रोहित शर्मा निर्णय विसरला, पण गांगुलीनं रिकी पॉंटिंगचा छापा काट्यामध्ये पोपट केला होता…

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजनं दणका उडवल्यानंतर भारताची न्यूझीलंडविरुद्ध दुसरी वनडे रंगलीये, पण त्याआधी एक किस्सा रंगला तो टॉसवेळी. भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकला, पण बॅटिंग करायची की बॉलिंग हेच त्याला सुचेना. त्याची अवस्था बघून मॅच रेफ्री आणि न्यूझीलंडचा कॅप्टन दोघानांही हसू आलं.

पण याआधी असाच एक किस्सा झाला होता, जेव्हा टॉसवेळी बादशहा ठरला होता, भारतीय कॅप्टन सौरव गांगुली.

ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम तेव्हा एकदम फुल फॉर्ममध्ये होती. रिकी पॉंटिंगने आपल्या कप्तानीखाली त्यांना वर्ल्डकप जिंकून दिला होता. हरण्याची त्यांची सवयच मोडली होती. त्यांच्या प्रत्येक कृतीत माज जाणवून यायचा,

रिकी पॉंटिंग तर या ऑस्ट्रेलियन गर्वाचे प्रतिक होता.

च्युईंगम चघळत चघळत खास शिवराळ भाषेतील स्लेजिंगने भल्या भल्या खेळाडूना परेशान करणे त्याची आवड होती. खिलाडूवृत्ती दाखवत बसण्यापेक्षा जिंकणे महत्वाचं हे त्याला ठाऊक होतं. त्यामुळेच कधी कोणाची भीडभाड ठेवायचा नाही. कधी कधी तर अंपायरलाच गंडा घालायचा. आपल्या या धूर्तवृत्तीचा त्याला खूप अभिमान होता.

एकदा मात्र त्याला शेरास सव्वा शेर मिळाला.

ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्क तेव्हा नवीन होता. त्याला रिकीनंतरचा ऑस्ट्रेलियाचा भावी कप्तान म्हणून ओळखल जायचं. रिकीने आपल्या भावी वारसदाराला खास सिक्रेट सांगताना हा किस्सा ऐकवला होता.

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मॅच होती. भारताचा कॅप्टन होता सौरव गांगुली.

पीच बघितल्यावर कळत होतं पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्याला जास्त चान्स होते. गांगुली आणि पॉंटिंग दोघानाही टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग निवडायची होती. सकाळची वेळ होती. भरपेट नाश्ता करून दोघेही कप्तान टॉससाठी आले. तिथे मॅच रेफ्री आणि कॉमेंटेटर त्यांची वाट बघत होते.

दोन्ही कप्टननी एकमेकाला हस्तांदोलन केले. रेफ्रींनी दोघांना नाणेफेकीचं कॉईन दाखवून हेड कोणते, टेल कोणते ते सांगितलं. रिकी पॉंटिंगने टॉस उडवला. गांगुलीला छापा की काटा सांगायचं होतं. कॉईन हवेत गेला आणि गांगुलीने कुजबुजत्या स्वरात हळूच पुटपूट केली.

“हेड टेल”

कोणालाच काही कळाल नाही. कॉईन तोपर्यंत गवतात विसावला होता. त्यावर काट्याची छाप वर आली होती. गांगुलीने आपण जिंकलो असल्याच्या अविर्भावात माईककडे बघून वक्तव्य केले,

“I WILL BAT FIRST”

खरं तर गांगुलीने छापा काटा दोन्ही निवडल्यामुळे हा टॉस फाउल गेला होता पण अगदी तिथे उभ्या असलेल्या कॅमेरामन, मॅच रेफ्री, कॉमेंटेटर, टीव्हीवर हा सगळा प्रसंग पाहत असलेले करोडो पब्लिक कोणालाही कळले नाही काय झालं.

फक्त पॉंटिंगला माहित होते की गांगुलीने काय स्कीम केली आहे ते. पण त्याला बसलेल्या धक्कातून सावरायच्या आधीच गांगुली पॅव्हेलीयनमध्ये परत देखील गेला होता.

रिकीला तक्रार करायचा देखील चान्स मिळाला नाही. त्यादिवशी भारताने पहिला बॅटिंग करत ५०० हून जास्त धावा बनवल्या. गांगुलीने मॅच जिंकली. क्लार्कला हा किस्सा सांगितल्यावर रिकी त्याला म्हणाला,

“या माणसापासून सावध रहा “

स्वतःला अतिहुशार समजल्या जाणाऱ्या पॉंटिंगला त्याच्याच स्टाईलमध्ये गांगुलीने पोपट केला होता. गांगुलीच्या आधीचे सगळे भारतीय कप्तान अगदी गरीब स्वभावाचे होते. त्यांना कोणीही गंडवून गेल तरी कळायचं नाही पण गांगुलीला राजकारण व्यवस्थित कळत होत. दादा आल्यापासून आपला नाद करायचं कमी झालं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.