दिल्लीच्या पहिल्या सरकारी हॉस्पीटलचा आणि मराठ्यांच्या शौर्यांचा असा संबंध आहे..

कागल संस्थान म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराणे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून या घाटगे घराण्याने पराक्रम गाजवला. अनेक पराक्रमी योद्धे कागल मध्ये होऊन गेले.

यातच एक नाव येते इंदुराव उर्फ हिंदुराव घाटगे यांचं.

हिंदुराव घाटगे हे सर्जेराव घाटगे यांचे सुपुत्र. सर्जेराव घाटगे हे ग्वाल्हेरच्या शिंदे दरबारात मानकरी होते. दुसरे बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांच्या खास विश्वासातील सरदार म्हणून त्यांना ओळखलं जातं होत.

या सर्जेराव घाटगे यांची सुपुत्री आणि हिंदुराव घाटगे यांची बहीण बायजाबाई यांचं दौलतराव शिंदे यांच्याशी लग्न लावून देण्यात आलं होतं.

या बायजाबाई या अत्यंत बुद्धिमान होत्या. राज्यकारभारात त्यांच्या शब्दाला वजन होते.

शिंदे दरबारात कागलच्या घाटगेंच वाढलेलं वजन पाहून इतर सरदारांचा जळफळाट होऊ लागला व त्यातूनच सर्जेराव घाटगे यांचा खून झाला.

त्यांच्यानंतर हिंदुराव घाटगे यांना ग्वाल्हेरला बोलावून त्यांना शिंदेंचा सेनापती बनवण्यात आलं.

पुढे दौलतराव शिंदे यांचा मृत्यू झाला तेव्हा बायजाबाई यांनी एका मुलाला दत्तक घेऊन त्याला गादीवर बसवले. ग्वाल्हेरवर बायजाबाई व हिंदुराव या घाटगे बहीणभावाची पकड बसली.

हिंदुराव घाटगे देखील पराक्रमी होते. कोल्हापूरच्या छत्रपतींनी त्यांना वजारत मा आब हा किताब दिला होता.

त्यांच्या तलवारीच्या बळावर महाराणी बायजाबाई यांनी ग्वाल्हेरचा कारभार हाकला. त्यांनी अत्यंत कठोरपणे प्रशासनाची घडी बसवली. ज्याचं अगदी इंग्लंडमध्ये देखील कौतुक करण्यात आलं.

पुढे बायजाबाई यांचा दत्तकपुत्र त्यांच्यावर उलटला.

त्यांनी असंतुष्ट सरदारांना एकत्र करून बायजाबाई व राजा हिंदुराव यांच्या विरोधात बंड पुकारले. या युद्धात दोन्ही बहीण भावाचा पराभव झाला. बायजाबाई यांना ग्वाल्हेर सोडून परागंदा व्हावे लागले.

साधारण १८३५ साली हिंदुराव घाटगे हे दिल्लीला आले. तिथे त्यांनी विल्यम फ्रेझर या इंग्रज अधिकाऱ्याचा बंगला विकत घेतला. फ्रेझरच्या व त्या पूर्वीच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या गूढ मृत्यू मुळे या बंगल्याला भुताटकीचा वाडा म्हटले जात होते पण हिंदुराव त्याच रुपडं पालटलं.

हा कागलचा घाटगे घराण्याचा दिल्लीतला राजवाडा आजही बाडा हिंदुराव म्हणून ओळखला जातो.

हिंदुराव घाटगे या वाड्यात जवळपास वीस वर्षे निवृत्तीचे जीवन जगले. त्याकाळचा ब्रिटिश गव्हर्नर त्यांचा मित्र होता. तो त्यांना राजा हिंदुराव या नावाने हाक मारत असे. दोघे बऱ्याचदा शिकारीसाठी एकत्र जात असत.

येथे जवळच पुरातन अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे.

१८५५ साली हिंदुराव घाटगेंचा मृत्यू झाला. त्यांचा वाडा असलेली टेकडी घाटगे घराण्याच्या मालकीची होती.

याच जागी १८५७ चे बंडाचे युद्ध झाले.

बंड करणाऱ्या शिपायांनी ही टेकडी जिंकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र ब्रिटिशांनी हे महत्वाचे ठाणे हातचे जाऊ दिले नाही. हिंदुरावांच्या राजवाड्यात ब्रिटिश सैन्याचे तात्पुरते हेडक्वार्टर करण्यात आले होते.

युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांना येथेच आणून उपचार होत होते.

जंग जंग पछाडुनही उठावकर्त्यांना हा वाडा जिंकता आला नाही. ही लढाई जिंकून ब्रिटिशांनी दिल्ली आपल्या हाती कायम राखली. हिंदुराव वाड्याजवळच्या युद्धाने १८५७ सालच्या बंडाचे चित्र पालटले.

ब्रिटिशांनी या विजयाचे स्मारक इथे जवळच उभे केले आहे.

या युद्धानंतर ब्रिटिश रॉयल आर्मीने या राजवाड्याच्या वापर हॉस्पिटल म्हणून केला. पुढे १९११ साली किंग पंचम जॉर्ज राज्यरोहनासाठी भारतात आला तेव्हा भारताची राजधानी पुन्हा दिल्लीला हलवण्यात आली.

नवी दिल्लीचे बांधकाम सुरू करण्यात आले. तेव्हा दिल्लीचे पहिले सरकारी हॉस्पिटल हे घाटगेच्या राजवाड्यात उभारण्यात आले.

याचे नाव देण्यात आले हिंदुराव हॉस्पिटल.

आज शंभरच्या वर वर्षे झाली दिल्लीमधील सर्वात मोठ्या दवाखान्यात या हॉस्पिटलचा समावेश होतो. मराठा योद्ध्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले हे हॉस्पिटल कोरोनाच्या लढाईत गोरगरिबांसाठी महत्वाची कामगिरी बजावताना दिसत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.