त्याच्यात दम होता… पण मार्केट मिळालं नाही, ही हुकलेल्या पेजरची गोष्ट
गँग्स ऑफ वासेपूरचा दुसरा पार्ट, खास या पिक्चरसाठी आम्ही सिंगल स्क्रीन थिएटरला गेलो होतो, इथं फॅनची घरघर आणि ढेकणांचे चावे पद्धतशीर माहौल बनवत होते… पण आम्हाला फिकीर नव्हती कारण आम्ही फैजलचा बदला बघायला आतुर होतो. तर एक सिन सुरू झाला, जिथं फैजल भाई निवांतमध्ये दम मारत होते, जगाची चिंता त्यांनी कधीच फाट्यावर मारली होती. बंदुकांची डीलिंग सुरू होती, पण त्यात भाईला रस नव्हता. तेवढ्यात एका कार्यकर्त्याचा फोन वाजला. भाईनं त्याला विचारलं, ‘ई का है?’ कार्यकर्ता म्हणला… ”पेजर.”
आमच्यातलं सगळ्यात वांड पोरगं शून्याव्या मिनिटाला बोललं, भाऊ आपल्याला पेजर घ्यायचा. त्याला एक शिवी देऊन पुन्हा पिक्चरमध्ये डोकं घातलं.
तर तिकडं फैजलभाई भाभींच्या घरी ऑफिशिअल ‘परमिसन’ घ्यायला गेलेले, गाडीतून उतरल्यावर भाई भाभींना कंबरेला अडकवलेला पेजर दाखवतात आणि भाभी फ्लाईंग किस फेकतात. अरा बाप… त्या एका सिनसाठी फैझल बनून गोळ्या खाल्ल्या असत्या. तर हा, घरात गेल्यावरही भाईंच्या पेजरवरच कॅमेरा फिरतो आणि आपल्याला समजतं.. पेजर हा लय बाप विषय आहे.
आता आम्ही आमच्या कार्यकर्त्याला तेव्हा शिवी देऊन गप बसवलं असलं, तरी पुष्पामध्ये पेजर दिसला आणि भाऊचा बल्ब पेटला. आयफोनच्या जमान्यात पेजर घेऊन तो काय करणार माहीत नाय, पण म्हणलं आपल्याला पेजरची माहिती द्यायला-घ्यायला काय जातंय…
तर पेजरची गोष्ट म्हणजे, आपल्या आयुष्यात काही वेळासाठी आलेली क्रश आहे… जी लांबून फार भारी वाटली आणि जवळ जाईपर्यंत गायबही झाली.
पेजरचं पहिलं नाव होतं बीपर. फैजल, पुष्पा असले डॉन लोकं वापरत असले, तरी बीपरची सुरुवात १९२१ मध्ये पोलिसांच्या सोयीसाठी करण्यात आली होती. पुढं १९४९ मध्ये अल्फ्रेड ग्रॉसनं डॉक्टरांसाठी बीपर बनवलं. डॉक्टर किंवा पोलिस कुठं बाहेर वैगेरे असतील आणि त्यांना फोन लावायची सोय नसली की, त्या भिडूला बीपरवर संदेश जायचा (टुई टुई वाजायचं ओ), मग जवळचा टेलिफोन बूथ बघून ते फोन लावणार आणि मॅटर समजून घेणार. हळूहळू बीपरची सिस्टीम लोकांमध्ये पसरायला लागली, पण तिला हवं तसं मार्केट अजून मिळालं नव्हतं.
मग मार्केटमध्ये एंट्री झाली, मोटोरोलाची. त्यांनी बीपरला जरा आपल्या टाईपनं मॉडिफाय केलं आणि १९५९ मध्ये पेजबॉय नावानं मॉडेल मार्केटमध्ये आणलं. तेव्हापासून नाव पडलं पेजर. पुढं त्याचं पण मॉडिफिकेशन झालं आणि १९७० पर्यंत नुसत्या बीपवर अवलंबून न राहता ऑडियो मेसेजचीही सोय झाली. त्यानं झालं असं की, ‘भावा लडतर झाल्या लवकर ये’ असं डायरेक्ट सांगता येऊ लागलं. पेजरची कन्सेप्ट लोकांमध्ये हिट होऊ लागली.
