या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा पवारांची ओळख बाळासाहेब ठाकरें सोबत करुन दिली होती

शरद पवार आणि बाळासाहेब. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन शक्तीपीठं. दोघेही पक्षप्रमुख. दोघांच्या राजकारणाची सुरवात देखील जवळपास सारखीच झाली. शरद पवार १९६७ साली बारामती येथून निवडून आमदार म्हणून निवडून आले तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना १९६६ साली केली.

या दोन माणसांनी महाराष्ट्राच राजकारण एका उंचीवर नेवून ठेवलं याबद्दल कोणीच शंका घेणार नाही. बाळासाहेबांनी शरद पवारांवर टिका केली. शरद पवारांनी बाळासाहेबांवर टिका केली. विरोधाच राजकारण केलं. पण या सर्व गोष्टींमध्ये आपली मैत्री जपली.

राजकारण कस करावं हे दोघांनी शिकवलच. पण राजकारणाच्या मागे आपण माणूस असतो हे देखील त्यांनीच सांगितलं. एकमेकांच्या तोंड न बघण्याऱ्या आजच्या या राजकारणात बाळासाहेब आणि पवारसाहेबांची मैत्री आदर्शच ठरावी.

या मैत्रीची सुरवात मात्र एका खास माणसामुळे झाली.

भा.कृ.देसाई असं त्यांचं नाव. लोक त्यांना बी.के.देसाई म्हणून ओळखत. ते उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचे सचिव होते. त्यांचा व्यासंग खूप मोठा होता. मराठी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं जबरदस्त प्रभुत्व होतं. ते बाळासाहेबांच्या मार्मिक या मासिकासाठी लिखाण करायचे. यातून त्या दोघांची चांगली मैत्री झाली होती.

मार्मिक त्याकाळी प्रचंड गाजलेलं व्यंगचित्र मासिक होतं. त्यात बाळासाहेबांचे नेतेमंडळींना बोचणारे फटकारे मुंबईत आवर्जून वाचले जायचे. यातूनच एक राजकीय पक्ष स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. 

१९ जून १९६६ रोजी जेव्हा मुंबईतील शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. या सभेला अपेक्षेपेक्षाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्या दिवशीच त्यांचं भाषण ऐकण्यासाठी भा.कृ.देसाई यांनी आपल्या आणखी एका मित्राला बोलावलं होतं, शरद पवार.

विद्यार्थी चळवळीतून यशवंतराव चव्हाणांच्या संपर्कात आलेले शरद पवार युथ काँग्रेसच काम करत होते. ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा शिरकाव झाला होता. यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

शिवसेनेच्या स्थापनेच बाळासाहेबांचं भाषण शरद पवार, बी.के.देसाई आणि त्यांचे इतर काही मित्र शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून ऐकत होते. त्या भाषणावेळी देसाई यांनी त्यांना सांगितलं होतं,

“ही तर सुरवात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला कायमचा ठसा उमटवण्याचं कर्तृत्व या व्यक्तिमत्वात आहे. “

पवारांना सुद्धा बाळासाहेबांची जादू, गर्दीला आकर्षित करून घेण्याच अमोघ वक्तृत्व जाणवलं. पुढे देसाईंनी या दोघांची भेट घालून दिली. बाळासाहेबांच्या आणि पवारांच्या वयात बरंच अंतर होतं पण तरी त्यांची मैत्री जुळून आली. 

पुढे बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, भा. कृ. देसाई आणि शशिशेखर वेदक असा चौघांचा एक गप्पा मारण्याचा ग्रुप बनला. हे चौघे कधी बाळासाहेबांच्या घरी, तर कधी पवारांच्या घरी एकत्र जमत असत. या गप्पांमध्ये क्रिकेट पासून ते राजकारणापर्यंत सगळ्या गोष्टींवर चर्चा होत असे. 

या गप्पांमध्ये  कुठल्याही महत्त्वाच्या विषयाची माहिती हवी असल्यास ते ‘बीकें’शी बोलायचे आणि मग संबंधित विषयाचं भांडारच ‘बीके’ त्यांच्यासमोर मोकळं करायचे. देसाई तेव्हा करंट राजकीय घडामोडीवर ‘मार्मिक’ आणि अन्य दैनिकांत किंवा मासिकांत नियमितपणे लिहायचे.

शशिशेखर वेदक हे बरीच वर्षं इंग्लंडमध्ये होते. तिथं असताना त्यांचा इंग्लंडमधल्या मजूर पक्षाशी अत्यंत जवळचा संबंध होता. मजूर पक्षाचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं, वेगवेगळ्या विषयांवर नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी पार्टी काय काय उपक्रम करते, त्याचप्रमाणे एक राजकीय पक्ष म्हणून पक्षाबद्दलचं प्रकाशन म्हणजे दैनिकं, मासिकं इत्यांदींविषयीची माहिती त्यांच्याकडून ऐकायला मिळत असे. या चौघांच्या बैठकींमध्ये हा विषय बऱ्याच वेळेला चर्चेत येई.

