किरीट सोमय्यांनी दाखवलेली चप्पल मार्केटमध्ये येण्यामागं मोठा इतिहास आहे

सध्या राज्यात कशावरुन कल्ला सुरू असेल, तर पत्रकार परिषदा. दिवसाला किमान दोन पत्रकार परिषदा फिक्स होतात. एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर आरोप करतो, मग त्याला उत्तर मिळतं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आपली बाजू कशी बरोबर आहे, हे टाकतात आणि ही सायकल सुरूच राहते.

सध्या हा वाद गाजतोय, शिवसेना विरुद्ध भाजप या पक्षांमध्ये आणि त्यातही संजय राऊत आणि किरीट सोमय्या या दोन नेत्यांमध्ये. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या बहुचर्चित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले. सोबतच त्यांनी ‘किरीट सोमय्यांना चपलेने मारू’ असं वक्तव्यही केलं.

संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना सोमय्यांनी अचानक आपल्या पायातली चप्पल काढली आणि म्हणाले, ‘संजय राऊत मला जोड्याने मारणार? मी म्हणतो मारा ना. हा माझाच जोडा घ्या आणि मारा.’ त्यानंतर सोशल मिडियावर सोमय्या यांच्या चपलेची चांगलीच चर्चा रंगली.

एका कट्ट्यावर तर एक कार्यकर्ता अभिमानानं सांगत होता, तशी सेम चप्पल माझ्याकडे आहे. आता सोमय्या यांनी दाखवलेली चप्पल म्हणजे काय कोल्हापुरी पायताण नव्हतं. तसली चप्पल आपल्याकडे फार लोकं वापरतात असंही नाही, त्यामुळं आमच्या सुपरफास्ट चालणाऱ्या डोक्याला प्रश्न पडले की, ही चप्पल मार्केटमध्ये कशी काय आली असेल? जगातली आणखी कोण लोकं असली चप्पल वापरत असतील काय? राड्यामुळं चप्पल हायलाईट होते, तर चपलेमुळं काय राडा झाला असेल काय? मग आम्ही अस्मिता बनत शोध घेतला आणि शोधलं की सापडतंच याची आम्हाला जाणीव झाली.

तर या चपलांना म्हणतात स्लाईडर किंवा शॉवर शूज. इतिहास शोधायला गेलं, तर या स्लाईडर्सची पाळंमुळं पार प्राचीन रोमन लोकांपर्यंत सापडतात. तेव्हा या चपला बांधायला दोऱ्या असल्या तरी, तोही स्लाईडर्सचाच प्रकार होता हे नक्की.

त्यानंतर स्लाईडर्समध्ये वेगवेगळे बदल होत गेले. अमेरिकेत १९६० च्या दशकात स्लाईडर्स पुन्हा एकदा लोकप्रिय ठरु लागल्या होत्या. १९६४ मध्ये ब्रिकेनस्टोक नावाच्या जर्मन ब्रॅंडनं स्लाईडर्सला आणखी ग्लोरीयस रुप देत मार्केटमध्ये आणलं. पण स्लाईडर्सची खरी हवा झाली, ती आदिदासमुळं. एका जर्मन फुटबॉल टीमला शॉवर रुममध्ये किंवा पूलच्या आजूबाजूला घालण्यासाठी चपला हव्या होत्या. तेव्हा आदिदासनं ‘ॲडीलेट पूल स्लाईड’ मार्केटमध्ये आणल्या आणि याच चपला आजही वापरल्या जातात.

फुटबॉल टीमसाठी आदिदासनं खास वॉटरप्रूफ चपला बनवल्या होत्या, पण खेळाडूंनी त्या फक्त शॉवर रूममध्येच नाही, तर इतर ठिकाणीही घालायला सुरुवात केली. त्यामागचं कारण स्टाईल नव्हतं, तर ते होतं कम्फर्ट.

त्यानंतर सामान्य लोकांमध्येही स्लाईडर्स वापरायचं फॅड आलं. फक्त सामान्य लोकंच नाही, तर सेलिब्रेटीही या चपला वापरु लागले. पण काही मोठ्या फॅशन डिझायनर्सच्या मते या चपलांचा ट्रेंड फालतू होता. त्यांनी स्लाईडर्सना नाव दिलं ‘अग्ली शूज.’ त्यांना न जुमानत बऱ्याच सेलिब्रेटींनी स्लाईडर्स वापरणं सुरुच ठेवलं. यावरुन फॉरेनच्या मार्केटमध्ये लई वेळा कोल्ड वॉरही झालेलं. पण शेवटी स्पोर्ट्स ब्रॅण्ड्सच्या सोबतच प्राडा, गुच्ची, बर्बेरी, मार्क जेकब्स या महागड्या ब्रॅण्ड्सनीही स्लाईडर्स बनवण्यात उडी घेतली. फर असलेल्या, चमकदार खडे लावलेल्या डिझाईनर स्लाईडर्सनं मार्केटमध्ये हवा केली खरी पण त्यांची किंमत सामान्य लोकांच्या बजेट बाहेरच होती.

आपला लाडका मेटाचा मालक मार्क झुकरबर्गही अनेकदा स्लाईडर्स वापरताना दिसून आला, त्यामुळं आदिदासच्या स्लाईडर्सचं (सोमय्यांनी पण हीच घातलीये) मार्केट वधारलं. तिथनं पुढं मग सुट्टी नाय, खेळाडू म्हणू नका, कॉलेजमध्ये जाणारे कार्यकर्ते म्हणू नका, अभिनेते म्हणू नका किंवा राजकीय नेते सगळ्यांच्या पायात स्लाईडर्स. याच्या कॉप्या आल्या, लोकल ब्रॅण्ड्सनी पण हवा केली आणि स्लाईडर्स हे एक स्टाईल स्टेटमेंट बनलं.

अंघोळ झाल्यानंतर वापरण्यासाठी बनवण्यात आलेली चप्पल फॅशन डिझाईनर्सनी बाद ठरवली होती, तेव्हा त्यांना वाटलं पण नसेल की, महाराष्ट्रासारख्या राज्यात एक राजकीय राडा रंगेल आणि आदिदासची स्लाईडर एवढी चर्चेत येईल…

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.