दोन वेळा गिनीज बुक रेकॉर्ड केलेलं एकमेव नाटक म्हणजे “वऱ्हाड निघालं लंडनला”

हातातल्या उपरण्याला खण लावलेला आणि काठा पदराशी चाळा करत करत प्रा. लक्ष्मणराव देशपांडे मंचावर येतात आणि  सुरु होतो वऱ्हाडाचा गोंधळ…….

शेवटी वऱ्हाड त्या रूमजवळ येऊन थांबत आणि सगळ वऱ्हाड त्या विमानाला पहिल्यांदाच बघत होत,

आत्ता माय एवढंय का हे बंबाळच्या बंबाळ , आन हे आखं निघातय का ? तुकड्या तुकड्यात नै जात ? इतक्यात एक इब्लीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं आणि म्हणालं , आत्त्या समजा आपण या बुंग मध्ये बसलो आणि हे वर जाऊन बत्कन खाली पडलं तर ? यावर आत्त्या म्हणते ह्याच्याच साठी नवस केलता ह्याच्या आईनं …….

अशा प्रकारचे संवादच्या संवाद प्रेक्षकांना पाठ असणारं नाटक म्हणजे दोन वेळा गिनीज बुक बहुमान प्राप्त

‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘

अगदी खेडोपाड्यातील प्रेक्षकांपर्यंत सुद्धा हे नाटक इतक्या सहजतेने पोहचले की त्यातील पात्र आपण स्वतः आहोत इथपर्यंत लोकांच्या भावना या नाटकातील पात्रांशी जोडल्या गेल्या होत्या.

या नाटकातील जवळपास सगळीच पात्र लोकांना पाठ आहेत. त्यातली मुख्य पात्रे म्हणजे काशिनाथ, जानराव, बबन्या, वंसं, विष्णू अशा बऱ्याच पात्रांनी लोकांच्या मनावर गारुड केलं.

लक्ष्मणराव देशपांडे हे एक बहुरंगी मराठी लेखक आणि नाट्यदिग्दर्शक अभिनेते होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्र विभागाचे प्रमुख  होते. वऱ्हाड निघालं लंडनला या एकपात्री नाटकाचा सगळ्यात जास्त प्रयोग करण्याचा विश्वविक्रम  नावावर आहे. तीन तासांच्या एकपात्री नाटकात ५२ रूपे ते सादर करायचे त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणून ओळखायचे.

प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांच्या लेखणीतून १९७२ साली हे नाटक अवतरलं. खरतर नाटकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होतं.  वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या होत्या पण त्यांना काहीतरी नाटक क्षेत्रात वेगळं करून बघायची ईच्छा होती. एकच माणूस रंगमंचावर काय काय करू शकतो, किती पात्रं मंचावर अवतरवु शकतो या विचारातून जन्म झाला वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकाचा.

एका अगदीच ग्रामीण भागातला एक शेतकरी त्याचं भलं मोठं कुटुंब आणि एके दिवशी त्याचा मुलगा परदेशी मुलीबरोबर प्रेम करून तिच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव त्याच्या वडिलांसमोर ठेवतो आणि बऱ्याच अडचणीतून त्यांचं वऱ्हाड लग्नासाठी लंडनला जातं. विमानप्रवास आणि ग्रामीण भागातील नागरिक यांच्यातील कुतूहल आणि त्यातून घडणारी धमाल अशा गोष्टीवर आधारित हे नाटक. भारतातील एकदमच ग्रामीण भागातील लोकं आणि थेट पाश्च्यात्य देशातील लोक अशा प्रवासातून हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवतं.

महाराष्ट्रातील लोकांमध्ये लग्न हा विषय असा आहे कि त्यातून बऱ्याच गोष्टी तयार होतात. रुसणं फुगणं , मानपान, जमवाजमव , बस्ता ,हळद आणि यातून घडणारी गंमत हेच नेमकं प्रा. लक्ष्मणराव देशपांडेंनी हेरलं आणि हे नाटक प्रेक्षकांसमोर आणलं.

नाटकाची खासियत म्हणजे रंगमंचावर एक दोन तीन नव्हे तर तब्बल ५२ पात्रांचा भरणा होता. यातील वेगवेगळ्या पात्रांचे वेगवेगळे आवाज आणि तेही थोडेथीडके नव्हे तर २१ आवाज. नाटक एकपात्री जरी सादर केलं जात असलं तरी ते बहुपात्री नाटक होतं.

हे नाटक अगदी गावातल्या माणसाला सुद्धा आपलसं वाटावं याचं ठळक वैशिट्य म्हणजे नाटकात वापरली गेलेली अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा. ५२पात्रांचे प्रवेश , सुंदर मांडणी आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या प्रकारे किचकट मांडणी नाही विनोदी अंगाने प्रेक्षकांना हसवत हसवत पुढे जातं. प्रत्येक पात्रांवर त्यांची मेहनत , आवाजाची शैली, वय , ठेवणं अशा सगळ्या गोष्टींवरची त्यांची मेहनत कौतुकास्पद होती.

विनोदाचा दर्जा कुठेही देशपांडेंनी खालावू दिला नाही. केवळ महाराष्ट्रातचं नाही तर जगभरातसुद्धा या नाटकाने चक्कर मारलेला आहे. आणि विशेष म्हणजे वऱ्हाड लंडनला सुद्धा प्रयोग करून आलं आहे. परदेशांमध्ये मराठी नाट्य रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

वॉशिंग्टन, कॅनडा, शिकागो,लॉस अँजेलिस अशा बहुविध ठिकाणी वऱ्हाडचे प्रयोग झाले.

प्रयोगाच्या काही दिवसांनी प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांना प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया पत्रांद्वारे यायच्या. आवडलेला संवाद, आवडलेली पात्रं आणि प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांचं कौतुक.

आजवर नाट्यक्षेत्रात कुणीही इतक्या पात्रांची भूमिका एकपात्री प्रकारात सादर केलेली नव्हती. ५२ पात्रं आणि २१ आवाज या अचाट आणि अनोख्या विक्रमाची दखल गिनीज बुक रेकॉर्डने घेतली.

download 6

२८०० प्रयोग लक्ष्मणराव देशपांडे यांनी सादर केले. लक्ष्मणरावांच्या निधनानंतर पुढे अभिनेता संदीप पाठक याने हे नाटक पुढे चालू ठेवलं. संदीप पाठक यांनी या नाटकाचे ३५०हुन अधिक जास्त प्रयोग करून प्रेक्षकांची दाद मिळवली आणि वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकाची लोकप्रियता आणि यशस्वी वाटचाल पुढे चालू ठेवली.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.