पण अजूनही मार्केटचा कळस गाठता येत नव्हता…
त्यात मदत झाली, ती स्टाईल स्टेटमेंटची. कॉलेजमध्ये एक गाभडं लोवेस्ट जीन्स घालून आलं, की आपल्या कंबरेचं आणि बुडाचं माप न बघता सगळी गॅंग लोवेस्ट घालायची. तसंच काहीसं पेजरचं झालं, आपण पँटच्या हुकला, बेल्टला किंवा बॅगला पेजर लावला की आपण कूल दिसू शकतो हे लोकांना समजलं आणि ८० च्या दशकात पेजरचा खप जगभरात प्रॉपर वाढला.
एवढं सगळं सांगितलं, म्हणल्यावर पेजर कसं काम करायचं हे सांगायला हवं की-
पेजर काम करायचे रेडिओ फ्रिक्वेन्सी टॉवर्सवर. जसा आपला मोबाईल नंबर असतो तशी पेजरची ठरलेली फ्रिक्वेन्सी असायची. मग आपल्या फ्रिक्वेन्सीवरुन दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवर मेसेज टाकायचा. त्यानंतर तो इच्छित स्थळी पोहोचायचा. आधी हे मेसेज म्हणजे फक्त नंबर्स असायचे, नंबर्समध्ये ९११ हा अमेरिकेतला इमर्जन्सी नंबरही पेजरमुळंच मार्केटमध्ये आले. पण या सिक्रेट कोडवाल्या नंबरची सगळ्यात मोठी देण म्हणजे…
143.
आय लव्ह यू म्हणण्यासाठी 143 वापरायचं हे पेजरमुळंच समजलं आणि पार शाळेत चोरुन दिलेल्या चिठ्ठ्यांपासून व्हॉट्सॲपच्या युगातही आपण खडा टाकून बघायला 143 हा नंबरच वापरला.
बीपर्सपासून सुरू झालेल्या पेजरमध्ये नंबर्स आले, ऑडिओ मेसेज आले, स्टाईल आली आणि लोकप्रियताही, पण तरी पेजर्स राहुल द्रविड क्रीझवर टिकायचा तसे टिकू शकले नाहीत. कारण लोकांकडे बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आली आणि त्याचवेळी मार्केटमध्ये मोबाईल आले. सुरुवातीला पैसे थोडे जास्त जात असले, तरी नंतर मोबाईलपण लोकांना परवडू लागले. जिथं समोरच्या माणसाशी डायरेक्ट फोनवरुन बोलता येतंय, तिथं फक्त मेसेज पोहोचवणाऱ्या पेजरचं मार्केट डीम झालं.
पुढं तर काय प्रत्येकाकडे मोबाईल आले आणि फक्त जुन्या काळाचा रेफरन्स देण्यासाठी फैजल, पुष्पा आणि पप्पू पेजरच्या हातात पिक्चरमध्ये पेजर दिसू लागले. कधी कधी फैजलभाई सारखी तार लागली (काहीच न करता) की, मनात विचार येतो…
मार्केटमध्ये मोबाईल आलेच नसते तर आपण तिला भेटायला जाताना बेल्टपाशी पेजर लावला असता, तिनं गॅलरीतून फ्लाईंग किस फेकला असता आणि… आणि काय नाय भिडू… तिनं दुसऱ्याशी लग्न ठरलंय हे मोबाईलऐवजी पेजरवरुन सांगितलं असतं.
हे ही वाच भिडू:
- बोर्डाच्या पेपरपासून पहिल्या लव्हलेटरपर्यंत, ट्रायमॅक्स पेन आपला खरा जिगरी होता…
- दोघांमधलं ‘प्रॉमिस’ टिकण्यामागचं कारण ‘युनिनॉर’चं सिमकार्ड होतं…
- ऑक्सफर्ड वगैरे विसरा, या डिजिटल युगात खांडबहाले डिक्शनरीच मोबाईलमध्ये लागते….