गडी दिवाळीला घरी गेला नाय, पण ‘रेड बस’ सुरू करून आपल्या सगळ्यांना घराशी जोडलं
तुम्ही पुण्यात शिकायला आहात आणि मराठवाड्यातल्या मूळ गावी तुम्हाला सणाला जायचंय. मात्र, ऐनवेळी तुम्हाला एसटी, रेल्वे, खासगी बसचं रिझर्व्हेशन मिळत नाही. त्यामुळं सण एकट्याला साजरा करावा लागतो. पण रिझर्व्हेशन मिळालं नाही, म्हणून घरी मिळालेले तुम्ही एकटेच नसता. असाच अनुभव आपल्यापैकी अनेकांना फिक्समध्ये आलेला असतो.
असच काहीसं एका इंजिनिअरसोबत झालं, रिझर्व्हेशन नव्हतं त्यामुळं भावाला घरी जाता आलं नाही, पण त्याचं सुपीक डोक्यात आयडिया आली आणि रेड बसचा जन्म झाला.
आपल्याला घर गाठून देणाऱ्या किंवा घरावरुन कामाच्या ठिकाणी आणणाऱ्या रेड बसची मूळ संकल्पना फणींद्र समा याच्या डोक्यातली. फणींद्र समा हा मूळचा हैदराबाद. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून त्यानं डिग्री आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आता देशातले अनेक इंजिनिअर्स करतात तशी त्यानंही, बँगलोरच्या खासगी कंपनीत काम करायला सुरुवात केली.
गावी जायचं झालं की, फणींद्र एका ठरलेल्या ट्रॅव्हल एजंटकडून हैदराबादसाठी तिकीट घ्यायचा. २००५ मध्ये दिवाळीनिमित्त सुट्टी असल्यानं फणींद्र गावी निघाला होता. मात्र, तो दरवेळी ज्या ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट घ्यायचा त्यानं यावेळी सगळ्या बस फुल असल्याचं सांगितलं.
पण फणींद्रनं ठरवलं होतं, काहीही झालं तरी जायचंच.
त्यानं एक नाही, दोन नाही तर ३० ते ३५ जणांना फोन करून तिकिटासाठी विचारलं. मात्र, तरीही बसचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यानं ती रात्र बँगलोरलाच काढली. दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्याच्या मनात बेक्कार गिल्ट आला, त्याला वाटलं आपण इंजिनियर असल्याचा काहीच फायदा नाय.
नेमकं त्यानं ट्रॅव्हल एजंटच्या कॉम्प्युटरमध्ये एक सिस्टीम असल्याचं पहिलं. त्यात एखाद्या बसमध्ये किती जागा आहे हे दिसत होतं. त्यावर फणींद्रला वाटलं की, हेच आपल्या समस्येवरचं सोल्युशन आहे.
फणींद्र परत हॉस्टेलवर आला, तिकीट मिळालं नसल्यानं डोक्यातलं विचारांचं चक्र सुरूच होतं. आपल्यासोबत जे घडलंय ते अनेकांसोबत घडलं असणार, असं त्याला वाटलं. आता बसमध्ये नेमकी किती सीट्स रिकाम्या आहेत हे एजंटला सुद्धा नक्की माहित नसायचं.
तेव्हा त्यानं यावर काम करायचं त्यांनी ठरवलं.
फणींद्र हे सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्यामुळं त्यानं कोडिंगवर काम करायला सुरुवात केली. एक असं सॉफ्टवेअर बनवायला सुरुवात केली की, जे सगळ्या बस ऑपरेटरकडे असेल. याच्या मदतीनं बसमध्ये किती सीट्स रिकाम्या आहेत, बस किती वाजता निघणार आहे, अशी सगळी माहिती एका क्लिकवर मिळेल.
फणींद्रनं तयार केलेलं सॉफ्टवेअर फ्रीमध्ये बस ऑपरेटरला दिलं. प्रवाशी, ट्रॅव्हल एजंट आणि बस ऑपरेटर या तिघांना सोपं जाईल, असा तो प्लॅटफॉर्म होता. पण बस ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट यांच्या डोक्यात ते काही घुसलं नाही. त्यामुळं फणींद्रनं आपल्या दोन मित्रांना ही कन्सेप्ट सांगितली.
मग या तिघांनी ‘रेड बस’च्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवलं.
कस्टमरच्या मागणीनुसार हे तिघं ट्रॅव्हल एजंटला फोन करून बसच्या सीटबद्दल विचारायला लागले. पण आता किती जणांचा फोन घेणार आणि किती जणांना फोन करणार? म्हणून त्यांनी एसएमएस आणि ईमेल सर्व्हिस सुरु केली. अगोदर यात फक्त प्रवाशीच होते. पण नंतर रेड बसचा वाढता बिजनेस पाहून ट्रॅव्हल एजंट आणि बस ऑपरेटरच्या डोक्यात सुद्धा ही गोष्ट परफेक्ट घुसली.
थोडक्यात काय तर, सगळं ट्रॅव्हल मार्केट रेड बसनं आपल्या हातात घेतलं होतं, म्हणजे प्रवाश्यांकडे दोनच पर्याय उरलेले, एकतर रेड बसवरून तिकीट बुक करायचं नाहीतर एजंटकडून. पण विषय असा होता, की हा एजंट सुद्धा बुकिंगसाठी रेड बसच वापरणार होता.
कुठून कुठंही कुठलाही प्रवासी बसच्या रिझर्वेशनसाठी रेड बसचीच मदत घेऊ लागला. एजंट लोकांचं कामही सोपं झालं होतं. आता फक्त भारतातच नाही, तर जवळपास ६ देशांमधले ट्रॅव्हल एजंट सुद्धा रेड बसवरून तिकीट देऊ लागले. काहीच वर्षात रेड बस ट्रॅव्हल सेक्टरमधली टॉपची कंपनी बनली.
कंपनीचा सक्सेस बघून गोआयबीबोनं रेड बसला ऑफर दिली आणि आज रेड बस गोआयबीबोच्या मालकीची आहे. रेडबसनं आतापर्यंत ८ कोटीपेक्षा जास्त तिकिटं विकलीत. तर जगभरातल्या ६ देशांमध्ये रेड बसचं नेटवर्क पसरलंय आणि टर्नओव्हर ७०० कोटींच्यावर गेला आहे.
रेड बसच्या नंतरही अनेक कंपन्या मार्केट मध्ये उतरल्या, पण रेड बसला टक्कर देणारं कुणीच समोर आलं नाही.
हे ही वाच भिडू :
- इमर्जन्सीमुळं चारपट पैसे द्यावे लागले म्हणून त्याने स्वस्त तिकिटाचं स्टार्टअप सुरु केलं
- या भावड्याच्या स्टार्टअपने अमेरिकेच्या शार्क टॅंकमधून गुंतवणूक मिळवलीय
- युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांत इंग्लंडला मागे टाकत भारत तिसरा आलाय