वर्ल्डकप जिंकलेल्या टीमला बक्षीस द्यायला पैसे नसलेली बीसीसीआय, अफाट श्रीमंत कशी बनली ?

वयाच्या २० व्या वर्षी भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बुधी कुंदरन टेस्ट मॅच झाली की बाकड्यावर झोपायचा. कारण सिम्पल होतं त्याच्याकडे पैसे नव्हते. भारताचा क्रिकेटर मॅच झाली की बागेतल्या बाकड्यावर झोपतो, ही गोष्ट सध्याच्या काळात पचल तरी का ?

या सगळ्याला लय वर्ष झाली, या वर्षात जग लय बदललं आणि भारतीय क्रिकेटही. आता इंटरनॅशनल क्रिकेट न खेळताही काही कोटीत पैसे कमवतात.

हे सोडा, सध्या आयपीएलच्या २०२३ ते २०२७ च्या मोसमासाठी टीव्ही आणि डिजिटल राईट्सचा लिलाव सुरू आहे. रविवारी लिलावाचा पहिला दिवस संपला, तेव्हा आकडा ४३ हजार कोटींच्या पार गेलेला. म्हणजे एका मॅचसाठी बीसीसीआयला शंभर कोटींपेक्षा जास्त पैसे मिळणार. तेही फक्त मॅच दाखवायचे.

२०१७ मध्ये बीसीसीआयचं नेटवर्थ १५ हजार कोटी होतं, तर २०२०-२१ मध्ये हा आकडा १८ हजार कोटींवर गेला होता. बीसीसीआय एवढं खोऱ्यानं पैसे ओढतंय, तेही प्लेअर्सपासून सगळ्या स्टेट असोसिएशनला देऊनही.

पण कधीकाळी ज्या टीमचे प्लेअर बागेत झोपायचे, ज्यांच्याकडे वर्ल्डकप जिंकून आलेल्या टीमला द्यायला पैसे नव्हते, ती बीसीसीआय एवढी श्रीमंत कशी काय झाली ?

इंग्लंडमध्ये झालेला वर्ल्डकप भारतानं जिंकला आणि मध्ये चार वर्ष उलटली. १९८७ च्या वर्ल्डकपचं आयोजन भारतीय उपखंडात करण्यासाठी भारतानं कित्येक विषय बसवले आणि वर्ल्डकप झाला आपल्याकडे.

बीसीसीआयनं पैसे कमवायला सुरुवात केली ती इथून, हा वर्ल्डकप भारतात कसा आयोजित झाला यावर बोल भिडूनं आधीच लेख लिहीलाय.. त्याची लिंक या लेखाच्या शेवटी देतो.

तर हा, १९८७ चा वर्ल्डकप. ही स्पर्धा भारतात आयोजित करायला पैसा लागणार होता आणि पैशांसाठी स्पॉन्सर. बीसीसीआय अध्यक्ष एन. के. पी साळवे आणि त्यांचे सहकारी जगमोहन दालमिया यांनी अनेक कंपन्यांना ऑफर दिली आणि पुढं आलं रिलायन्स. हा वर्ल्डकप लोकांच्या मनात आणि बीसीसीआय-रिलायन्सचं नातं पैशाच्या हिशोबात सुपरहिट झालं.

पण तरी म्हणावा तसा पैसे मिळत नव्हता, तेवढ्यात सचिन तेंडुलकर नावाचा एक स्टार उदयाला आला आणि क्रिकेटच्या लोकप्रियतेनं पुन्हा उचल खाल्ली. क्रिकेटमध्ये सचिन चालत होता आणि भारतीय लोकांच्या टीव्हीवर डीडी नॅशनल. डीडीची सिंगल हॅन्ड बॅटिंग सुरू असल्यानं बीसीसीआय प्रत्येक मॅच दाखवण्यासाठी डीडीला ५ लाख रुपये द्यायचं.

१९९५ मध्ये बीसीसीआयला फ्री हिट मिळाली, कारण जागतिकीकरण झालं. भारताचं मार्केट परदेशी कंपन्यांसाठी खुलं झालं. बीसीसीआयनं क्रिकेट मॅचेसच्या प्रक्षेपणाचे हक्क विकायचं ठरवलं आणि ट्रान्स वर्ल्ड इंटरनॅशनल कंपनीसोबत १ मिलियन डॉलर्सचा करार केला.

इथनं पुढं ‘मीडिया राईट्स’ या एकाच विषयावर बीसीसीआय बेक्कार गब्बर झालं.

काहीच वर्षांपूर्वी जे दूरदर्शन मॅचेस दाखावायचे पैसे घेत होतं, त्यांनीच २००० मध्ये बीसीसीआयला चार वर्षांसाठी २४० कोटी रुपये दिले. २००६ मध्ये निंबसनं ४ वर्षांसाठी ५४९ मिलियन डॉलर्समध्ये मीडिया राईट्स घेतले. पण त्याही पेक्षा मोठा कहर झाला, २००८ मध्ये.

बीसीसीआयनं आयपीएल नावाचं स्वप्न जागतिक क्रिकेटला दाखवलं. 

क्रिकेटला मनोरंजनाचा आणि ग्लॅमरचा तडका दिला आणि पैशांची पोतडी ओपन झाली. पहिल्याच वर्षी सोनीनं ९१८ मिलियन डॉलर्स देत दहा वर्षांसाठी बीसीसीआयसोबत करार केला. २००८ ची आयपीएल प्रचंड हिट झाली, प्रत्येक मॅच फक्त भारतातच नाही तर जगभरात पाहिली गेली.

