शिंदेशाहीच्या राजधानीच्या किल्ल्यात हजारो वर्षांपूर्वी ‘शून्याचा’ पहिला शोध लागला होता.

आपण जगभरात कॉलर ताठ करून सांगतो शून्य ही जगाला आम्हा भारतीयांनी दिलेली देणगी आहे. आधी लोक फक्त हाताच्या बोटावर आकडे मोजायचे म्हणे पण आपण जगाला शहाण केलं. अभिमानासपद गोष्ट आहे हो.

पण हा शोध नेमका कोणी लावला, कुठे लावला, कसा लावला हे आपल्याला जास्त माहिती नसतं. 

कोण म्हणत की शून्याचा आर्यभट्ट याने लावला, तर कोण म्हणत ब्रम्हगुप्त यांनी. हजारो वर्षांपूर्वी शोध लावला हे आपण छाती ठोक पण ए सांगतो. पण याचा पुरावा कोणी मागितल तर?

भारतात शून्याचा शोध लागला याचा पुरावा आहे तोही शिंदेशाहीची राजधानी असणाऱ्या ग्वाल्हेरच्या किल्ल्यात. हाच किल्ला जिथून महादजी शिंदे यांनी उत्तरेत मराठ्यांचा डंका वाजवला. मुघलांना हरवून त्यांना आपलं अंकित केलं. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास या किल्ल्याशी जोडला गेलेला आहे.

पण शून्याचा शोध त्याच्या खूप पूर्वीचा आहे.

ग्वाल्हेरजवळ असलेल्या गोपालाचल डोंगरावर हा किल्ला आहे. हा किल्ला मानसिंग राजाने बांधला म्हणून त्याला मान मन्दिर असं म्हणतात. जवळपास ६ किलोमीटर इतका हा किल्ला पसरलेला आहे. मानसिंग राजाच्याही अगोदर अनेक राजांनी येथे मंदिरे उभारली. किल्ल्यात ठिकठिकाणी ही मंदिरे पहावयास मिळतात.

याच मंदिरामध्ये आहे चतुर्भुज मन्दिर.

हे मंदिर भगवान विष्णूचे आहे. तो चार हातांचा आहे म्हणून चतुर्भुज मंदिर. हे मंदिर नाग वंशाच्या लोकांनी इसवी सन ८७५ मध्ये डोंगरात कोरून काढलं असं मानल जात. तस बघायला गेलं तर हे मंदिर छोटं आहे. जवळपास १२ फुट त्याचा आकार असेल.

मंदिराला छोट मंडप आहे, एक शिखरदेखील आहे. प्रवेशाच्या ठिकाणी गंगा यमुना कोरलेल्या आहेत . छतावर कोरीव काम व कलाकुसर पाहायला मिळते. कोणीतरी विघ्नसंतोषी माणसांनी विष्णूच्या मूर्तीची तोडफोड केलेली आहे. पण तिथल्या भिंतीवरचा शिलालेख शाबूत असलेला आढळतो.

या शिलालेखात तेव्हाच्या ग्वाल्हेरच्या राजाची माहिती आहे. सोबतच मंदिराजवळच्या बगीच्याची माहितीदेखील कोरलेली आहे. त्यात लिहिलं आहे की,

समाजाने एकत्र येऊन २७० हस्त (१ हस्त = १.५ फुट) भागिले १८७ फुट आकाराचा एक बगीचा उभारला आहे. या बागेतून रोज मंदिराला ५० फुलांचे हार मिळतात. 

हे २७० आणि ५० या आकड्यातील शून्य म्हणजे जगातील शून्याच्या वापराचा पहिला लिखित पुरावा.

त्याकाळच्या लोकाना फक्त शून्य माहित नव्हत तर त्याचा वापर करून मोठी गणिते ते सोडवत होते, व्यवहारात वापरत देखील होते. अनेक खगोलशास्त्रीय शोध भारतात लागत होते हे सिद्ध होते.

याच्या आधीच शून्याचा शोध लागला असेल पण १९०३ साली आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या दाव्यानुसार शून्य पहिल्यांदा सापडतो तो ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर.

कंबोडिया देशाचा यावर आक्षेप आहे. त्यांच्या दाव्यानुसार तिथे शून्याचा पहिला पुरावा आहे. काही संशोधक म्हणतात की काबुल मध्ये सापडलेल्या भोजपत्रामध्ये शून्य आहे. पण हे शून्य आत्ताच्या शून्या प्रमाणे गोल नाही.

चीनवाले सुद्धा म्हणतात की शून्याचा शोध आम्ही लावला.

पण अभ्यासकांचे म्हणणे आहे की भारतात हा शोध लागला व अरब व्यापाऱ्यांनी त्याला युरोप व चीन पर्यंत पोहचवल.

आता यावर किती जरी वाद असतील पण भारतात तरी पहिला अधिकृत शून्य ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरच सापडतो.

सगळ्या ऐतिहासिक ठिकाणाप्रमाणे या मंदिराकडे देखील प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष झालेले आहे. इथे जाण्याचा रस्ता देखील धड नाही. आपल्या इतिहासाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण पार पाडली नाही तर काही वर्षांनी हा अद्भुत वारसा हरवला जाईल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.