त्यानंतर नाशिक जवळच्या ॲक्सिडेंट पॉईंटला ‘ऐश्वर्या पॉईंट’ नाव पडलं…

सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान होणाऱ्या ॲक्सिडेंट यावर खरंच एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी झालेला अपघात, संजय खानच्या ‘टिपू सुलतान’ वेळी झालेला भीषण अपघात… यादी खूप मोठी आहे.

यातून बऱ्याचदा विलक्षण गोष्टी पुढे निर्माण होतात. मेहबूब यांच्या मदर इंडिया चित्रपटाच्या वेळी लागलेल्या आगीत नर्गिस प्रचंड भाजल्या होत्या, त्यावेळी अभिनेता सुनील दत्त यांनी नर्गिसला वाचवले. यातूनच त्यांच्यातील प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यांचे लग्न झाले.

अर्थात दरवेळी असंच काही घडेल असं सांगता येत नाही. पण ऐश्वर्या राय यांच्या एका ॲक्सिडेंटच्या जागेला आता ‘ऐश्वर्या पॉईंट’ म्हणून ओळखले जाते. काय आहे हा किस्सा?

दिग्दर्शक राजकुमार संतोषी २००३ साली ‘खाकी’ हा महत्त्वकांक्षी चित्रपट बनवत होते. या मल्टीस्टारर चित्रपटात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अक्षय कुमार, अजय देवगण, तुषार कपूर, अतुल कुलकर्णी अशी बडी मंडळी होती.

भारतीय पोलिसांच्या भोवती फिरणारे कथानक जबरदस्त होते. ऐश्वर्या आणि अजय या सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत होते. २००४  साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यावर्षीचा सुपरहिट सिनेमा ठरला. या चित्रपटाला संगीत राम संपत यांचे होते. यातील ‘दिल डूबा दिल डूबा’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय यांचा हा पहिलाच चित्रपट होता.

या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिक पासून २५ किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वरजवळील पहिने येथे चालू होते. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे भाविकांची, पर्यटकांची कायमच मोठी गर्दी असते.

अशा गर्दीच्या ठिकाणी शूटिंग करणे राजकुमार संतोषी यांना कठीण जात होते. तरी देखील त्यांनी बरेचसे शूटिंग संपवले होते.

२ एप्रिल २००३  या दिवशी ऐश्वर्या रायवर एक शॉट इथे चित्रित होणार होता. शॉट असा होता, ऐश्वर्या राय आणि तुषार कपूर रस्त्याच्या कडेला उभे असतात आणि एक जीप जोरात त्यांच्या समोर येऊन थांबते.

या शॉटची रिहर्सल सुरू झाली. जीप चालवणारा त्र्यंबकेश्वरचा लोकल ड्रायव्हर होता. त्याला संपूर्ण शॉट समजावून सांगितला गेला. मार्किंग केली गेली. ऐश्वर्या रायपासून वीस फूट अंतरावर त्याला जीप थांबवायची होती. सर्व काही ओके होते. 

रिहर्सल सुरू झाली. अतिशय वेगाने जीप ड्रायव्हरने आणली पण ज्यावेळी तो मार्किंग प्लेसला आला, त्यावेळी तो प्रचंड गोंधळून गेला आणि गाडीवरील त्याचे नियंत्रण सुटले. जीप प्रचंड वेगाने ऐश्वर्याला धडकून पुढे गेली. जीपच्या धक्क्याने ऐश्वर्या मागे फेकली गेली आणि तिच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली.

तिच्या डाव्या पायाचे हाड मोडले. सर्वांना काही कळायच्या आतच हा प्रसंग घडला. ताबडतोब युनिटचे लोक तिकडे धावले. ऐश्वर्याला तिथून उचलले. वेदनांनी ती कळवळत होती. ताबडतोब तिला नाशिकच्या डॉ. काकतकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तिथे तिच्या पायाला दहा टाके घालण्यात आले. दुखापत गंभीर होती.

नाशिकमध्ये ऐश्वर्या राय हॉस्पिटलमध्ये आहे, ही बातमी कळल्यामुळे चाहत्यांची मोठी गर्दी हॉस्पिटल परिसरात झाली. डॉक्टर आणि पेशंटला याचा त्रास होवू लागला. बघ्यांची गर्दी जसजशी वाढू लागली तसतसा पोलीस बंदोबस्त देखील वाढवला. शेवटी युनिटने ऐश्वर्याला मुंबईला शिफ्ट करायचे ठरवले.

त्यासाठी एअरलिफ्टने तिला मुंबईला हिंदुजा हॉस्पिटलला नेण्यात आले. तिथे तिच्यावर एक महिना उपचार चालले. नंतर पुन्हा ती चित्रीकरणासाठी हजर झाली. हा चित्रपट पूर्ण होऊन २३ जानेवारी २००४  रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि सुपरहीट ठरला!

ज्या ठिकाणी ऐश्वर्या रायचा ॲक्सिडेंट झाला त्या पॉइंटला आता लोक “ऐश्वर्या पॉइंट” म्हणून ओळखत आहेत. हा एक टूरिस्ट पॉइंट बनला आहे. यानंतर १३ वर्षांनी इंदर भल्ला यांच्या ‘ऑल इज वेल’ या सिनेमाच्या शूटसाठी याच स्पॉटवर अभिषेक बच्चन आला होता.

त्यावेळी त्याने या ‘ऐश्वर्या पॉइंट’ चे फोटो आपल्या सोशल मीडियातून शेयर केले होते!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.