुक्ती केंद्रातून सोडलं नाही तर मी इथूनपण पळून जाणार आहे…

त्यावर जेठा यांच उत्तर होतं मग पळ…

राहूलने शब्दश: पळायला सुरवात केली. सकाळ संध्याकाळ तो धावायचं प्रॅक्टिस करु लागला. यातच त्याला त्याचं उत्तर मिळालं. त्याने पुणे मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. पहिल्यांदा आयुष्यात त्याच्यासाठी कोणतर टाळ्या वाजवत होतं. एकामागून एक मॅरेथॉन तो जिंकू लागला. आत्ता राहूल चा भिकू कधीच संपलाय. आत्ता भाग मिल्खा भाग मधला राहूल त्याला आठवत असावा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.