आणि त्या दिवशी गांगुली आणि सचिननं मॅच फिक्सिंगला हरवलं !!

७ जुलै १९९८. कोलंबो. भारत विरुद्ध श्रीलंका निधास ट्रॉफी फायनल.

त्याकाळात सचिन आणि गांगुलीची जोडी जबरदस्त फॉर्ममध्ये होती. नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलियासोबतच्या शारजा सिरीज मध्ये, इंडेपेंडस कप मध्ये त्यांनी केलेली ओपनिंग जगाला धडकी भरवणारी होती. भारतीय टीमची विजयी घोडदौड सुरु होती.

पण समोरची श्रीलंका टीम सुद्धा तयारीची होती. अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली त्यांनी विश्वचषक जिंकला होता. लंकेला हरवणे म्हणजे आपण जगज्जेता बनल्याप्रमाणे होते. म्हणूनच या श्रीलंका दौऱ्याला जगभरात जबरदस्त मिडिया हाईप मिळाली होती. 

डे नाईट मॅच होती. फायनलच्या आदल्या रात्री कोलंबोच्या हॉटेलमध्ये सगळे खेळाडू विश्रांती घेत होते. दिवसभर केलेल्या प्रक्टीसमुळे झालेल्या दमछाकीमुळे गांगुली डिनर झाल्या झाल्या लवकर झोपला होता. मॅचच्या दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. उद्याची मॅच जिंकून स्वतःला बड्डे गिफ्ट द्यायचा सुखस्वप्नात तो रमला होता.

अचानक मध्यरात्री त्याच्या रूमचं दार ठोठावल्याचा आवाज आला. यावेळी कोण आलय अस म्हणत वैतागलेल्या गांगुलीने दार उघडलं. समोर मास्टर ब्लास्टर सचिन उभा होता. घामाने थबथबलेला सचिन अतिशय घाबरलेला दिसत होता. गांगुलीने त्याला रूममध्ये घेतल. प्यायला पाणी दिल. सचिन आत आला मात्र त्याने रूमच दार व्यवस्थित लावून घेतल.

तो थोडासा सावरल्यावर गांगुलीने त्याला विचारलं की काय झालं?

सचिन म्हणाला,

“मैंने अभी कुछ सीनियर्स को बातें करते सुना. वो बोल रहे थे कि कल का फाइनल मुकाबला फिक्स किया गया है और हमें उसे हारना है.”

सौरवला देखील धक्का बसला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. भारताचा कप्तान उपकप्तान सकट बरेच खेळाडू संशयास्पद वागत आहेत अशी शंका येत होती. काही अफवा सुद्धा कानावर पडल्या होत्या पण आता खुद्द सचिनने ऐकलं आहे म्हटल्यावर त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. दोघेही काही वेळ सुन्न होऊन बसले. मग अखेर गांगुली म्हणाला,

“कोई बात नही. अगर उन्होने मॅच फिक्स की है तो हम दोनो जान लगा देंगे. कोई चाहे कुछ भी करे हम कल अपना विकेट नहीं गिरने देंगे. चाहे जो भी हो जाए, हम अपनी टीम को हारने नहीं देंगे.”

दुसऱ्या दिवशी मॅच सुरु झाली. 

अझरूद्दीनने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. सचिन आणि गांगुली उतरले. त्या दिवशी दोघे कोणत्या जोशात होते कोणालाच कळेना. पहिल्यापासून लंकेच्या बॉलर्सची पिटाई सुरु केली. पब्लिकपासून ते कॉमेटेटर्स पर्यंत सगळे नाचत होते. रणतुंगाने वेगवेगळे स्ट्रॅटेजी वापरून बघितली पण त्या दिवशी सचिन आणि गांगुली पैकी एकही आउट होत नव्हता.

खुद्द मुरलीधरनची भयानक पिटाई झाली. त्रेचाळीस ओव्हर झाले तरी अजुनही भारताची पहिली विकेट पडली नव्हती. ज्या खेळाडूंनी फिक्सिंग केली होती त्यांची चिडचिड होत होती. खराब खेळायला संधी तरी मिळाली पाहिजे. सचिन गांगुली आज कोणाला चान्स देतील असं दिसत नव्हत.

अखेर जयसूर्याला सचिनची विकेट मिळाली. पण तोपर्यंत टीमच्या अडीचशे धावा स्कोअरबोर्डवर झळकल्या होत्या. त्याकाळातला रेकॉर्ड होता. त्याच्यामागोमाग मुरलीच्याच गुगलीवर गांगुली पण आउट झाला. त्यानंतर अझरूद्दीन फक्त ५ धावा करून आउट झाला. जडेजा आणि रॉबिनसिंगने थोडी फार फटकेबाजी केली पण तेही लवकर आउट झाले.

विश्वविक्रमी सुरवात मिळूनही भारताचा स्कोर ३०६ वर अडकला.

फॉर्मात असणाऱ्या अरविंद डिसिल्व्हाच्या शतकाने भारताच्या तोंडचं पाणी पळवल होतं. पण आगरकरच्या बॉलिंगमुळे त्यांचा डाव ३०० धावावर आवरला आणि आपण फक्त ६ धावांनी जिंकलो. मॅच फिक्सिंगचा डाव फसला होता. त्या दिवशी बुकी झोपले नसतील. त्यांचा बराच पैसा बुडला होता.

सचिन सामनावीर ठरला. त्याचा आणि गांगुलीचा विश्वविक्रम पुढे दोन वर्षांनी त्या दोघांनी स्वतःच मोडला.

आजही आपल्यापैकी अनेकजणांना ती इनिंग आठवत असेल. आपल्याला तो श्रीलंकेविरुद्धचा मालिका विजय, अझरूद्दीनने उचलेली ट्रॉफी आठवते पण त्यासाठी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी ठाऊक नसतात. काही वर्षांनी अझर जडेजा मोंगिया यांची चौकशी झाली. त्यांना आजन्म बंदी घालण्यात आली.

सचिन आणि गांगुलीने कधी अधिकृतरीत्या त्या मॅच बद्दल वाच्यता केली नाही. मात्र आजही क्रिकेटवर्तुळात हा किस्सा सांगितला जातो.

आम्हाला पूर्णानंद करंबेळकर नावाच्या भिडूने खास आग्रह केला होता की या मॅच मध्ये काय झालं होतं सांगा. त्यांच्या इच्छेखातर बोल भिडूची खास पेशकश. तुम्हाला ही काही शंका असतील, काही किस्से सांगायचे असतील तर भिडूला सांगायला विसरू नका.

हे ही वाच भिडू.

2 Comments
 1. Pravin says

  Very nice

 2. अभिषेक पंडित says

  नमस्कार मंडळी,

  सर्व प्रथम तुमचे आभार तुम्ही फार रंजक गोष्टी आमच्या समोर आणतात. तुमचे सर्व लेख मे आवरजून वाचतो ती माहिती शेअर पण करतो.
  मी एक गोष्ट सुचवू इच्छितो तुम्ही यात सायंटिस्ट त्यांचे शोध त्या मागचे कष्ट याचा समावेश करावा.

  अभिषेक पंडित

Leave A Reply

Your email address will not be published.