एकदा वेदकांनी आग्रह धरला, की आपणही असं एक आगळंवेगळं साप्ताहिक सुरू करावं आणि त्याचा दर्जा हा अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘टाइम’ मासिकाच्या तोडीचा असावा.

अर्थातच हे प्रकाशन मराठीमध्ये व्हावं, हाही त्यांचा आग्रह होता.या नव्या मॅगझीनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत नव्यानं घडत असलेल्या घडामोडींची ताजी माहिती, त्याचप्रमाणे विज्ञान-तंत्रज्ञान या बाबतीतली वेगवेगळ्या देशांमधल्या उपक्रमांचीही माहिती द्यायची असं ठरलं.

मराठीमधलं हे साप्ताहिक अत्यंत प्रभावीपणे जनमानसावर छाप पाडेल आणि लोकांच्या मनात एक वेगळं स्थानही निर्माण करेल, असा त्यांना ठाम विश्वास होता.
पुढची या चौघांची भेट झाली तेव्हा बाळासाहेब म्हणाले,

‘‘आता चौघं एकत्र आहोत, तर आपण बघू या प्रयत्न करून; पण या कामाची सगळी जबाबदारी शशिशेखर वेदक यांनी घ्यावी आणि आपण तिघांनी त्यांच्या पाठीशी राहावं.’’

शशिशेखर वेदक यांनी एके दिवशी या नव्या उद्योगाचं बजेट बनवलं. सगळ्यांनी त्यांना बजावलं होतं, की या उद्योगातल्या आर्थिक बाजूची आखणी व्यवस्थित असली पाहिजे आणि त्याबरोबरच या मासिकाचा दर्जा उत्तम राखला गेला पाहिजे. या प्रकल्पाला सुरवातीची भांडवली रक्कम म्हणून प्रत्येकानं ५५ हजार एवढी पुंजी तयार केली.

ठरल्याप्रमाणं वेदक कामाला लागले आणि या नव्या मासिकाचं नाव निश्चित झालं… ‘राजनीती’!

वेगाने घडामोडी घडू लागल्या. चौघेही उत्साहाने कामाला लागले. आता शुभारंभाच्या अंकाचा समारंभ आणि मग एकूण वितरणव्यवस्था कशी असावी, याविषयीही त्यांची चर्चा सुरू होती. या सुमारास त्या वेळी बहुधा नवरात्रीचा उत्सव सुरू होता.

बाळासाहेबांच्याच घरी चर्चा सुरू असताना त्यांना एकदम काहीतरी आठवलं. त्यांच्या घरी त्यांच्या सख्ख्या भगिनी आलेल्या होत्या. या त्यांच्या बहिणीच्या अंगात कधी कधी देवीचा संचार व्हायचा. देवी अंगात आल्यावर त्या वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरे द्यायच्या.

आपल्या मासिकाचे भवितव्य काय असेल या बद्दल त्यांना विचारावं अशी कल्पना कोणाच्या तरी डोक्यात आली. आता नव्या उद्योगाची सुरवात करताना जर असं काही शुभ घडणार असेल, तर आपणही त्यांच्या भगिनीकडून असा सल्ला घ्यावा, असं सर्वानी ठरवलं. अंगात आल्यावर बाळासाहेबांच्या बहिणीने त्यांना सांगितलं की ,

“तुमच्या अंकाचा प्रकाशित झालेला पहिला अंक तुम्ही चौघांनी एकत्रितपणे जाऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला अर्पण करा. त्यानंतर त्या अंकाला प्रचंड प्रतिसाद मिळेल. कदाचित विक्रेत्यांकडं तो अंक शिल्लकसुद्धा राहणार नाही.”

चौघेही तसे कर्मकांडाला न मानणारे होते पण एवढी खटपट करून आपण हे काम करतोय, तर ही गोष्टही करायला हरकत नाही, असा विचार त्यांनी केला. दोन दिवसांनी ‘राजनीती’चा पहिला अंक हाती आल्यावर बाळासाहेब, शरद पवार, देसाई आणि वेदक हे चौघं एकत्रितपणे सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोचले. ठरल्याप्रमाणे पहिली प्रत देवाला अर्पण केली.

नंतर बाळासाहेबांच्या भगिनींनी सांगितलेल भाकीत वेगळ्या अर्थाने शब्दशः खरं ठरलं. ‘राजनीती’चा अंक खरंच कुठं दिसलाच नाही. हे मासिक वाचकांच्यामध्ये फेल गेलं. पवार आणि बाळासाहेबांनी धडाक्यात सुरु केलेली ही प्रकाशन संस्था पहिल्या अंकानंतरच बंदच पडली!

अशारितीने ठाकरे आणि पवार यांची ही पहिली युती चालली नाही. पण यानिमित्ताने त्यांच्या मैत्रीचे बंध जुळले ते कायमचे. राजकारणात दोघेही दोन टोकांवर राहिले. एकमेकांविरुद्ध जोरदार टीकाही केली. बाळासाहेब म्हणतात तसं मतभेद होते पण मनभेद कधीही राहिला नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.