मुंडेंच हेलिकॉप्टर भरकटलं होत, पोलीस शिपायाच्या गाडीवर बसून चंद्रपूरला पोहचले

भारताच्या राजकीय इतिहासात विमान दुर्घटना, हेलिकॉप्टर दुर्घटना यांचा काळा संदर्भ आहे. बरेच मोठे नेते, राजकीय व्यक्ती अशा बऱ्याच लोकांचा एअर क्रॅश मध्ये मृत्यू झाला आहे. अशा अपघातातून बरेच नेते बचावले हि आहेत.

यामध्ये एक होते भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे…

बऱ्याचदा पक्षाच्या कामासाठी मेळावे, राज्य आणि देशभर वेगवेगळे दौरे आयोजित केले जातात. गोपीनाथ मुंडे 2009 अशाच एका दौऱ्यावर निघाले होते. हा दौरा होता चंद्रपूरचा. आणि ते ज्या हेलिकॉप्टरमधून निघाले होते तेच त्यांचं हेलिकॉप्टर भरकटल होतं.

2009 मध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. त्यावेळी भाजपचा अवखळ वारू सबंध महाराष्ट्रात प्रचारासाठी उधळला होता. संपूर्ण राज्याची सत्ता हाती येण्यासाठी बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांचे दौरे आयोजित होत होते. यात गोपीनाथ मुंडे यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी होती.

चंद्रपुरात बल्लारपूर या विधानसभा मतदार संघात मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. प्रचंड धकाधकीची ती वेळ असल्यामुळे मुंडेंनी हेलिकॉप्टर मार्गे चंद्रपूरात जाण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी ते हेलिकॉप्टर मध्ये बसले आणि आता चंद्रपुरातल्या बल्लारपूर येथे पोहोचणार तेवढ्यात हेलिकॉप्टर हवेतच भरकटल.

रात्रीची वेळ होती. बाहेरचा हवामान खराब होतं यामुळं हेलिकॉप्टर चालकाला हेलिपॅड दिसेना. आता हेलिकॉप्टर उतरवायचा कसं असा प्रश्न हेलिकॉप्टरच्या चालकाला पडला. आणि यामुळेच मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटलं. बराच वेळ आकाशातच घिरट्या मारणार हेलिकॉप्टर प्रसंगावधान राखून जवळच्याच मोरवा हेलिपॅडवर उतरवण्यात आलं.

त्या हेलिपॅडवर तैनात असलेल्या पोलिस हवालदाराकडे विचारपूस केल्यानंतर मुंडे त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या एम-80 या दुचाकीवर बसून पडोळी पोलिस चौकीत पोहोचले.

तेथून त्यांनी परळी (वैजनाथ) या त्यांच्या मूळ गावाशी संबंधित चंद्रपूरात राहणाऱ्या बियाणी नावाच्या व्यक्तीला घडलेली माहिती दिली. मात्र बराच काळ भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता तिथं न आल्याने त्यांनी चांद्रपूरात सभा घेण्याऐवजी तेथून परतण्याचा निर्णय घेतला.

यानंतर ते खासगी वाहनाने नागपूरला निघणार असतानाच भाजप आमदार शोभा फडणवीस यांना हा प्रकार समजला. शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या काकू. त्यांनी मुंडे यांना मध्येच थांबवून जाहीर सभेला येण्याची विनंती केली. तर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही मुंडे यांची भेट घेऊन चंद्रपूरला येण्याची विनंती केली.

शेवटी नाही होय म्हणत मुंडे चंद्रपूरला पोहोचले. यानंतर बल्लारपूर येथे पोहोचून त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.