इरफान पठाणच्या करियरची वाट लागण्यामागे ग्रेग चॅपलचा हात नव्हता तर…

आपल्या लहानपणी क्रिकेटबद्दल अनेक अफवा फेमस होत्या जस की रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत, शुक्रवारी पाकिस्तान हमखास मॅच जिंकते, जडेजा हेल्मेट काढला की सिक्स मारतो.

अशाच एका अफवेवर आपण मोठेपणी सुद्धा विश्वास ठेवलेला.

ती अफवा म्हणजे,

“भारताचा सुपरस्टार फास्टर बॉलर इरफान पठाणला ग्रेग चॅपलने वरच्या ऑर्डरला बॅटिंगला पाठवलं. त्यामुळे तो स्विंग विसरला आणि त्याच करियर संपलं.”

आता आम्ही अफवा म्हणतोय पण बरेच जण भांडायला येतील की हे खरंच आहे. पण नुकताच खुद्द इरफान पठाणने  या बद्दल खुलासा केला आहे.

इरफान पठाण म्हणजे स्विंगचा बादशाह.

टीम इंडिया मधील अधिकतर खेळाडू हे अनेक संकटांवर मात करत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येत स्टार बनलेले. इरफान पठाण देखील त्यातलाच एक. लहान असताना आपल्या मोठा भाऊ युसूफ सोबत बडोद्याच्या मस्जिदमध्ये झाडू मारता मारता कधी क्रिकेटची आवड निर्माण झाली कळलंच नाही.

अंडर-१९ मधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केलेलं. आणि आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याच्या पुढच्याच वर्षी त्यानं टीम इंडियात स्थान पटकावलं.

पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गिलख्रिस्ट, हेडन, स्टिव्ह वॉ यांना आपल्या स्विंगने बेजार केलं.

इनस्विंग, आऊटस्विंग, रिव्हर्स यावर त्याची पकड अगदी लहान वयातच जाणवून येत होती.

त्याच्या बॉलिंग शैली आणि बॉल स्विंग करण्याच्या पद्धतीमुळे

त्याची तुलना महान बॉलर वासिम अक्रमशी केली जाऊ लागली होती

वसीम आक्रमने देखील त्याला नेट्स मध्ये काही टिप्स दिल्या होत्या. यामुळे त्याची बॉलिंग अधिक खुलून आली.

त्याच्या कारकिर्दीचा सुरवातीचा काळ म्हणजे मॅजिकल असंच म्हणता येईल. जगभरातल्या सगळ्या खेळपट्टीवर त्याला विकेट मिळत होत्या.

साधारण याच काळात भारतीय क्रिकेटमध्ये एक वादळ आलं होतं, ग्रेग चॅपेल.

कप्तान सौरव गांगुलीच्या सल्ल्यानुसार ऑस्ट्रेलियाच्या या ग्रेट ऑल राउंडरची निवड भारताचा कोच म्हणून झाली. पण या ग्रेग चॅपलने आल्या आल्या गांगुलीचीच सुट्टी केली.

आक्रमक दादाच्या जागी नम्र राहुल द्रविड भारताचा नवा कप्तान बनला.

द्रविडची  वृत्ती सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची होती. चॅपेल जे बदल आणू पहात होता याला द्रविडने मोठा विरोध केला नाही. पण यामुळे भारतीय टीमच्या सिनियर खेळाडूंच्यामध्ये थोडीशी खळखळ सुरू झाली.

अशातच भारताचा बॉलिंग मधला मेन अस्त्र असलेल्या इरफान पठाणला ३ नंबरला खेळवण्याचा निर्णय झाला.

इरफान चांगली बॅटिंग करायचा. बडोद्याकडून रणजी खेळताना त्याने अनेकदा मोठा स्कोर केला होता. भारताकडून खेळतानाही इरफानने आठ नंबर, दहा नंबरवर येऊन काही चांगली इनिंग खेळली होती.

