एकमागून एक इंटरनॅशनल स्पर्धा भरत गेल्या आणि नजफगड खेळांचा बालेकिल्ला बनला

नुकताच टोकियो ऑलम्पिक स्पर्धा २०२१ पार पडली. या स्पर्धेत खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने मेडल्स आपल्या नावे केले. महत्त्वाचं म्हणजे जॅवलीन थ्रो खेळात नीरज चोप्रानं पहिले गोल्ड मेडल मिळवून दिलं. अशातच आज नॅशनल स्पोर्ट्स डे’ दिवशी भवानीबेन पटेल यांनी टोकियो पॅरालॉम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये सिल्वर मेडलवर आपलं नाव कोरल आहे.

आज हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त ‘ नॅशनल स्पोर्ट्स डे’ देशभरात साजरा होतोय.

तसं पाहिलं तर भारतात ना खेळांची कमी आहे ना खेळावर प्रेम करणाऱ्यांची. त्यातही भारताचे क्रिकेट प्रेमी अख्ख्या जगात फेमस आहेत. प्रत्येक नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलच्या स्पर्धेत भारत मैदानात तर उतरतोच आणि कामगिरी फत्तेही करतो.

दरम्यान, भारतात खेळांची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळेच इथे खेळांचा गौरवही तितक्याच मोठ्या स्तरावर केला जातो. याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्वातंत्र्यानंतर कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेतही आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि पहिल्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले गेले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या खेळाचं उदघाटन केलं गेलं. 

१९५१ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून दिल्लीने जे शक्तिप्रदर्शन केलेय, त्याची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद केली गेलीये. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक अँथनी डी मेलो यांनी १९५९ मध्ये लिहिले होते,’त्यांना सतत प्रश्न विचारले जातात कि, भारतीय खेळांचा सर्वोत्तम क्षण कोणता मानला जातो. यावर ते म्हणतात.

४ मार्च १९५१ सालचा जो क्षण होता, त्याची तुलना इतर कुठल्याच क्षणासोबर केली जाऊ शकत नाही

‘ Play the game in the spirit of the game’ या मोटो सह नॅशनल स्टेडियम म्हणजेच सध्याचं मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम खचाखच भरलेलं होतं. देशाचे दिग्गज धावपटू दिलीप सिंग मशाल घेऊन मैदानात उतरले.  त्यावेळी प्रश्न फक्त खेळ आयोजित करण्याचा नव्हता, तर स्वतंत्र भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर उजळवण्याचा आणि जगाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा होता.

आशियाई खेळांच्या मानकांनुसार राष्ट्रीय स्टेडियम बांधले गेले, संसाधने विकसित केली गेली आणि आठ दिवस या खेळामुळं दिल्लीचे स्वरूप जगासामोर आणले गेले. 

१९५१ मध्ये पहिल्या आशियाई खेळांनंतर, १९८२ मध्ये पुन्हा एकदा आशियाई खेळ आयोजित करण्यात आले, त्यानंतर दिल्लीने क्रीडा क्षेत्रात मागे वळून पाहिले नाही. पुढे तो खेळांचा बालेकिल्ला बनला. स्टेडियम बांधले गेले, सुविधा वाढल्या यासोबत खेळाडूंचा उत्साह देखील वाढला.

खेळासंदर्भत दिल्लीत बरेच काही घडले. यूएनआयचे क्रीडा पत्रकार असलेले हरपाल बेदी सांगतात की या तीन दशकांपर्यंत लोकांमध्ये खेळांविषयी उत्साह होता. वेगवेगळे क्लब होते, वेगवेगळ्या स्पर्धा भरायच्या.

नेहरू ज्युनियर हॉकी, लाल बहादूर शास्त्री यांसारख्या स्पर्धांव्यतिरिक्त, आंतरविद्यापीठ स्पर्धा होत्या ज्यात मोठ्या संख्येने प्रेक्षक जमायचे. रेल्वेच्या खेळाच्या स्पर्धा भरायच्या. सेंट स्टीफन्स आणि हिंदू कॉलेज यांच्यामध्ये एक सामना असायचा आणि त्यात जबरदस्त कमेंट्री व्हायची.

स्पर्धा कोणतीही असो स्टेडियम कधीच रिकाम दिसायचं नाही. लोक सायकलवर खेळ पाहायला यायची.

त्यावेळी हॉट वेदर टूर्नामेंट व्हायच्या. ज्यात कडक उन्हातही खेळाडू मैदानात उतरायचे. १९८० च्या दशकात शिवाजी स्टेडियम भरलेले असायचे. लेडी हार्डिंगचे मैदान जणू जत्रा भरल्यासारखं वाटायचं. 

दिल्लीत १९८१ नंतर खेळांच्या संसाधनांबाबत क्रांती आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खेळांवर भर देणे सुरू केले आणि खेळाडूंकडे लक्ष दिले गेले. १९८२ मध्ये नेहरू स्टेडियम सुधारण्यात आले आणि तेथेच खेळांचं आयोजन करायला सुरुवात झाली.

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे मुख्यालय जेएलएन मध्ये बनवण्यात आलं

आता, कॉमनवेल्थ गेम्स होस्ट करायच्या होत्या, त्यासाठी दुसरे स्टेडियम बांधायचे होते जे सर्व सुविधांनी सुसज्ज असेल. अशा स्थितीत, नवीन स्टेडियम बांधण्याऐवजी, दिल्लीने या स्टेडियमचे सुशोभीकरण आणि विकास करून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या. या स्टेडियममध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालयही बांधण्यात आले होते.

दिल्लीत खेळाविषयी वेळोवेळी अनेक घडामोडी घडल्या, पण अलीकडच्या काळात दोन मोठे प्रयत्न यशस्वी होताना दिसतायेत. त्यापैकी एक म्हणजे यमुना क्रीडा संकुलाचा विस्तार आणि दुसरा दिल्लीतील क्रीडा विद्यापीठाचे बांधकाम. १९९९ मध्ये बांधण्यात आलेले यमुना क्रीडा संकुल नवीन पद्धतीने तयार करण्यात आले आहे. खेळाडूंच्या सोयीसाठी आणि प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातायेत.

 नजफगड खेळांचा बालेकिल्ला बनला

गेल्या काही वर्षांपासून नजफगड काही खेळांच्या सीमा ओलांडून खेळांचे एक नवीन शहर तयार होताना दिसतेय. हे फक्त कुस्ती आणि क्रिकेटपुरते मर्यादित नाही. इथे प्रत्येक खेळासाठी सुविधा आणि प्रशिक्षक आहेत. बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, नेमबाजी ते कुस्तीपर्यंत पन्नासहून अधिक इनडोअर आणि आऊटडोअर स्पोर्ट्स अकॅडमी आहेत ज्या गेल्या काही वर्षांत बांधल्या गेल्यात.

दरम्यान, हे सगळं पाहून वाटतं कि, देशात खेळाविषयी जागरुकता  निर्माण होतेय आणि सरकार बरोबरच लोकांचाही खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.