ही एवढी लोकप्रियता बघून बीसीसीआयनं सोनीसोबतचं कॉन्ट्रॅक्ट बदललं आणि २००९ मध्ये दहा वर्षांसाठी १.६३ बिलियन डॉलर्सचा करार केला.

२०१७ मध्ये बीसीसीआयनं सोनीच्या ऐवजी स्टारसोबत करार केला. तेव्हा स्टारनं १६ हजार ३४७ कोटी देत आयपीएलचे मीडिया राईट्स घेतले होते. यंदा मीडिया राईट्सच्या लिलावाच्या पहिल्याच दिवशी आकडा ४३ हजार कोटींच्या पार गेलाय. त्यामुळं पाच वर्षांत बीसीसीआयनं दुपटीपेक्षा जास्त कमाई केलीये.

हे आकडे होते फक्त आयपीएलच्या मीडिया राईट्सचे, टायटल स्पॉन्सर्स, पार्टनर्स, जाहिरातदार इथून येणारा पैसा वेगळाच.

ही आयपीएलसारखीच स्कीम, भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय मॅचेसलाही लागू पडते. भारतात होणारी इंटरनॅशनल क्रिकेट मॅच आपल्या टीव्हीवर दाखवण्यासाठी स्टार ग्रुप बीसीसीआयला एकाच मॅचचे ४३.२० कोटी रुपये देतो. पुन्हा जर्सीवर नाव असणारं बायजूस, एमपीएल यांच्याकडून मिळणारे पैसे वेगळे.

मॅचच्या तिकिटातून मिळणारे पैसे, हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

मीडिया राईट्समधून बीसीसीआय पैसे कमवतंच, पण यासाठी त्यांना सगळ्यात मोठा आधार आहे तो म्हणजे फॅन्स.

जगभरात जेवढं केवढं क्रिकेट बघितलं जातं, त्याच्या जवळपास ८० टक्के क्रिकेट तर भारतात बघतात. समजा एखादी मॅच किंवा टूर्नामेंट हरली, तरी भारतीय क्रिकेट चाहते क्रिकेट बघणं सोडून देत नसतात. त्यात आजच्या घडीला भारतीय नागरिक कित्येक देशांमध्ये स्थायिक झालेले आहेत, त्या देशांमध्ये त्यांना क्रिकेट पाहायचं असतं.

मागणी असते, त्यामुळं पुरवठा असतो. साहजिकच तिथले ब्रॉडकास्टरही आयपीएल आणि इतर सामन्यांसाठी मीडिया राईट्स घेतात. बीसीसीआयचा इन्कम सोर्स सुरू राहतो.

बीसीसीआयनं श्रीमंत होण्याचं आणखी एक कारण म्हणजे बीसीसीआयला भारतात कुणाशीच स्पर्धा करावी लागत नाही. त्यामुळं कुठं लॉसमध्ये जायची किंवा जास्तीचा पैसा खर्च करायची गरजच उरत नाही.

 राहिला प्रश्न आयसीसीचा तर जागतिक क्रिकेटवर असलेल्या बीसीसीआयच्या होल्डमुळं आयसीसीला जेवढा रेव्हेन्यू मिळतो त्यातला जवळपास ३० टक्के शेअर बीसीसीआयचा आहे. दोन नंबरवर असणाऱ्या इंग्लंडला भारताच्या निम्माच शेअरही मिळत नाय.

बीसीसीआय जसं फॅन्समुळं श्रीमंत झालं तसंच प्लेअर्समुळंही.

पार कपिल, गावसकर, रवी शास्त्री, सचिन, गांगुली, द्रविड, झहीर, धोनी, विराट, रोहित अशी न संपणारी प्रचंड मोठी लिस्ट आहे. भारतात क्रिकेट हा माझा धर्म आहे, हे अभिमानानं सांगणारे लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. साहजिकच प्लेअर्स तितके दमदार आहेत, मॅचेस तितक्या टफ होतात म्हणून हे फॅनडम टिकून राहिलंय हेही तितकंच खरं.

एक मॅच फिक्सिंगचं आणि एक स्पॉट फिक्सिंगचं कांड झालं, तरी भारतात क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली नाही. बीसीसीआयनं काळानुरूप बदल केले. दालमियांनी अचूक वेळेला क्रिकेटमध्ये पैसा आहे हे ओळखलं होतं. त्यांनी राबवलेली धोरणं बदलली, पण अधिक पैसा मिळवण्यासाठीच.

बीसीसीआयनं भारतीयांना क्रिकेटची इतकी सवय लावलीये, की वर्षातून काहीच दिवस मॅचेस नसतात पण आपल्याला अतिक्रिकेटची शिसारी येत नाही. आपल्या प्रोडक्टमधला दम ओळखून वाढवलेले मीडिया राईट्स असतील किंवा लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन तिकीटापासून मर्चन्डाईजपर्यंतची विक्री असेल… क्रिकेटला मरण नाही हे बीसीसीआयनं ओळखलं.

आज परंपरा, शिस्त आणि इतिहासाच्या दृष्टीनं बाकीचे क्रिकेट बोर्ड मोठे ठरतीलही.. पण बीसीसीआय रिंगमास्टर आहे, रिंगमास्टर..!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.