याचाच परिणाम त्याला इंटरनॅशनल मॅचमध्ये देखील वरच्या ऑर्डरवर खेळवायचा निर्णय झाला.

सहसा द्रविडच्या नंबरवर खेळायचा त्या तीन नंबरच्या जागी इरफान बॅटिंग करू लागला.

नाही म्हणायला त्याने तिथे चांगली बॅटिंग केली. तीन वेळा अर्धशतक काढलं. जेव्हा सेहवाग जखमी होता तेव्हा त्याच्या जागी इरफानने दोन वेळा ओपनिंग सुद्धा केली.

इरफानने नेट्स मध्ये बॅटिंगची चांगली प्रॅक्टिस केली होती.

कपिल देव नंतर पहिल्यांदाच भारताला चांगला ऑल राउंडर मिळाला अशी चर्चा सुरू झाली.

पण इरफान ज्या साठी फेमस होता ती स्विंग बॉलिंग मात्र हळूहळू गायब झाली. त्याला मिळणाऱ्या विकेट्सची संख्या आटली. याच खापर ग्रेग चॅपेल वर फुटलं.

पण इरफान म्हणतो की मला तीन नंबरवर बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय चॅपेलचा नव्हता.

तर हा सल्ला सचिन तेंडुलकरने राहुल द्रविडला दिला होता.

सचिनच मत होतं की इरफानकडे सिक्स मारण्याची ताकद आहे, तो फास्टर बॉलर्सना चांगलं खेळू शकतो. हे द्रविडला देखील पटलं. म्हणूनच इरफानला पुढच्याच श्रीलंका दौऱ्यामध्ये तीन नंबरला खेळवल.

त्याकाळी मुरलीधरन फॉर्म मध्ये होता आणि लंकेचाच दिलहारा फर्नांडो या फास्टर बॉलरने एक वेगळाच दोन बोटांचा स्लो बॉल शोधून काढला होता. रेग्युलर बॅट्समनना याला खेळण्यास अडचणी येत होत्या.

आयडिया ही होती की ,

इरफान स्वतः फास्टर बॉलर असल्यामुळे फर्नांडोची बॉलिंग तो व्यवस्थित ओळखेल व त्याच्या वर अटॅक करू शकेल.

श्रीलंकेत हा प्रयोग यशस्वी झाला म्हणून इरफानची नेमणूक तीन नंबरलाच झाली.

म्हणून इरफानचा दावा आहे की यात चॅपेलची कोणतीही चूक नव्हती. आणि स्विंग कमी झाल्याबद्दल तो म्हणतो की,

मला ओपनिंग बॉलिंग करायचा चान्स खूप कमी वेळा मिळाला, आणि बॉल जुना झाला की तो कमी स्विंग होतो. आजही मी पहिल्या प्रमाणे बॉल स्विंग करू शकतो. ती कला मी विसरणे शक्य नाही.

पण इरफान हे ही मान्य करतो की वारंवार होणाऱ्या इंज्युरी मुळे त्याचा वेग कमी झाला आणि त्याच्या बॉलिंगची घातकता कमी झाली.

पुढे भारतात नव्या दमाचे वरच्या फळीचे बॅट्समन आले.  इरफान प्रमाणेच डावखुरा स्विंग बॉलर असणारा अनुभवी झहीरने देखील कमबॅक केलं. तो टीम मध्ये असताना इरफानला जागा मिळवणे अवघड होतं गेलं. यामुळे बॅटिंगही गेली आणि बॉलिंगही गेली.

संधी मिळाली तेव्हा त्याला मोठा चमत्कार करायला जमलं नाही. म्हणूनच तो टीम मधून बाहेर गेला.

बाकी ग्रेग चॅपेलने भारतीय टीममध्ये राजकारण केलं यात शंका नाही पण इरफानच करियर बुडायला तो नाही तर स्वतः इरफान जबाबदार होता हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.