शेअर बाजारत ट्रेडिंग करण्यासाठी शिक्षण सोडलं अन् पाचच वर्षात १०० कोटींची कंपनी उभी केली
एकदा विचार करा तुम्ही वयाच्या १७ वर्षी काय करत होता. हैद्रबाद येथील एका विद्यार्थाने २ हजार रुपये घेऊन ते शेअर मार्केट मध्ये गुंतवले होते. आज वयाच्या २३ वर्षी त्याची कंपनीची नेट व्हॅल्यू १०० कोटींवर गेली आहे. आता त्याचा हाताखाली ३५ लोक काम करतं आहेत.
जगातील सर्वात मोठे शेअर बाजारातील गुतंवणूकदार म्हणून वॉरेन बफेट, बेंजामिन ग्रॅहम, राकेश झुनझुनवाला यांची नावे घेतली जातात. अशाच नावांमध्ये एंट्री घेण्यासाठी एक नाव सज्ज आहे ते म्हणजे संकर्ष चंदा.
हैद्राबादच्या संकर्ष चंदाने १७ व्या वर्षांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.
संकर्षने एक फिनटेक स्टार्टअप कंपनी स्थापन केली असून लोकांना ही कंपनी स्टॉक, म्युच्युअल फंड आणि बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देते. त्याच्या कंपनीचे नाव स्वबोध इन्फिनिटी इनव्हेसमेंट ऍडव्हजर प्रायव्हेट लिमिटेड आहे.
संकर्ष हा नोयडा येथील बेनेट युनिव्हर्सिटी मध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये बी. टेक करत होता. मात्र, २०१७ सेकंड इयरला असतांना त्याने मध्येच शिक्षण सोडले आणि कंपनी स्थापन केली. त्या कंपनीत ८ लाखांच्या गुंतवणूक केली.
स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी संकर्षने आपले शिक्षण मध्येच सोडले.
१२ वी झाल्यानंतर आपल्या डोक्यात आता काय करू यासारखे प्रश्न उपस्थित राहतात. अशावेळी संकर्षने स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. त्याने २०१६ मध्ये २ हजारांपासून गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. पुढच्या २ वर्षात त्याने दिड लाख रुपये गुंतवले आणि त्याचे बाजारमूल्य १३ लाखांवर गेले होते.
त्यानंतर २०१७ मध्ये संकर्षने स्वतःची कंपनी सुरु करण्यासाठी शेअर मार्केट मधून ८ लाखांचे शेअर विकले आणि उरलेले पैसे ठेवले. त्यानंतर संकर्षणाने स्टार्टअप कंपनीच्या माध्यमातून बाजारात गुंतवले.
संकर्षने द विकेंड लिडर या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो की, वयाच्या १४ व्या वर्षांपासून तो अमेरिकन गुतंवणूकदार बेंजामिन ग्रॅहम यांना फॉलो करत आहे. त्याने त्यांचे शेअर बाजार विषयीचे सगळे लेख वाचले आणि त्यानंतर शेअर बाजारात आवड निर्माण झाली.
ग्रॅहम यांना फादर ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणून ओळखलं जातं.
स्वतःची कंपनी सुरु करण्यापूर्वी संकर्षने सहा महिने समाजातील सर्व स्थरातील लोकांचे शेअर मार्केट बद्दल मत जाणून घेतले होते. यात उद्योजक, गुंतवणूकदार, मध्यमवर्गातील कुटुंब अशा लोकांचा समावेश होता.
त्याची स्टार्टअप कंपनी पैसे कसे कमविते ?
संकर्षची कंपनी आपल्या ग्राहकांना गुंतवणूकीचे पर्याय देते. काही रुपयांपासून ते लाखो रुपये इनव्हेसमेंट करण्यासंदर्भात ग्राहकांना पर्याय दिला जातो. जेव्हा ही कंपनी स्थापन करण्यात आली होती वर्षभरासाठी सबस्क्रिप्शन फि फक्त ९९ रुपये होती. त्यानंतर २९९ रुपये करण्यात आली होता.
लॉकडाऊन नंतर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्याची संख्या वाढली त्याच प्रमाणे संकर्षची कंपनीचे सबस्क्रिप्शन घेणारे वाढले आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून वार्षिक सबस्क्रिप्शन फि ४९९९ एवढी करण्यात आली आहे.
संकर्षची कंपनी सबस्क्रिप्शन आणि ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यावर १ ते २.५ टक्के फी आकारते.
कंपनीने पहिल्या वर्षी १२ लाख, दुसऱ्या वर्षी १४ लाख आणि २०२०-२१ मध्ये ४० लाखांची उलाढाल केली आहे. २०१६ मध्ये संकर्षने ‘फायनान्शिअल निर्वाना’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यात ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतील फरकाबद्दल सांगतो, शेअर मार्केट समजून घेण्यासाठी काही टिप्स सुद्धा या पुस्तकात संकर्षने दिल्या आहेत.
शेअर मार्केट बरोबर संकर्षला स्पेस सायन्स मध्ये सुद्धा आवड आहे त्यामुळेच त्याने एक एरोस्पेस स्टार्टअप कंपनी सुद्धा सुरु केली आहे. अंतराळ संशोधनात ही कंपनी काम करणार आहे.
अवघ्या २३ वर्षी संकर्ष चंदा याची कंपनीची नेट व्हॅल्यू १०० कोटींवर गेली आहे. हैद्रराबाद येथील गगन महाल येथे त्याच्या कंपनीचे ऑफिस असून ३५ लोकं कामाला आहेत.
याबाबत संकर्ष म्हणतो की, पैसे आणि गुंतवणुकी बद्दल वाचत गेलो आणि त्याबद्दलचे आकर्षण वाढत गेले. त्यामुळे गुंतवणूक करण्यास लवकर सुरुवात केली. बी. टेक नंतर शिक्षणासाठी परदेशात जायचे ठरविले होते. पण बी. टेकचे असतांना अनेक गुतंवणूदारांना भेटलो होतो. लवकर कंपनी सुरु करायची होती. त्यामुळे शिक्षण मध्येच सोडल्याचं संकर्ष सांगतो.
हे ही वाच भिडू
- इलॉन मस्कच्या स्पेसएक्स प्रमाणे अंतराळ गाजवू शकणारे स्टार्टअप भारतात पण आहेत….
- चहासोबत त्याची भांडी सुद्धा खाता येणाऱ्या स्टार्टअपमधून भिडूनं लाखोंची उलाढाल केलीये
- निकाल आला, आता टाटांची TCS पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट तीनदा विकत घेऊ शकतेय