भाजप सोडल्याचं दुःख नव्हतं पण मुंडेंना सोडल्याचं दुःख होतं
महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही अजातशत्रू नेते होते त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. मराठवाड्याच्या एका सामान्य शेतमजूर कुटूंबात जन्माला आलेले गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. फक्त इतकंच नाही भारतीय जनता पक्षाला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं, बहुजन तरुणांना पक्षात आणलं.
यातच होते सध्याचे शिवसेनेचे नेते हरिभाऊ राठोड.
हरिभाऊ राठोड यांचा जन्म यवतमाळ जिल्हयातील केळापूर तालुकयातील वागदा या गावी 4 फेब्रुवारी 1954 रोजी झाला. सन 1964 च्या दरम्यान सायखेडा या धरणात त्यांची शेती गेल्यामुळे त्यांना ते गाव सोडावे लागले आणि 10 कि.मी. अंतरावर असलेल्या दाभा (मानकर) या गावी त्यांना स्थलांतर करावे लागले. 6 व्या इयत्तेत शिकत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला.
लहानपणापासून त्यांना समाजकार्याची आवड होती. दलितांच्या विहीरीतून सामुदायिक पाणी पिण्याचा समारंभ त्यांच्या हातून लहानपणीच झाला. तसेच आदिवासींच्या शेतात गावातील काही युवकांना सोबत घेऊन श्रमदानाने विहीर खोदून दिली. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक यांच्या हस्ते लहानपणीच त्यांचा सत्कार एका प्रसंगी करण्यात आला. त्यांचे शिक्षण अत्यंत कठीण परिस्थितीत झाले. त्यांच्या आईने आपल्या अंगावरचे दागिने विकून त्यांचे शिक्षण पूर्ण केले.
पुढे ते शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मंत्रालयात वित्त विभागात नोकरीसाठी रुजू झाले. पोटापाण्यासाठी त्यांची नोकरी चालू होती आणि सोबतच समाजकार्य सुरु जपते. अनेकांचे विवाह जुळविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि हुंडा न घेता त्यांनी विवाह जुळवून आणले. ते ज्या समाजातून येतात त्या बंजारा समाजात जनजागृती व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.
यातूनच पुढे ते राजकारणात आले. भा.रि.प. बहुजन महासंघाचे ते संस्थापक सदस्य होते. मखराम पवार, प्रकाश आंबेडकर, निळू फुले यांच्याबरोबर राहून महाराष्ट्रामध्ये बहुजनांमध्ये चेतना जागवून बहुजन महासंघ या नावाचे वादळ निर्माण करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता. निवडणूक देखील लढवली.
त्याकाळात झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याशी संपर्क आला. त्यांचा सामाजिक कार्याचा अभ्यास आणि चळवळीमध्ये दिलेले योगदान याची दखल घेऊन मुंडे यांनी आपल्या कार्यालयात अतिरिक्त खाजगी सचिव या पदावर त्यांची नेमणूक केली.
मुंडेंच्यामुळे हरिभाऊ राठोड भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात आले.
जवळपास दहा वर्षे दोघांनी एकत्र काम केले. हरिभाऊ राठोड सांगतात तयाकाळी प्रत्येक दुःख दुःखाच्या प्रसंगी आम्ही सोबत होतो. हरिभाऊ राठोड यांनी आपल्या आयुष्यातील पहिली कार घेतली तेव्हा त्याचा नारळ सुद्धा मुंडेंनी फोडला होता आणि फक्त राठोड यांचा आग्रह आहे म्हणून जवळपास पंधरा वर्षांनी त्यांनी स्टिअरिंग हातात घेतली.
मुंडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला तेव्हा सुद्धा हरिभाऊ राठोड त्यांच्या सोबत होते.
२००४ साली गोपीनाथ मुंडे यांनी राठोड यांना यवतमाळ इथे भाजपकडून लोकसभेचे तिकीट दिले. हरिभाऊ तिथे निवडून देखील आले. पुढे त्यांचे पक्षातील इतर नेत्यांशी संघर्ष झाला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आग्रहामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हरिभाऊ तेव्हा विलासराव देशमुखांना म्हणाले,
“भारतीय जनता पक्ष सोडताना मला दुःख होत नाही पण माझ्या जवळच्या मित्राला, सामाजिक भान जपणाऱ्या मित्राला सोडत आहे याच मला प्रचंड दुःख आहे.”
काँग्रेसवासी झालेल्या हरिभाऊ राठोड यांच्या डोळ्यात तेव्हा अश्रू उभे होते.
हे हि वाच भिडू
- गोपीनाथ मुंडे म्हणाले, भाजप आता मुंडे -फडणवीस यांचा नाही तर पाटलांचा देखील पक्ष झाला आहे
- देशपातळीवर २०११ साली ओबीसींची जनगणना झाली ती गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे..!!!
- गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, अजित पवारांमुळे माझ्या पुतण्याने माझ्याविरुद्ध बंड केले.