चित्रपटाचा रिलीझ तोंडावर होता आणि मनीषा कोईरालाच्या मृत्यूची बातमी छापून आली…

सत्तरच्या दशकामध्ये चित्रपट सृष्टीत आलेल्या महेश भट यांना ऐंशीच्या दशकामध्ये जबरदस्त यश मिळत गेले. त्यांचे अनेक चित्रपट या काळात बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. अर्थ, सारांश, नाम, काश, जनम, ठिकाना या चित्रांनी महेश भटची बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली.

नव्वदच्या दशकामध्ये भट फिल्म्सची गाडी आणखी जोरात चालू लागली. आता त्यांचे बंधू मुकेश भट देखील त्यांच्यासोबत आले होते. या दशकाच्या प्रारंभी ‘आशिकी’ चित्रपटाने भट फिल्म्स ‘मालामाल’ झाले. नंतर अक्षरशः वर्षाला दोन-तीन चित्रपट येऊ लागले.

१९९३ सालच्या ‘हम है राही प्यार के’ या हिट सिनेमा नंतर लागोपाठ चार पाच सिनेमे फ्लॉप गेले. गुमराह, जंटलमन, नाराज, मिलन, तडीपार, नाजायज हि फ्लॉप सिनेमांची रांगच लागली.

महेश भट भानावर आले. त्यांचा आगामी ‘क्रिमिनल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट तेलगू आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी बनत होता. या सिनेमात नागार्जुन, रमय्या कृष्णा आणि मनीषा कोइराला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एम एम क्रीम यांचे संगीत होते. हा सिनेमा साठच्या दशकात अमेरिकन टेलिव्हिजनवर आलेल्या ‘द फजीटीव्ह’ या मालिकेवर आधारीत होता. तेलगूमध्ये हा सिनेमा १९९४ साली प्रदर्शित झाला आणि हिट झाला.

हिंदीत मात्र लागोपाठ चार-पाच चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे भट यांनी आपले लक्ष ‘क्रिमिनल’ या चित्रपटाच्या प्रमोशनवर केंद्रित केले. या सिनेमाची गाणी आधीच मार्केटमध्ये आली होती.

यातील ‘तुम मिले दिल खिले…’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. 

मनीषा कोइराला आणि नागार्जुन यांच्या इंटीमेट सीन मधून प्रेक्षकांना टीव्हीच्या विविध चॅनेलमधून ते गाणं दिसत होतं. ४ ऑगस्ट १९९५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण या सिनेमाचं स्वागत खूपच थंड झालं. भट कॅम्पला हा फार मोठा धक्का होता.

अतिशय शिस्तबद्ध प्रमोशन करून देखील हा चित्रपट फ्लॉप होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यांनी एक आयडीया केली.

‘क्रिमिनल’ हा सिनेमा  प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांनी मुंबईसह देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज झळकली.

‘मनीषा कोइराला यांचा त्यांच्या राहत्या घरी खून!’

या बातमीने संपूर्ण देशात मोठा हडकंप झाला. त्यावेळी न्यूज चॅनलचा एवढा सुळसुळाट नव्हता. तसेच मोबाईल देखील आलेला नव्हता. त्यामुळे ही बातमी फक्त प्रिंट मीडियामध्ये आल्यामुळे सर्वदूर पोहोचली. काही काही वर्तमानपत्रांनी ही बातमी चौकटीत छापून खालच्या बाजूला बारीक अक्षरांमध्ये ‘जाहिरात’ असे लिहिले होते.

मुंबईच्या सायं दैनिकांनी ते देखील पथ्य न पाळता बातमी जशीच्या तशी ठोकून दिली त्यामुळे देशात सगळीकडे मनीषा कोइराला च्या मृत्यूची बातमी पसरली. 

लोकांना बातमीवर विश्वास ठेवण्यासाठी एक कारण देखील होते.

११ मार्च १९९५ या दिवशी मनीषा कोईराला आणि अरविंद स्वामी यांचा ‘बॉम्बे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मनीषाला यातील भूमिकेमुळे काही कट्टरपंथीय संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. तिने रीतसर पोलीस तक्रार करून संरक्षण मागून घेतले होते.

ही बातमी वाचल्यावर तिच्या चाहत्यांना अतिरेक्यांनी मनीषा चा ‘गेम’ केला की काय अशीच शंका वाटली! 

मुंबईतल्या मनीषाच्या चाहत्यांनी तिच्या घराकडे मोर्चा वळवला तर तिथे त्यांना मनीषा कोईराला उभी असलेली दिसली! त्यामुळे ही बातमी फेक आहे हे लक्षात आले.

ही बातमी भट कॅम्पकडूनच जाहिरातीच्या स्वरूपात दिली गेली होती. मनीषाच्या मृत्यूची खोटी बातमी देशभर ‘ब्रेक’ करून त्यांना ‘क्रिमिनल’ या सिनेमाकडे गर्दी खेचायची होती. पण काही काळातच ही बातमी खोटी आहे हे लोकांच्या लक्षात आलं. भट कॅम्पने केलेला बनाव लक्षात आला. फेक न्यूजने सिनेमाची उरली सुरली इज्जत पण गेली! एवढा मोठा जाहिरातीचा खर्च करून देखील चित्रपटाला अजिबात यश मिळाले नाही चित्रपट सुपर फ्लॉप ठरला.

मनीषाला खोटे खोटे मारून देखील चित्रपट जगला नाही हेच खरे!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.